पुण्यातील या उद्योजकाने सर्व भारतीयांना कोरोनाची लस मोफत देण्याचा विडा उचललाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोरोना महामारीने संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडले आहे. सध्या जगभरातील जवळपास देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु, साथीच्या या रोगावर लस कधी उपलब्ध होईल याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या घडीला कोविडच्या लसीच्या संशोधनाचे काम वेगाने सुरु आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या लसीला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे दिसत आहे. यासाठी भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी पुढाकार घेतला आहे. लसीची चाचपणी यशस्वी होण्या आधीच पूनावाला यांनी या लसीचे संशोधन करणाऱ्या फार्मा कंपनीसोबत करार केला आहे. ही लस पहिल्या काही टप्प्यातील चाचणीत यशस्वी ठरली आहे. सध्या मानवी शरीरावर चाचणीसाठी प्रयोग सुरु आहेत.

या प्रयोगात यश मिळताच मोठ्या प्रमाणात या लसीचे उत्पादन केले जाईल. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांनी आधीच या कंपनीशी करार केलेला असल्याने भारतात कोरोनावरील लस निर्मितीचे काम लवकरच सुरु होईल अशी आशा आहे.

अदार पूनावाला यांनी भारतासाठी ५० कोटीहून अधिक लस निर्माण करण्याची विडा उचलला आहे.

जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. एकीकडे लोक लॉकडाऊनला वैतागले आहेत तर दुसरीकडे सरकारकडे काही उपाय नसल्याने देशोदेशीची सरकारे कोरोनापुढे हतबल झाली आहेत. अशा सगळ्या विमनस्क परिस्थिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोव्हीड लसीची मानवावर केली गेलेली चाचणी यशस्वी होत असल्याच्या बातमीने मोठा दिलासा दिला आहे.

शिवाय, अमेरिकेतील एका फार्मा कंपनीने मानवी शरीरावर केलेल्या लसीच्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. ही कंपनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबतच या लसीच्या संशोधनावर काम करत आहे. या सकारात्मक बाबीमुळे जगभरातील लोकांमध्ये एक आशेचा किरण दिसत आहे.

ही लस तयार होताच याचे अधिकार कसे मिळवायचे हा आता देशोदेशींच्या सरकारसमोरील मोठा प्रश्न असणार आहे. कारण, लसीचे अधिकार घेऊन मगच ते आपल्या देशातील नागरिकांपर्यंत पोचवता येतील.

भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीयाने ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदारी घेतली आहे. त्यामुळे ऑक्सफर्डची लस यशस्वी ठरली तर भारताला या लसीचे अधिकार मिळवण्यात काहीच अडचण येणार नाही.

शिवाय, ऑक्सफर्ड सोबत भागीदारी असणाऱ्या एस्ट्राझिनॅक या कंपनीशी देखील करार केलेला आहे. अमेरिकेतील ही कंपनी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दोन्ही एकत्रितपणे लसीवर संशोधन करत आहेत.

ऑक्सफर्डची ही लस यशस्वी झाल्यास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचे १०० कोटी डोस तयार करणार आहे. यातील ५०% भाग भारतासाठी राखीव असणार आहे. तर, उरलेला ५०% वाटा हा गरीब आणि विकसनशील राष्ट्रांना देण्यात येणार आहे.

आदर पूनावाला हे सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचे वडील सायरस पूनावाला यांनीच १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. ही कंपनी पूनावाला ग्रुपचा एक भाग आहे.

आदर पूनावाला यांचे शिक्षण संयुक्त राज्य संघातील वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून पूर्ण झाले. २००१ साली ते या कंपनीत रुजू झाले. २०११ साली ते कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवडले गेले. कंपनीची आंतरराष्ट्रीय पातळीवर विकास करण्यात त्यांचा मोठा वाट आहे.

अलीकडेच त्यांनी मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे कोरोना टेस्टिंग कीट लॉंच केले. या सिस्टम संबधी ट्विट करताना आदर पूनावाला यांनी लिहिले होते की, “या सिस्टीमद्वारे एका दिवसात ४०० पेक्षा जास्त टेस्ट करता येतात. ज्यामुळे कोरोना टेस्टिंग करण्याची संख्या वाढवता येणे शक्य होते. शिवाय ही सिस्टीम हाताळण्यासाठी एकाच व्यक्तीची आवश्यकता असते. त्यामुळे कोव्हीड१९च्या टेस्टिंगसाठी अधिक मनुष्यबळ खर्ची घालण्याचीही गरज नाही. कोरोनाच्या या संकटात मनुष्यबळ वाचवण्यासाठी या सिस्टीमचा निश्चितच फायदा होईल.”

मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने देखील कोरोना टेस्टिंग लॅब उघडणे आता सोपे असल्याचे ट्विट केले होते.

आतापर्यंत कोरोना लसीच्या संशोधनात जे यश मिळाले आहे, ते पाहता या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस विकसित होईल आणि पुढच्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात सर्वसामान्य जनतेपर्यंत ही लस पोहोचवण्यात येईल, अशी देखील माहिती पूनावाला यांनी दिली.

एस्ट्राझिनॅक या फार्मा कंपनीसोबत करार केल्याने ही कंपनी भारताला तयार केलेले डोस विकणार आहेत. या कंपनीच्या लस संशोधनाला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे दिसत आहे.

“कोव्हीड-१९ लसीच्या चाचणीत आश्वासक परिणाम दिसत आहेत. या लसीच्या परीक्षणासाठी आम्हालाही परवाना मिळावा यासाठी आम्ही भारतीय नियामक मंडळाकडे अर्ज केला आहे. त्यांनी परवानगी देताच, आम्ही भारतातही या लसीची चाचणी सुरु करू. शिवाय, भारतात ही चाचणी यशस्वी ठरली तर, आम्ही भारतातच मोठ्या प्रमाणात लस निर्मिती सुरु करू.” अशी आशा आदर पूनावाला व्यक्त करतात.

 

भारतात या लसीचे १०० कोटी डोसचे उत्पादन केले जाईल अशा आशयाचे ट्विट आदर पूनावाला यांनी केले आहे. आदर यांच्या या ट्विटला उद्देशून स्वदेश फाउंडेशनचे संस्थापक रोनी स्क्रूवाला यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी असा काही प्रश्न विचारला आहे, की संपूर्ण नेटकऱ्यांचे लक्ष या ट्विट कडे लागून राहिले.

कोरोनापासून वाचण्यासाठी पारशी समुदायासाठी तुम्ही काही खास राखीव लसी ठेवणार आहात का? असा प्रश्न रोनी स्क्रूवाला यांनी केला आहे. 

पारसी समुदाय हा संख्येने इतका अत्यल्प आहे की, तो या धरतीवरील एक दुर्मिळ समुदाय आहे, असे म्हणावयास हरकत नाही. अशा दुर्मिळ होत चाललेल्या पारसी समुदायासाठी तुम्ही काही लसी राखीव ठेवल्या पाहिजेत. एक पारसीच जर या लसीच्या निर्मितीत पुढाकार घेणार असतील तर का ठेवू नये? असे काहीसे विनोदी अंगाने त्यांनी हे ट्विट केले आहे. 

या विनोदी अंगाने विचारलेल्या प्रश्नाला आदर पूनावाला यांनीही त्याच शैलीत उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “एका दिवासात आपण जितके उत्पादन करू ते जगातील सर्व पारसी बांधवांसाठी पुरेसे ठरेल आणि त्यांना कोरोनापासून सरंक्षण मिळेल.”

एस्ट्राजेनेकासोबत भागीदारी करून पुढच्या वर्षीच थेट शंभर कोटीच्या घरात या लसीची निर्मिती करणार असल्याचेही आदर पूनावाला म्हणाले.

आता सगळ्याच भारतीयांचे लक्ष ही लस कधी येते याकडेच लागले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!