या माणसाच्या प्रयत्नामुळे आज दिल्लीला स्वतंत्र विधानसभा आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ज्या काळात सरकारच्या विरोधात नुसतं बोललं तरी तुरुंगात टाकलं जात होतं, त्याकाळात देशबंधू यांनी सदृढ लोकशाहीसाठी बंधनमुक्त स्वतंत्र पत्रकारितेची गरज ओळखली होती. त्यांनी मोठया प्राणपणाने पत्रकारिता स्वातंत्र्याचा आवाज दाबणाऱ्या लोकांच्या विरोधात भूमिका घेतली. इतकंच नाहीतर तत्कालीन प्रांतिक सरकारांच्या वृत्तपत्रांवर आणि त्यांच्यातील जाहिरातींवर कर लावण्याचा कुटील डावाला देखील हाणून पाडलं होतं.

पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असल्यामुळे पत्रकारितेला उद्योग बनवून त्यावर कर लादण्याच्या प्रक्रियेविरोधात ते ठामपणे उभे होते.

देशबंधू संविधान सभेचे सदस्य असताना जेव्हा त्यांच्यासमोर वृत्तपत्रातील जाहिरातींवर कर लावण्याची मागणी ठेवण्यात आली त्यावेळी त्यांनी वृत्तपत्रांची बाजू मांडताना म्हटले होते की,

वृत्तपत्र हा काही उद्योग नाही. हे जगविख्यात सत्य आहे. भारतीय पत्रकारितेने समाज सेवेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण समोर ठेवले असून त्यांच्या व्यवहार्यतेचा मला अभिमान आहे .

त्यांनी यासाठी संदर्भ म्हणून अमेरिकन कोर्टाच्या एका जजमेंटचा हवाला दिला होता. ज्यानुसार वृत्तपत्रांवर दोन टक्के कर लावण्याच्या अमेरिकन सरकारच्या प्रयत्नाला तेथील न्यायालयाने हाणून पाडलं होतं.

त्या निकालातील महत्वपूर्ण मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना देशबंधू म्हणाले होते की, सध्याच्या काळात सामान्य लोकांसाठी माहितीचे सर्वोत्तम आणि एकमेव साधन असणाऱ्या वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे दायित्व आहे. पत्रकारिता समाजातील सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींवर प्रकाश टाकून सरकारचे त्याकडे लक्ष वेधून घेण्याची ताकद बाळगते. लोकांना देशातील सरकार आणि धोरण यांची व्यवस्थित माहिती करून देते, जेणेकरून कुठलंही सरकार चुकीचा व्यवहार करताना आढळल्यास त्यांच्यावर वचक बसेल आणि त्यांच्या मनात धास्ती निर्माण होईल.

पत्रकारिता जर मुक्तपणे काम करू शकली नाही तर सरकारच्या धोरणांची चिकित्सा मागे पडेल आणि त्यातून अजून हुकूमशाही प्रवृत्तीची निर्मिती होईल. कर लावण्याची पद्धत ही त्यांच्यासाठी आहे ज्यांना काहीतरी फायदे मिळणार आहेत, पत्रकारितेचे तसे नसून ती एक जनसेवा आहे ज्या माध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोहचवली जाते आणि जाहिरातीच्या पैशातून ती पत्रकारिता टिकवून ठेवली जाते, जर ह्या व्यवस्थेवर कर आकारणी झाली तर ही व्यवस्था कोलमडून पडेल आणि हे लोकशाहीचा दृष्टीने कुठल्याही प्रकारे हिताचे नाही आहे.

देशबंधू यांनी ब्रिटिश राजवटीत आर्य समाजी संत स्वामी श्रद्धानंदांच्या सहकार्याने रोजाना तेजची सुरुवात केली. कालांतराने ते त्या वृत्तपत्राचे सर्वस्वी मालकी हक्क मिळवून ते चालवू लागले.

पुढे त्यांची भेट जेष्ठ पत्रकार रामनाथ गोयंका यांच्याशी झाली आणि त्यांनी एकत्र इंडियन न्यूज क्रोनिकलची सुरुवात केली. देशबंधू यांच्या मृत्युनंतर ह्या वृत्तपत्राचे नामकरण द इंडियन एक्सप्रेस असे करण्यात आले जे आजही छापले जाते.

हे तेच वृत्तपत्र आहे ज्याने वेळोवेळी लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या एककेंद्री राजवटींच्या विरोधात टोकाची पत्रकारिता केली आहे. देशबंधू यांच्या मूल्यांमुळेच हे शक्य झाले आहे.

आजच्या काळात पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून ते देखील एक बिझनेस मॉडेल झाले आणि देशबंधू यांच्या काळातील तत्वे आजच्या पत्रकारितेत दुर्दैवाने आढळून येत नाही. पण देशबंधू यांचा काळ वेगळा होता, ब्रिटिश राजवटींच्या दमनकारी कार्यकाळात देशबंधू मुक्त पत्रकारितेसाठी प्राणपणाने लढा देत होते. त्यांनी आपलं सबंध आयुष्य मुक्त पत्रकारितेच्या सक्षमीकरणासाठी वेचलं होतं.

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील बडी पहाडी या गावात १४ जून १९०१ साली देशबंधू यांचा जन्म झाला. रती राम गुप्ता असे त्यांचे नाव होते. त्यांचे घराणे हे विद्वान लोकांचे घराणे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे वडील शदिराम हे एक वैदिक पंडित होते. त्यांच्या वडिलांना उर्दूची देखील जाण होती आणि त्यांनी उर्दूत देखील अनेक काव्यांची रचना केली होती.

पानिपतच्या एका मदरशात शिक्षण घेतल्यानंतर ते सेंट स्टीफन कॉलेजात शिक्षणासाठी गेले. त्याठिकाणी त्यांनी शिक्षणाबरोबर स्वातंत्र्यता सेनानी आणि उद्योगपती जमानालाल बजाज यांचा सहाय्यक म्हणून देखील काम केले. त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड घडले ज्यामुळे त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला.

त्यांनी स्वातंत्र्यता चळवळीत उडी घेत, असहकार चळवळीत सहभाग नोंदवला. त्यांनी २२ ऑक्टोबर १९२० ला भिवाणी येथे महात्मा गांधींचे भाषण ऐकले. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या हेडमास्तरला पत्र पाठवून आता ते यापुढे कॉलेजला शिक्षण घेण्यास असमर्थ असल्याचे कळवले. त्यांचे हेडमास्तर एस के रुद्र देखील स्वातंत्र्यता समर्थक असल्याने त्यांनी देशबंधू यांना परवानगी दिली.

महात्मा गांधीं आणि स्वामी श्रद्धानंदानी रतीराम गुप्ता यांना ‘देशबंधू’ ही उपाधी देऊन सन्मानित केले होते.

स्वातंत्र्यता चळवळीत सहभागी होण्याअगोदर देशबंधू हिंदूंमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे काम करणाऱ्या आर्य समाजासाठी कार्य करत.

काँग्रेसचे सदस्य म्हणून देशबंधू यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी हरियाणा आणि दिल्लीच्या परिसरात अनेक आंदोलन केली होती. वयाचा १९ व्या वर्षी त्यांच्यावर पहिली ब्रिटिश कारवाई करण्यात आली होती.

सुरुवातीला ते लाला लजपतराय यांच्या विचाराने भारावून गेले होते. ते लाला लजपतराय यांचे सहाय्यक देखील बनले, लाला लजपतराय यांच्या सांगण्यावरून त्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यात मौलिक योगदान दिले होते.

१९३५ साली ब्रिटिश संसदेत भारत सरकार कायदा पारित करण्यात आला. त्यावेळी १९३७ सालच्या निवडणुकीत देशबंधू गुप्ता आणि श्रीराम शर्मा हे दोनच सदस्य होते ज्यानी काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब प्रांतात विजय संपादन केला होता. त्यांच्या पंजाब प्रांतिक मंडळातील उत्कृष्ट कार्यामुळे संविधान सभेत प्रतिनिधी म्हणून बोलवण्यात आले.

फाळणीच्या वेळी दिल्लीत उसळलेल्या दंगलीला शांत करण्यात देखील देशबंधू यांनी महत्वपूर्ण मौलिक योगदान दिले होते. त्यांनी शहराच्या विविध भागांना भेट दिली आणि तिथल्या धार्मिक दुफळी निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात सामन्य लोकांची जनजागृती केली.

दिल्लीत झालेल्या स्थलांतराला लक्षात घेऊन दिल्लीला संसदेत मोठे प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी देखील देशबंधू यांच्या वतीने करण्यात आली. त्यांनी सांगितलं की १९४१ साली जी लोकसंख्या ९ लाख होती, ती आता १९ लाख झाली आहे, यामुळे एवढ्या लोकसंख्येला पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे अत्यावश्यक आहे.

त्यांनी दिल्लीसाठी वेगळ्या विधिमंडळाची मागणी केली, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता. पण पुढे दोघांमध्ये संधी झाली आणि दिल्लीला स्वतंत्र विधिमंडळ तर मिळालं पण दिल्ली कायम केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. यामुळेच देशाचा राजधानीत देशबंधू यांना मोठा सन्मान दिला जातो.

२१ नोव्हेंबर १९५१ ला वयाचा ५० व्या वर्षी देशबंधू गुप्ता यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः हजेरी लावली होती. इतकंच नाही त्यांनी स्वतः खांदा देखील दिला होता.

असं म्हणतात की जेव्हा नेहरूंना देशबंधू गेल्याची बातमी मिळाली त्यावेळी त्यांनी ‘आज दिल्ली सुनी हो गयी’ अशी प्रतिक्रिया दिली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!