आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
क्रिकेट आता फक्त एक खेळ राहिला नसुन ती जगण्याची एक पद्धत बनली आहे. भारतात तर क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटर्सना देव समजले जाते. क्रिकेट हा अतिशय रंजक आणि सोपा खेळ असला तरी त्यात बरेचसे छोटे छोटे नियम आहेत जे सामान्य लोकांना माहीत नसतात. डकवर्थ लुईससारखा नियम तर काही खेळाडूंनाही कळत नाही. अनेक नियम तयार करण्यामागे रंजक किस्से आहेत. आज असाच एका रंजक किस्सा पोस्टमनच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
एखादा आंतरराष्ट्रीय सामना खेळला जातो तेव्हा त्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं. या सामन्यासाठी खेळाडूही भरपुर जोमाने प्रयत्न करत असतात.
सामन्याची सुरुवात होते आणि त्यात फलंदाज एकही धाव न करता बाद होतो. त्याच वेळी खेळाचं समीक्षण करणारा समीक्षक त्या फलंदाजाच्या धावसंख्येला ‘डक’ असे संबोधते.
शुन्याला डक म्हणण्याची ही पद्धत नेमकी कशी सुरू झाली हेच आपण आज बघणार आहोत.
या ‘डक’चा इतिहास सुरू होतो तो १७ जुलै, १८६६ रोजी. या दिवशी जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स शून्यावर बाद झाला तेव्हा एका वर्तमानपत्रात एक बातमी झळकली. ‘प्रिन्स ऑफ वेल्स ‘डक’वरती बाद होऊन परतला’ अशी ती बातमी होती. या दिवसापासूनच हे ‘डक’ क्रिकेटच्या इतिहासाशी जोडलं गेलं आहे.
वर्तमानपत्रात शुन्याऐवजी बदकाचा उल्लेख करण्यामागे मुख्य कारण होते ते म्हणजे बदकाच्या अंड्याचा आकार. बदकाचे अंडे हुबेहुब शुन्यासारखे असते म्हणून शुन्याऐवजी ‘डक’हा शब्द वापरला जाण्याची प्रथा सुरू झाली. क्रिकेटमध्ये फलंदाजाला नको असलेली एखादी गोष्ट असेल तर ती आहे हा ‘डक’.
या ‘डक’ चे काही प्रकार आहेत. शून्यावर बाद होणाऱ्या वेगवेगळ्या संभावनांमुळे हे प्रकार पडले आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत-
‘गोल्डन डक’
फलंदाजाने खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला ‘गोल्डन डक’ म्हणून संबोधले जाते. कोणत्याही फलंदाजाला ही गोष्ट आवडत नाही. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासूनच आक्र*मक खेळण्याच्या प्रयत्नात बऱ्याच वेळी फलंदाज बाद होतात.
पण, कधी कधी एखादा गोलंदाज पहिलाच चेंडू इतका भारी टाकतो की फलंदाज लगेच बाद होतो. काहीही झालं तरी ‘गोल्डन डक’ कोणालाही आवडत नाही. भारताच्या सगळ्यात जास्त यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला एम एस धोनी त्याच्या पहिल्याच सामन्यात ‘गोल्डन डक’ वर बाद झाला होता.
‘डायमंड डक’
एकही चेंडू न खेळता बाद होण्यापेक्षा जास्त वाईट एका फलंदाजासाठी अजुन काय असेल..? याच प्रकारे बाद होण्याच्या पद्धतीला ‘डायमंड डक’ म्हणतात. पहिल्या चेंडूवर धावबाद होणे, किंवा दुर असलेल्या चेंडूवर यष्टीचित होणे अशा प्रकारे फलंदाज डायमंड डक होऊ शकतो.
‘सिल्वर डक’
काहीही धावा न करता दुसऱ्या आपल्या डावाच्या चेंडूवर बाद होणारया फलंदाजासाठी हा शब्द वापरला जातो.
‘ब्रॉन्झ डक’
एकही धाव न काढता आपल्या डावाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद होणारया फलंदाजासाठी हा शब्द वापरला जातो.
‘रॉयल डक’
सलामी फलंदाज जेव्हा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होतो तेव्हा रॉयल डक हा शब्द वापरला जातो.
‘पेअर, किंग पेअर’
जेव्हा एखादा फलंदाज कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शून्यावर बाद होतो तेव्हा त्याला ‘पेअर’ म्हटले जाते. तेच एखादा फलंदाज कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद होतो तेव्हा त्याला ‘किंग पेअर’ म्हटले जाते.
काही खेळाडू या डक्समुळेसुद्धा ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील पहिला डक ‘नेड ग्रेगरी’ या फलंदाजाने १८७७ मध्ये मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड सामन्यात मिळवला होता.
जगातील सगळ्यात यशस्वी फलंदाज म्हणून ओळखले जात असलेले ‘सर डॉन ब्रॅडमन’ हे आपल्या शेवटच्या सामन्यात शून्य धावसंख्येवर बाद झाले होते.
त्यांनी त्या सामन्यात फक्त ४ धावा केल्या असत्या तर त्यांची कसोटी सामन्यातील धावसंख्येची सरासरी १०० एवढी झाली असती.
प्रसिद्ध वेस्ट इंडिज गोलंदाज कर्टनी वॉल्श यांच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. कर्टनी वॉल्श यांच्या नावे सगळ्यात जास्त ‘डक्स’असण्याचा विक्रम आहे. ते ४३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
हाच विक्रम प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रेग पर्क्स यांच्या नावे आहे. ते चक्क १५६ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. मार्वन अटापटू हा माजी श्रीलंकन कर्णधार कसोटी सामन्यात २२ वेळा शून्यावर बाद झाला आहे. कोणत्याही वरच्या क्रमातील फलंदाजासाठी हा एक विक्रम आहे. कारकिर्दीच्या सुरूवातीला पहिल्या सहा डावात तो ५ वेळा शून्यावर बाद झाला होता.
तसेच भारतीय गोलंदाज अजित आगरकर, ज्यांनी लॉर्डस सारख्या अवघड मैदानावर कसोटी शतक झळकावले आहे १९९९ च्या ऑस्ट्रेलिया दौरयात सलग ७ वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाले होते. यामुळेच त्यांना ‘बॉंबे डक’ हे टोपणनाव मिळाले होते.
१९१३ साली खेळल्या गेलेल्या एका सामन्यात तर सगळा संघच शून्य धावसंख्येवर बाद झाला होता. ८० धावांचा पाठलाग करत असताना संघाचे सगळे फलंदाज शून्य धावा करुन बाद झाले होते.
क्रिकेट हा खरंच रंजक खेळ आहे. फक्त चांगली कामगिरी करुनच विक्रम नावे होतात असे नाही तर काहीही न करता सुद्धा काही विक्रम खेळाडुंच्या नावे होतात. त्यातलाच एक म्हणजे ‘डक’.
कुठल्याही फलंदाजाला नको असलेला या ‘डक’पासून सगळेच जपून राहण्याचा प्रयत्न करत असतात एवढं नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.