लालूंच्या आदेशावरून आडवणींना अटक केली आणि आता भाजप सरकारमध्येच मंत्री बनलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कित्येक वर्षे सुरु असलेल्या अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या वादावर अखेर गेल्या वर्षी पडदा पडला आणि अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यावेळी हा मुद्दा खूपच संवेदनशील बनला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेमुळे हा विवादित मुद्दा संपूर्ण देशभर पसरला. या रथयात्रेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील एक सामान्य कारसेवक म्हणून सामील झाले होते. १९९२ साली उत्तर प्रदेश मधील बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि त्यानंतर देशभर जी दंगल उसळली त्याची बीजे अडवाणींच्या या रथयात्रेतच असल्याचे म्हटले जाते.

आजही या रथयात्रेचा उल्लेख करताना भाजप कार्यकर्त्यांचा उर अभिमानाने भरून येतो. अयोध्येपासून या रथयात्रेला सुरुवात झाली. परंतु याला सुरुवातीपासून काही लोकांचा विरोध होता. आडवाणींची ही रथयात्रा देशात सांप्रदायिक भेदभाव रुजवण्यास कारणीभूत ठरेल असाही काहींचा कयास होता. अशा प्रकारच्या रथायात्रेमुळे सामाजिक भेदभावाला आणि धार्मिक असंतोषाला खतपाणी मिळेल असाही आरोप केला जात होता. परंतु यातील कुठल्याही आरोपाला भिक न घालता अत्यंत धैर्याने आणि संयमाने आडवाणींनी या यात्रेला सुरुवात केली. त्यांच्या या संकल्पात बाधा आणि अडथळा आणला जाईल असा त्यांचा कयास होता. 

आडवाणींची ही रथयात्रा खूपच गाजली. रथयात्रा म्हटल्यावर जशी आडवाणींची आठवण काढली जाते तसीच आठवण होते ती बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांची. यामागे कारणही तसेच आहे.

कारण, आडवाणींची ही रथयात्रा जेंव्हा बिहारमध्ये पोहोचली तेंव्हा लालू प्रसाद यांच्या सांगण्यावरून लालकृष्ण आडवाणींना अटक करण्यात आली होती.

लालू प्रसाद यादव यांनी ‘गोपालगंज टू रायसीना: मे पॉलिटिकल जर्नी’ या आपल्या आत्मचरित्रातही या घटनेचा उल्लेख केला आहे. या आपल्या आत्मकथेत लालू लिहितात, “आडवाणीजी म्हणाले होते, बघतोच कोण माझी रथयात्रा रोखून दाखवतो. मी पण, यावर पलटवार करत म्हणालो होतो, मी तर आईचे आणि म्हशीचे दोन्हीचे दुध पिले आहे, तुम्ही बिहारमध्ये या तुम्हाला दाखवतो.”

बिहारमधील सांप्रदायिक शांतता अबाधित राखण्यासाठी लालकृष्ण आडवाणी यांना अटक करणे गरजेचे होते, असे लालू प्रसाद यादव यांचे मत होते. आरएसएस आणि भाजप यांनी १९८९ मध्ये जेंव्हा रामशीला पूजनासाठी अशीच यात्रा काढली होती तेंव्हा बिहारमध्ये मोठी सांप्रदायिक दंगल घडली होती. या दंगलीत दीड हजारपेक्षा जास्त लोक मारले गेले होते. हा इतिहास पाहता बिहारमध्ये पुन्हा काहीही गडबड होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी लालकृष्ण अडवाणीजींना अटक करणे आवश्यक होते, असे स्पष्टीकरण लालुजींनी या पुस्तकात दिले आहे. तसेही त्यांच्या आधी बिहारमध्ये जी जी सरकारे सत्तेत आली त्यांच्या नाकर्तेपणामुळे बिहारची ओळख एक दंगलग्रस्त राज्य अशीच झाली होती.

२३ ऑक्टोबर १९९० रोजी समस्तीपुरमध्ये ही यात्रा पोहोचली आणि समस्तीपुरचे जिल्हाअधिकारी आर. के. सिंह यांनी लालकृष्ण आडवाणींना अटक केली. आर. के. सिंह यांनी आडवाणींना अटक केली आणि त्यांना मायुराक्षी सिंचन परीयोजनेच्या निरीक्षण भवनात ठेवण्यात आले. यावेळी आडवाणींच्या सोबत प्रमोद महाजन देखील होते. दोघांनाही दोन वेगवेगळ्या खोल्यांत बंद करण्यात आले होते. या सिंचन परियोजन निरीक्षण भवनाच्या आजूबाजूचा १५ किमीचा परिसर सील करण्यात आला होता. कुणालाही त्यांना भेटण्याची परवानगी दिली नव्हती.

इथे आडवाणींना अत्यंत सुरक्षित आणि सुस्थित ठेवण्यात आले होते. त्यांच्या सन्मानाला धक्का लागेल असे कुठलेही कृत्य होणार नाही याचीही पूरेपर दक्षता घेण्यात आली होती. बंदी असले तरी ते एका राष्ट्रीय पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, याचे भान बिहार सरकारलाही होते.

त्यावेळी लालू प्रसाद हे बिहारचे मुख्यमंत्री होते. लालकृष्ण अडवाणी यांच्या या अटकेबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले होते की, राज्यातील शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी त्यांना हे पाउल उचलावे लागले.

ज्या आर. के. सिहांनी त्यावेळी आडवाणींना अटक केली ते आज भाजपच्या वतीने बिहारच्या आरा मतदार संघातून खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत. शिवाय, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळाले आहे.

या रथयात्रेशी संबधित आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आडवाणी ज्या रथावरून प्रवास करत होते, त्या रथाचे सारथ्य करणारा ड्रायव्हर सलीम मक्कानी हा एक मुस्लीम युवक होता. आडवाणींना अटक करून सिंचन भवनात ठेवण्यात आले पण या सलीम मक्कानीलाही त्यावेळी अटक करण्यात आली होती आणि त्याला समस्तीपुरच्या विश्रामगृहात बंदी बनवून कैद केले होते. तसेच त्याच्यावर कलम १४४चे उल्लंघन केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.

सलीम त्यावेळी फक्त २६ वर्षांचा होता. पण, जेंव्हा केंव्हा इथून माझी सुटका होईल तेंव्हा मी अयोध्येला जाईन अशी प्रतिक्रिया त्यावेळी सलीमने दिली होती. सलीम मूळचा मुंबईचा होता. अलीकडेच कोरोनाच्या महामारीत आडवाणींच्या या सारथ्याचा मृत्यू झाला.

या घटनेबद्दल आपले मत व्यक्त करताना वाजपेयी म्हणाले होते, लालकृष्ण आडवाणी यांच्या या रथयात्रेला कुठेही अडथळा येणार नाही असे वचन आम्हाला केंद्र सरकारने दिलेले असूनही बिहारमध्ये ही रथयात्रा रोखण्यात आली. सरकारने आमची फसवणूक केली आहे.

बिहारमधील ही रथयात्रा आटोपून लालकृष्ण आडवाणी अयोध्येत परत येणार होते आणि त्याचवेळी अयोध्येत राममंदिरासाठी पाया रचला जाणार होता. परंतु या अटकेनंतर सर्वच प्रकरण चिघळत गेले. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये यावर सुनावणी करताना दोन्ही समुदायांच्या भावनांचा आदर करत यावर तोडगा दिला आणि शेवटी राम मंदिराचा मार्ग सुकर झाला.

परंतु रामजन्मभूमीचा वाद असो की राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपची ओळख दृढ करण्याचे काम असो, याचे सारे श्रेय लालकृष्ण आडवाणी यांच्या या रथयात्रेला आणि त्यांनी पक्षाप्रती केलेल्या निष्ठापूर्वक समर्पणालाच दिले पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!