शापूरजी साक्लतवाला: भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेला ब्रिटीश खासदार

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ते ब्रिटीश पार्लमेंटमध्ये निवडून येणारे तिसरे भारतीय आणि ब्रिटीश कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सदस्य होते. दक्षिण लंडनमधील कामगार वर्गाचे प्रतिनिधी म्हणून ते ब्रिटीश पार्लमेंटमध्ये निवडून गेले. लंडनमध्ये राहून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. ब्रिटनमध्ये त्यांना टायटन ऑफ द कम्युनिस्ट मुव्हमेंट” म्हणून ओळखले जाते.

ग्रेट ब्रिटनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्य सभागृहाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लंडनमधील आंबेडकर हॉलपासून काही अंतरावरच हा हॉल आहे.

त्यांचं नाव होतं शापूरजी साक्लतवाला.

जवाहरलाल नेहरूंनी देखील “देशाबाहेर राहणारे प्रखर देशभक्त” या शब्दात त्यांची स्तुती केली होती. मात्र शापूरजी यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आज बहुसंख्य भारतीय अनभिज्ञ आहेत. जन्माने भारतीय असूनही ब्रिटीश पार्लमेंटपर्यंत ते कसे पोचले याचे कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

एका मुलाखतीत ते स्वतःच म्हणाले होते की, “या देशात (ब्रिटनमध्ये) राजकीय प्रगती साधायची असेल तर सध्याच्या राजकीय पक्षांचा आधार घेणे अत्यंत गरजेचे आहे.”

शापूरजी यांचा जन्म २८ मार्च १८७४ रोजी मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील दोराबजी साक्लतवाला हे कापसाचे व्यापारी होते. त्यांची आई जेरबाई या जमशेदजी नुसरवानाजी टाटा यांच्या भगिनी होत्या.

अगदी लहान वयातच शापूरजी स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षिले गेले. स्वातंत्र्य चळवळीत ते इतके गुंतले होते की शेवटी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना देशाबाहेर ठेवणेच हिताचे ठरेल अशा  धमकीवजा सूचना टाटा कुटुंबाला दिल्या.

१९०५ साली त्यांना मलेरियाची लागण झाली होती. याचेच निमित्त करून टाटा कुटुंबाने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला. भारतापासून दूर राहिल्याने ते स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहतील असा त्यांचा अंदाज होता. पण अर्थातच तो चुकीचा ठरला. शापूरजी ब्रिटनमध्ये राहूनही देशाच्या स्वातंत्र्याचा विचार विसरले नाहीत.

मलेरियाच्या उपचारासाठी ते एका हेल्थ स्पामध्ये राहत होते. इथे त्यांची ओळख सॅली मार्श हिच्याशी झाली. सॅली त्याच स्पामध्ये वेट्रेसचे काम करत होत्या. सॅलीमुळे त्यांना इंग्लंडमधील कामगार वर्गाचे जीवन जवळून पाहता आले. २० व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमधील कामगारांची परिस्थिती खूपच हलाखीची होती.

त्याकाळी केलेल्या एका सर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली की, ब्रिटनमधील २५% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालचे जीवन जगत होती. किमान १५% लोक तरी कसेबसे आयुष्य रेटत होते. त्यांच्याकडे फक्त अन्न, घरभाडे, इंधन आणि कपडे यापुरतेच पैसे होते. वर्तमानपत्र विकत घेणे किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे यासारखी ‘चैन’ त्यांना परवडणारी नव्हती.

१०% लोक तर यापेक्षा हलाखीचे जीवन जगत होते. त्यांना तर पुरेसे अन्न देखील मिळत नव्हते.

१९०६ साली ब्रिटनमध्ये उदारमतवादी सरकार निवडून आले आणि त्यांनी काही सुधारणा घडवून आणल्या. त्यावर्षीपासून गरीब मुलांना शाळेत मोफत जेवण दिले जाऊ लागले.

१९०९ साली वृद्धांना पेन्शन देण्याची योजना अंमलात आणली गेली. ७० वर्षावरील वृद्धांना आठवड्यातून फक्त पाच शिलिंग देण्यात येत असत. एवढीशी रक्कमसुद्धा त्याकाळी खूप मोठी मानली जायची. ही फक्त सुरुवात होती.

इंग्लंडमध्ये शापूरजींनी लिबरल आणि स्वतंत्र मजूर पक्षात बरीच वर्षे घालवली. पण, यापैकी कुणीच भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने विचार करत नाही, असे लक्षात आले. मग, त्यांनी नव्याने स्थापित झालेल्या कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.

१९२१मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला कारण या पक्षाचा स्वातंत्र्य संग्रामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक वास्तववादी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय, त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचाही मोठा प्रभाव होता.

शापूरजी यांनी ब्रिटनमधील कामगारांचे अधिकार तसेच भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हाउस ऑफ कॉमन्समध्ये मांडला. त्यांनी सातत्याने या दोन प्रश्नांचा पाठपुरावा केला.

शापूरजी यांची कन्या सेहरी साक्लतवाला यांनी आपल्या वडिलांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, “पारशी समुदाय मुळातच उदारमतवादी आणि कनवाळू समाज आहे. गरिबांच्या वेदना कमी करण्यासाठी पारसी बांधव कार्यरत असतात. पारसी समाज नेहमीच गरिबांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. शापूरजी देखील याच समुदायातून आले होते. मात्र गरिबांचे कष्ट कमी करण्याऐवजी गरिबीच नष्ट झाली पाहिजे, असे त्यांचे मत होते. फक्त भारतातीलच गरिबी नाही तर, संपूर्ण जगातील गरिबी नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटत असे.”

शापूरजींचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. १९२६मध्ये जनरल स्ट्राईकच्या सुरुवातीला त्यांनी हाईड पार्क येथे एक भाषण दिले. कोळसा खाणीतील कामगारांच्या अधिकारासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या या कामगारांना त्यांनी पाठींबा दर्शवला. कामगारांना उद्देशून केलेल्या या भाषणामुळे त्यांना देशद्रोही ठरवून दोन महिन्यांसाठी तुरुंगात डांबण्यात आले.

त्यांची चेतवणारी भाषणे आणि निर्भीडपणे व्यक्त होण्याच्या पद्धतीमुळे पोलीस आणि राजकारण्यांचा सतत त्यांच्या मागे ससेमिरा लागलेला असे. १९२७मधील त्यांचा भारत दौरा खूपच यशस्वी ठरला. परंतु इंग्लंडच्या पुराणमतवादी सरकारने त्यांच्या भारत दौऱ्यावर बंदी घातली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या या बंदीला कामगार पक्षानेही पाठींबा दिला.

१९२९ मधील सार्वजनिक निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर ते पुन्हा कधीच पार्लमेंटमध्ये निवडून जाऊ शकले नाहीत.

ब्रिटनमध्ये राहूनही भारतीय स्वातंत्र्यासाठी हरेक प्रयत्न करण्याची त्यांची तयारी होती. त्यासाठी त्यांची अविरत धडपड देखील सुरु होती.

१६ जानेवारी १९३६ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते ६१ वर्षांचे होते. शापूरजी यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा भाग्याचा दिवस पाहता आला नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.

अशाच कितीतरी अज्ञात देशभक्तांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगी शकतोय. त्यांच्या कार्याला सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!