या भारतीय स्टार्टअप्सच्या कामामुळे कोरोनाविरोधातल्या जागतिक लढ्याला बळ मिळालंय…

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब

===

२५ तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा केली. भारतातील प्रमुख वाहतूक व्यवस्था जसे रेल्वे आणि विमानसेवा संपूर्णत: बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही प्रकारच्या सेवेला परवानगी देण्यात आलेली नाही. बहुतांश व्यवहार ठप्प आहेत.

हे सर्व करण्यामागे देशावर कोसळलेलं कोरोना व्हायरसचं संकट असून अधिकृत माहितीनुसार आज भारतात तब्बल १९०० रुग्ण हे कोरोना बाधित असून आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवेवर मोठा तणाव असून आज कोरोनाशी सामना करण्यासाठी अत्यावश्यक अशा टेस्टिंग किट्स, व्हेंटिलेटर आणि N95 मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे.

अशा परिस्थितीत संकटाशी सामना करणाऱ्या आरोग्य सेवेला संपूर्ण सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी भारतातील स्टार्ट अप पुढे सरसावले आहेत.

आज आशा तीन स्टार्ट अप्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला कोरोना व्हायरसच्या समस्येवर मात करण्यासाठी मोठं पाठबळ मिळालं आहे.

१) माय लॅब, पुणे

देशभरात कोरोना रूग्णांची ओळख पटवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे तो कमी टेस्टिंगचा. सुरुवातीला भारतात पुरेशा टेस्टिंग किट्सचा अभावामुळे टेस्ट करण्याचे प्रमाण कमी होते. टेस्टिंगसाठी आवश्यक असलेल्या किट्स भारत परदेशातून आयात करत होता. ह्या समस्येवर मात करण्यासाठी पुण्यातील माय लॅब टेस्टिंग ह्या कंपनीने पुढाकार घेतला आणि त्यांनी एका आठवड्यात अशा किट्सची निर्मिती केली आहे ज्या जलदगतीने कोरोना व्हायरसचे निदान करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना नुसार ह्या किट्सची निर्मिती करण्यात आली असून भारत सरकार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने ह्या किट्सला प्रमाणित केले आहे.

आता माय लॅबने एका आठवड्याला १ लाख किट्सचे उत्पादन सुरू केले असून कालांतराने यात वाढ केली जाणार आहे.

अजून महत्वपूर्ण बाब ही आहे की एका टेस्टिंग किट्सच्या सहाय्याने एका दिवसात १०० पेशंटसची तपासणी आणि कोरोनाचे निदान शक्य आहे. एका किटच खर्च हा १२०० रुपये असून प्रति पेशंट १२ रुपये इतका खर्च येणार आहे. आधी हा खर्च ४५०० रुपये प्रति व्यक्ती होता.

पीसीआर तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणवर टेस्ट करण्यासाठी ह्या टेस्टिंग किट्स तयार केल्या गेल्या असून याची अजून एक विशेषता अशी आहे की ह्या टेस्टिंग किट्सच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करायला आधी जो 2 दिवसांचा कालावधी लागायचा तो न लागता फक्त अडीच तासात कोरोनाचे निदान शक्य झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून माय लॅब विविध आजारांवर टेस्टिंग किट्सची निर्मिती करत असून देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी मोठ्या युद्ध पातळीवर प्रयत्न करून ह्या कोरोना किट्स तयार केल्या आहेत ज्याचा वापर आज देशभरात केला जाणार आहे. यामुळे भारतातील आरोग्यतज्ञांच्या समोर असलेला कमी टेस्टिंगचा प्रश्न निकाली निघाला आहे.

AgVa हेल्थकेयर :-

भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार कोव्हिड १९ अर्थात कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या ५ टक्के लोकांना श्वसनाचा खूप त्रास होतो त्यांना आशा परिस्थिती कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करणे गरजेचे असते. यासाठी व्हेंटिलेटर ह्या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. पण भारतात व्हेंटिलेटरचे प्रमाण अत्यल्प असून त्याचा तुटवडा भरून काढणे नजीकच्या भविष्यात फार गरजेचे होणार आहे.

जर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असाच होत राहिला तर हे फार गरजेचं होणार आहे. नाहीतर अनेक रुग्ण फुस्फुसं निकामी होण्याने दगावण्याची भीती निर्माण झाली आहे.

ह्या काळात सरकारने नोएडाच्या AgVa हेल्थकेयर ह्या कंपनीला साकडे घातले असून त्या कंपनीने देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या पंधरा एप्रिल पर्यंत ५ हजार व्हेंटीलेटरची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. १५ एप्रिलला ही संस्था भारतातील प्रमुख हॉस्पिटलमध्ये आपले व्हेंटिलेटर पोहचवणार आहे.

यासाठी त्यांच्या जवळील सर्व मनुष्यबळ त्यांनी पणाला लावलं आहे, जे तासन तास काम करून ह्या व्हेंटिलेटरची निर्मिती करत आहेत.

एका रिपोर्टनुसार, ह्या कंपनीने आपल्या व्हेंटिलेटर निर्मितीच्या क्षमतेला १५० व्हेंटिलेटर प्रति महिनापासून वाढवत नेउन १२००० प्रति महिना इतक केलं आहे. इतकंच नाही ज्या व्हेंटिलेटरची किंमत ५ ते १२ लाख आहे त्याला AgVa हेल्थकेयर फक्त २ लाखात विक्री करणार आहे. पण सध्याच्या विमान बंदी मुळे त्यांना आवश्यक सामानाची जुळवा जुळव करायला अडचण येत आहे. लवकरच ह्या अडचणींवर मात करून ते आपलं काम पूर्ण करतील अशी त्यांना आशा आहे.

नॅनोक्लिन ग्लोबल:-

देशभरात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या फेसमास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. ह्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी दिल्लीच्या नॅनोक्लीन ग्लोबलने पुढाकार घेतला असून त्यांनी नॅनो मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. यात प्रामुख्याने संसर्गजन्य आजारांपासून रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या N95 आणि FF P2 दर्जाच्या मास्कचे उत्पादन केले जाणार आहे.

ह्या मास्कची विशेषता म्हणजे ह्या मधील नॅनो फायबर जे बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर सूक्ष्म जीव जंतूंचा शरीरातील प्रवेश टाळण्यासाठी प्रभावी ठरतात.

नॅनोक्लीन ग्लोबलची स्थापना आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी असलेल्या प्रतीक शर्मा, तुषार व्यास आणि जतीन केवलानी ह्यांनी ही स्टार्टअप कंपनी सुरू केली असून ह्या कंपनीच्या माध्यमातून ते एक मास्क १४९ रुपयात विक्री करत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता ह्या कंपनीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलं असून दिल्ली, राजधानीचा प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, तसेच मुंबई व अहमदाबाद ह्या भागात त्यांनी ह्या मास्कचे वितरण केले आहे. जनता कर्फ्युच्या आधी त्यांनी २५ हजार नॅनो मास्कची निर्मिती केली असून ते विविध हॉस्पिटलमध्ये पोहचवले आहेत.

मोठ्या प्रमाणावर मास्कच्या निर्मिती साठी मोठे प्रयत्न केले जात असून सध्या तरी एका मर्यादित क्षेत्रात याचे वितरण केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतभरात आता अनेक स्टार्ट अप्स आणि बड्या कंपन्या अशा प्रकारे पुढे येऊन आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. त्यांचा कार्याला आमचा सलाम !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!