पुणेकर मित्रांनी मिळून सुरू केलेली कोरोना हेल्पलाईन ९०० वृद्धांसाठी वरदान ठरलीये!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा फास घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. ह्या लॉकडाऊनमुळे अनेक वृद्ध लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून जगभरात अनेक सामाजिक संस्था ह्या वृद्ध लोकांची सेवा करण्यासाठी पुढे आल्या आहेत. भारतात देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही सेवा सुरू नसून लोकं घरात बसून आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परवानगी जनतेला देण्यात आली आहे.

पेन्शनर्स सिटी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर देखील कोरोनाच्या प्रादुर्भावाने ग्रासले असून पुण्यात राहणाऱ्या वृद्ध लोकांचे यामुळे हाल होत आहेत. अशा पुण्यातील वृद्ध नागरिकांच्या सेवेसाठी काही तरुणांनी व महिलांनी एकत्र येऊन एक हेल्पलाईन सुरू केली असून त्या माध्यमातून आतापर्यंत ९०० वृद्ध लोकांपर्यंत सेवा पोहचवण्यात यश आलं आहे.

फ्रेंड्स ऑफ सिनियर सिटीझन असे ह्या ग्रुपचे नाव असून ह्या ग्रुपची स्थापना सोनाली रसाळ ह्या ४५ वर्षीय वास्तू विशारद महिलेने कॉलेजमधील मैत्रीण असलेल्या गौरीच्या सोबतीने केली.

बघता बघता ३०० स्वयंसेवक ह्या ग्रुपशी जोडले गेले आहेत. राजेंद्र जोशी हे माजी पोलीस उपायुक्त देखील ह्या ग्रुपचे सदस्य असून ते ह्या ग्रुपचा कायदेविषयक शिस्तीची पूर्ण काळजी घेत आहेत. त्यांनी ह्या ग्रुपच्या स्वयंसेवकांना आयडी कार्ड, आधार कार्ड सोबत इतर ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगण्याच्या सूचना करण्यापासून त्यांच्या कार्याची नोंद करण्यापर्यंतची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.

त्यांच्यामुळे ह्या स्वयंसेवकांची यादी व हेल्पलाईन क्रमांक पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना देण्यात आली आहे, बऱ्याचवेळा गरजवंतांची माहिती पोलिसांकडून ह्या ग्रुपला मिळते. तब्बल १५ व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून फ्रेंड्स ऑफ सिनियर सिटीझनचे स्वयंसेवक गरजू वृद्ध नागरिकांना मदत करत आहेत.

सोनाली रसाळ यांच्या सोसायटीच्या कवितांच्या ग्रुपवर एका वृद्ध महिलेने आपली व्यथा मांडताना म्हटले होते की, लॉकडाऊनमुळे त्यांच्या औषधांचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यापर्यंत होम डीलेव्हरी बंद झाली आहे. त्यांची व्यथा लक्षात घेऊन सोनाली यांनी त्यांना मदत देऊ केली.

पण सोनाली यांना लक्षात आलं की ही समस्या पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील कित्येक लोकांना भेडसावत असेल त्यातूनच त्यांच्या मनात फ्रेंड्स ऑफ सिनियर सिटीझनची संकल्पना आली आणि त्यांनी त्यांची मैत्रीण गौरी यांच्या सोबत एकत्र येऊन १९ मार्चला एक व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून सुरुवात करून लोकांना मदत करायला सुरुवात केली.

गर्भवती महिला, मधुमेहाचे रुग्ण आणि इतर अनेक गरजवंतांचे ह्या ग्रुपच्या नंबर वर नियमितपणे फोन कॉल्स येत असतात आणि हे लोक गरजेप्रमाणे त्या लोकांच्या मदतीला धावून जातात. अंजली ह्या सर्व फोन कॉल्सची आणि भागाची माहिती संकलित करून त्या त्या भागातील स्वयंसेवकापर्यंत पोहचवण्याचे काम करते आहे. सोबतच काम पूर्ण झाल्यावर स्वयंसेवकाना सेल्फी काढून पाठवणे सक्तीचे असून ते सेल्फी काम पूर्ण झाल्याच्या पावत्या असतात. त्या सेल्फीचा रेकॉर्ड पण ठेवला जातो.

प्रत्येक स्वयंसेवकाला त्यांच्या घराजवळच्या नागरिकांचा पत्ता दिला जातो आणि नंबर दिला जातो तसेच त्या नागरिकाला आपल्या घराच्या अथवा सोसायटीच्या गेटवर येण्यास सांगितले जाते आणि त्याठिकाणी त्याला आवश्यक ती मदत पुरवली जाते. बऱ्याच वेळा ह्या स्वयंसेवकांनी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यापासून ते आवश्यक सामान पोहचता करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत. स्वयंसेवकांना स्वतःची काळजी घेण्याचे देखील निर्देश देण्यात आले असून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गौरी यांना एक वेगळा अनुभव देखील हे काम करताना आला असून त्यांना भाग्यश्री कार्लेकर ह्या ९२ वर्षीय वृद्ध महिलेचा एकदा फोन आला. त्या त्यांच्या सत्तर वर्षांच्या सुनेसोबत पुण्यात घरात एकट्याच होत्या. त्यांना मधुमेह आणि पाठीचे विकार असल्याचे गौरी यांना सांगितले व त्यांना रोज कामावर येणाऱ्या नोकरांचा सहारा आता उरला नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर गौरी यांनी त्यांना संपूर्ण मदत केल्यावर त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे मोल शब्दात नसल्याचा भावना गौरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

आज कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाउनमुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या असून अशावेळी आपण एकमेकांना साहाय्य करून या संकटाचा सामना करणे गरजेचे आहे. फ्रेंड्स ऑफ सिनियर सिटीझन हा ग्रुप देखील याचेच उदाहरण आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!