आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद गेल्यावर्षी निकालात निघाला. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. आता हजारो लोक मंदिराच्या उभारणीच्या कामात जोडले गेलेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत मंदिराच्या मॉडेलमध्ये काही बदल करण्याची चर्चा देखील झाली होती. श्रीराम मंदिराचे डिझाईन तयार करण्याचे काम सोमपूरा परिवारातील चंद्रकांत सोमपुरा यांना देण्याचे निश्चित करण्यात आले.
१९८७ साली चंद्रकांत सोमपुरा यांनीच श्रीराम मंदिराचे जुने डिझाईन तयार केले होता.
अयोध्येतील श्रीराम मंदिर हा संपूर्ण देशाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देशवासी ज्याची आतुरतेने वाट बघतायत अशा या मंदिराचे डिझाईन तयार करणारी ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? जाणून घेऊया मंदिर वस्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्याबद्दल.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सोमपुरा परिवारातील गेल्या १६ पिढ्या मंदिराचे डिझाईन्स बनवण्याचेच काम करतायत. आज श्रीराम मंदिराचे डिझाईन तयार करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांच्या आजोबांनी गुजरातमधील सोमेश्वर मंदिराचे डिझाईन तयार केले होते.
या परिवारातील सर्व सदस्य मंदिराचे डिझाईन्स तयार करण्याचेच काम करतात. या परिवाराने जगभरात १३१पेक्षा जास्त मंदिराचे डिझाईन तयार केले आहे. फक्त देशातीलच नाही तर विदेशातील अनेक मंदिरांचे डिझाईन यांनीच तयार केले आहे.
चंद्रकांत सोमपुरा यांचे आजोबा प्रभाशंकर ज्यांनी सोमनाथ मंदिराचे डिझाईन बनवले होते, त्यांनी शिल्पशास्त्राची तब्बल १४ पुस्तके लिहिली आहेत.
भारतात मंदिराच्या बांधकामासाठी तीन प्रकारची शैली वापरली जाते. यात नागर, द्रविड आणि बैसर शैली अशा तीन प्रकारच्या शैली आहेत. यातील द्रविड शैली ही दक्षिण भारतातील मंदिरातून पाहायला मिळते तर नागर शैली ही उत्तर भारतीय मंदिरांचे वैशिष्ट्य आहे.
बैसर शैली ही नागर आणि द्रविड या दोन्ही शैलींचा मिलाप हा. विशेषत: भारताच्या मधल्या पट्ट्यात या शैलीतील मंदिरे पाहायला मिळतात. गुजरातचा सोमपुरा परिवार हा नागर शैलीमध्ये पारंगत आहे. मथुरेतील मंदिराच्या डिझाईनचे काम देखील सोमपुरा परिवारानेच पूर्ण केले आहे.
नागर शैलीतील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पायापासून शिखरापर्यंत चौकोनी आकाराचे असतात.
चंद्रकांत सोमपुरा यांनी देश आणि विदेशातील अनेक नागर शैलीच्या मंदिराचे डिझाईन तयार केले आहे. लंडनमधील प्रसिद्ध अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराचे डिझाईन यांनीच तयार केले. हे मंदिर स्थापत्य शैली आणि भव्यतेसाठी ओळखले जाते.
श्रीराम मंदिराच्या डिझाईनसाठी विहिंप प्रमुख अशोक सिंघल यांनी पहिल्यांदा चंद्रकांत सोमपुरा यांची भेट घेतली. १९८७ साली या मंदिराचे डिझाईन तयार करण्यात आले. त्यानंतर १९९०मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या कुंभमेळ्यात सर्व संतानी यावर संमतीची मोहोर उठवली. आजही याच डिझाईननुसार मंदिराचे बांधकाम होणार असले तरी यात स्वतः चंद्रकांत सोमपुरा यांनीच काही बदल केले आहेत.
१९८७ साली बनवण्यात आलेले ते डिझाईन विश्व हिंदू परिषदेच्या कारसेवक पूरम येथील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. सध्या चंद्रकांत सोमपुरा अयोध्येतच आहेत. चंद्रकांत सोमपुरा यांचे हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी अनेक वास्तूविशारद वेगवेगळ्या ठिकाणी राहूनही या डिझाईनवर काम करतायत.
चंद्रकांत सोमपूरा यांच्या अंदाजानुसार दगडावरील कोरण्यात येणाऱ्या नक्षीकामाचा ४०% भाग पूर्ण झाला आहे आणि दोन ते अडीच वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल.
चंद्रकांत सोमपुरा यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे या कलेची कोणतीही औपचारिक पदवी नाही. घरातील परंपरागत व्यवसाय असल्याने त्यांनी हे तंत्र आपल्या आजोबांकडून आणि वडिलांकडूनच शिकून घेतले.
आज त्यांचा मुलगा आशिष सोमपुरा देखील या कामात त्यांना मदत करत आहे. चंद्रकांत सोमपुरा यांना मंदिराच्या वास्तुकलेसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
चंद्रकांत सोमपूरा यांची दोन्ही मुले आशिष सोमपुरा आणि निखील सोमपुरा हे देखील मंदिर वास्तूविशारद आहेत. आता त्यांची पुढची पिढी देखील हा परंपरागत वारसा चालवण्यास सज्ज झाली आहे. चंद्रकांत सोमपुरा यांचा नातू आशुतोष सोमपुरा हा देखील आता मंदिर वास्तूविशारद बनण्याची तयारी करतो आहे.
श्रीराम मंदिराच्या प्रस्तावित आराखड्यात मंदिराची उंची १६१ फुट इतकी ठेवली आहे. पूर्वीच्या आरखड्यात फक्त तीन शिखरे होती आता त्याठिकाणी पाच शिखरे बसवली जाणार आहेत.
ज्या नागर शैलीत या मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे, ती शैली उत्तर भारतातील जवळपास प्रत्येक मंदिरातून पाहायला मिळते. उत्तर भारतीय स्थापत्य कलेचे हे एक खास वैशिष्ट्य आहे. यात मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंतचे बांधकाम चौकोनी आकारात केले जाते.
मंदिरात गर्भगृह, त्यानंतर अंतराळ, मंडप आणि अर्ध मंडप असतात. हे सारे भाग एकाच अक्षावर येतील अशा प्रकारे बांधकाम केले जाते. यातील सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा कळस.
भारतात पहिल्यांदा परमार वंशातील शासकांनी या शैलीतील मंदिरांची निर्मिती केली. सोमनाथ मंदिर, जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्यमंदिर, उडीसातील लिंगराज मंदिर ही भारतातील काही प्रसिद्ध मंदिरे आहेत, जी याच शैलीत बांधण्यात आली आहेत. विशेष म्हणजे खजुराहोचे शिल्प देखील नागर शैलीतच बांधले गेले आहे.
या प्रस्तावित आराखड्यात श्रीराम मंदिराची उंची १६१ फुट असून याची लांबी ३६० फुट आणि रुंदी २३५ फुट असणार आहे. पूर्वीच्या आराखड्यात मंदिर दोन माजली होते आता यात आणखी एक मजला वाढवण्यात आला आहे. संपूर्ण मंदिरात ३६६ खांब लावले जाणार आहेत. यातील गर्भगृह अष्टकोनी आकारातील असेल.
संपूर्ण देशवासीयांचे लक्ष आता या श्रीराम मंदिर कधी बांधून पूर्ण होतंय याकडेच लागलं आहे. एकूण डिझाईनवरून तरी हे मंदिर अत्यंत भव्य होणार आहे यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.