आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लहान मुलांचा आवडता खेळ आणि प्रेमीयुगुलांचं आवडतं बर्थडे गिफ्ट म्हणजे टेडी बियर. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच टेडी बियर स्वतःकडे आकर्षित करतो. अशा या सगळ्यांच्या लाडक्या टेडी बियरची गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
टेडी हे खरंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष, थिओडोर रुझवेल्ट यांचं टोपणनाव. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव एका लहान मुलांच्या खेळण्याला कसं बरं पडलं असेल?
तर झालं असं की, एकदा अमेरिकेचे गव्हर्नर एच अँड्र्यु यांच्या विनंतीवरून थिओडोर रुझवेल्ट हे मिसिसिपीजवळ शिकारीसाठी गेले होते. त्यांना तीन दिवसात एकही अस्वल दिसले नाही. पण त्यांच्यासोबत शिकारीला आलेल्या बाकीच्या मित्रांनी मात्र अस्वल शोधून मारलेसुद्धा. शेवटी रुझवेल्ट यांचा शिकारीचा दौरा वाया जाऊ नये म्हणून त्यांच्या सेवकांनी एक म्हातारे अस्वल पकडून एका झाडाला बांधले, जेणेकरून राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट त्या म्हाताऱ्या अस्वलाला गोळी मारून त्याची शिकार करू शकतील.
पण रुझवेल्ट यांना मात्र ही गोष्ट पटली नाही. त्यांच्या मते शिकार करण्याचा हा काही मार्ग नव्हता.
अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाची कोणतीही गोष्ट फ्रंट पेज न्यूज बनते. इथेही तेच झालं, रूझवेल्टच्या बातमीनं वर्तमानपत्रांचे मथळेच्या मथळे भरले होते. यावरच क्लिफोर नावाच्या एका कार्टूनिस्टने कार्टून काढले. १६ नोव्हेंबर १९०२ च्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या मुख्य पानावर छापून आलेल्या या कार्टूनवरूनच टेडी बियरचा जन्म झाला.
न्यूयॉर्क येथे मॉरीस मिचम नावाचा एक दुकानदार होता. त्याचे एक लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान होते. द वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापून आलेले कार्टून पाहून त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना चमकली. त्याने त्याच्या बायकोला असे खेळणे बनवायला सांगितले. त्याच्या बायकोने बनविलेले ते अस्वल त्याने आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात लावले.
राष्ट्राध्यक्षांच्या घटनेवरून सुचलेल्या या खेळण्याला त्यांचेच नाव देण्याचे त्याने ठरवले. यासाठी त्याने थिओडोर रुझवेल्टला परवानगी मागितली. आणि त्याने त्याच्या दुकानात टेडी बियर विक्रीस ठेवले.
क्ली फोर यांचे टेडी बियरचे कार्टून आधीच सगळीकडे गाजले होते. त्यामुळे या टेडी बियर खेळणीवर लोकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. मिचमच्या या कल्पनेला प्रचंड यश मिळाले. त्याचा टेडी बियर सगळीकडे प्रसिद्ध झाला. आता त्याने टेडी बियर बनवण्याची स्वतःची एक कंपनीच सुरु केली. ही कंपनी पण लागली.
आता त्याने टेडी बियर मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी जर्मनीच्या स्टेप कंपनीसोबत करार केला. जर्मनीतसुद्धा टेडी बियरला खूप मागणी होती. तिथल्या लोकांना तर रुझवेल्ट वॉल किस्सा माहितीही नव्हता.
हळूहळू जगभरात हे टेडी बियर पसरले. सगळ्यांच्या घरोघरी दिसू लागले.
आज त्याचे अनेक लोकप्रिय ब्रँड आहेत. लोकांनी टेडी बियरवर आधारित विविध पुस्तकेसुद्धा लिहिली, एवढेच नव्हे तर काही टीव्ही शोज आणि चित्रपटांमधूनसुद्धा टेडी बियर लोकांसमोर येत गेला आणि लोकांना त्याचं ते लोभसवाणं रूप भावलं. आज तर टेडी बियरचे एक म्युझियम देखील आहे.
कोणीतरी शिकारीला म्हटलं म्हणून तुम्ही टेडी बियरला भेटले याची आज कोणाला कल्पनाही नसेल!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.