या वीरांगनेने १८५७च्या उठावात एकटीनेच ३० इंग्रजांना कंठस्नान घातलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताच्या इतिहासात घडून आलेल्या अनेक संग्रामात महिलांचे अमूल्य योगदान होते. झाशीची राणी, बेगम हजरत महल, लक्ष्मी सहगल यांच्यासारख्या अनेक महिलांच्या शौर्यकथानी इतिहास व्यापलेला आहे.

या सर्व वीरांगणांमध्ये एक नाव होते उदा देवी यांचे, पासी जातीच्या वीरांगना असलेल्या उदा देवींनी ३० ब्रिटिश अधिकाऱ्यांना कंठस्नान घातले होते. या शूर महिलेच्या इतिहासावर एकदा नजर टाकुया…

उदा देवींचा जन्म प्रसिद्ध अवध संस्थानातील उजरियाव या गावात झाला. त्यांचा जन्म कधी झाला याची माहिती आज उपलब्ध नाही. वयात आल्यावर त्याकाळातील इतर मुलींप्रमाणेच त्यांचा देखील विवाह करण्यात आला. मक्का पासी नावाच्या युवकाशी त्यांचा विवाह करण्यात आला. सासरी त्यांचे ‘जगराणी’ असे नामकरण करण्यात आले.

१८४७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात एकीकडे हिवाळा संपून वसंत ऋतूचे आगमन होत होते तेव्हा अमजद शहांचे पुत्र वाजीद अली शहा हे अवध – लखनऊ संस्थानच्या सहाव्या नवाब पदावर विराजमान झाले. सत्ता हाती आल्यावर त्यांनी लगेचच ब्रिटिशांच्या विरोधात आघाडी उघडली. त्यासाठी त्यांनी आपल्या सैन्य दलात नवीन लोकांची भरती करण्यास सुरुवात केली.

तेव्हाच उदा देवीचे पती मक्का पासी वाजिद अली शहांच्या सैन्य दलात सहभागी झाले. आपला नवरा संस्थानाच्या रक्षेसाठी सैन्य दलात सहभागी होतो आहे हे बघून उदा देवींनी देखील सैन्यदलात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

वाजिद अली शहा सत्ताधीश झाल्यावर १० वर्षांनी १८५७ साली देशभरात ब्रिटिशविरोधी वातावरण तापायला सुरुवात झाली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी पहिले रणशिंग फुंकले गेले. भारत भूमीवरील वेगवेगळ्या संस्थांनांच्या सत्ताधीशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात मोठा उठाव केला. १० जून १८५७ रोजी इंग्रजांनी अवधवर हल्ला चढवला.

लखनऊच्या इस्माईलगंज येथे मौलवी अहमद उल्लाह शहा यांच्या नेतृत्वात एक सैन्य तुकडी लढा देत होती. उदा देवी यांचे पती मक्का पासी याच तुकडीत होते. इंग्रजांशी लढताना मक्का पासी यांना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूचा बातमीने उदा देवींना प्रचंड शोक झाला. त्या प्रतिशोध घेण्यासाठी पेटून उठल्या.

वाजिद अली शहाच्या महिला बटालियनमधल्या त्या सर्वात शूर सेनानी बनल्या. पुढे बेगम हजरत महल यांनी त्यांची महिला सैन्य तुकडीच्या प्रमुख पदी निवड केली. त्यांच्यावर लखनऊचा क्रांतिकारी लढा चालू ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

लखनऊची सिकंदर बाग जी वाजिद अली शहाने स्वतःसाठी बनवून घेतली होती, तिचे १८५७ च्या उठावावेळी ब्रिटिश सैनिकांच्या स्मशानात रूपांतर झाले. याच ठिकाणी उदा देवींनी आपल्या शौर्याने इंग्रजांची पळताभुई थोडी केली होती. नोव्हेंबर १८५७ मध्ये लखनऊच्या वातावरणात बदल झाला पण क्रांतीची ज्योती तशीच धगधगत होती. सैनिकांच्या तुकड्यांनी सिकंदर बागमध्ये आपली बाजू भक्कम केली होती. या सैनिकांमध्ये उदा देवी यांचा देखील समावेश होता.

पुरुषांची वस्त्रे परिधान करून हातातील बंदुकीत गोळ्या भरून त्या इंग्रजी फौजेच्या प्रतीक्षेत एका पिंपळाच्या झाडावर जाऊन बसल्या होत्या.

काही काळाने इंग्रजी फौज बागेत घुसली आणि उदा देवींनी बंदुकीत गोळीबार करण्यास सुरुवात केली, बघता बघता ३० इंग्रजांचा त्यांनी फडशा पाडला. त्यांची इतकी दहशत होती की त्यांच्या धाकाने अनेक इंग्रज सैनिक बागेच्या दरवाज्यावरच ताटकळत उभे होते.

पुढे दोन्ही बाजूने गोळीबाराची तीव्रता वाढत गेली. कोण कुठून गोळी चालवत आहे, हे समजणे कठीण होऊन बसले होते. इंग्रजांना कळतच नव्हते की गोळीबार कोण करतंय कारण झाडाच्या फांदीवर बसून कोणी गोळी चालवत आहे याकडे इंग्रजांचे लक्ष नव्हते. काही काळाने त्यांचे लक्ष झाडाच्या फांदीकडे गेले आणि उदा देवींना त्यांनी बघितले. त्यांच्या पुरूषी पेहरावामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. क्षणार्धात उदा देवी जमिनीवर कोसळल्या. त्या खाली कोसळल्यावर इंग्रज सैनिक त्यांच्याजवळ आले आणि त्यांना कळून चुकले, ज्या व्यक्तीला पुरुष समजले होते ती एक स्त्री आहे.

ही तीच स्त्री आहे जिने इंग्रजांचा ३० सैनिकांना कंठस्नान घातले होते. तिच्या या पराक्रमाने इंग्रज अधिकारी देखील प्रभावीत झाले. त्यांनी देखील आपल्या डोक्यावरच्या टोप्या उतरवून या वीरांगनेला श्रद्धांजली अर्पण केली. सिकंदर बागच्या या भीषण युद्धात २ हजार भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले होते.

या युद्धाच्या भीषणतेचे वर्णन करणारे छायाचित्र प्रसिद्ध ब्रिटिश छायाचित्रकार फेलिस बितो यांनी काढले होते. त्या छायाचित्रात या बागेत पडलेला मृतदेहांचा खच या युद्धाच्या भीषणतेची गाथा आपल्यासमोर उलगडून ठेवतो. विल्यम हार्वर्ड रसेल या लंडन टाईम्स या वृत्तपत्राच्या पत्रकाराने या संपूर्ण घटनाक्रमाचे वार्तांकन केले होते, यात त्यांनी उदा देवींच्या अफाट पराक्रमाचा देखील उल्लेख मोठ्या कौतुकाने केले होते.

उदा देवी आणि त्यांच्याप्रमाणे असंख्य महिलांनी भारताच्या स्वातंत्र्यता संग्रामात मोठे योगदान दिले होते. यातील बऱ्याच महिला आज विस्मृतीत गेल्या आहेत. त्यांच्या असीम त्यागाला त्रिवार वंदन!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!