ह्युमन कम्प्युटर म्हणून ओळख असणाऱ्या शकुंतला देवींवरचा हा चित्रपट कोणीही चुकवू नये असाच आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


मॅट डेमनची मुख्य भूमिका असणाऱ्या “गुड विल हंटिंग” या चित्रपटात जगातील अतिशय क्लिष्ट गणितं सोडवणाऱ्या एक तरुण मुलाचा स्वतःच्या बुद्धिमत्तेशी आणि भावनिक विश्वाशी चाललेला संघर्ष दाखवला आहे. मानसिक गोंधळ आणि अचानक मिळालेलं यश यातून मार्ग काढत स्वतःचं सुख शोधण्यासठी त्याला जो संघर्ष करावा लागतो तो भावनिक प्रवास तुम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. त्याच्या या आयुष्य सोपं करून जगण्याच्या संघर्षात आपण कुठेतरी स्वतःला बघत असतो.

अनेकदा एखाद्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या लोकांचं वैयक्तिक आयुष्य तितकं सोपं असेलच असं नाही. त्यांचं त्यांच्या करिअरमधलं कौशल्य, यश कितीही मोठं असलं तरी ते अनेकदा वैयक्तिक आयुष्य सावरायला कामात येत नाही.

याचंच एक उदाहरण म्हणजे शकुंतलादेवी.

शकुंतलादेवी भारतातीलच नव्हे तर जगातील गणित विषयातलं एक मोठं नाव. त्यांच्या आयुष्यावर किमान या पातळीच्या जवळ जाऊ पाहणारा चित्रपट बनला असेल असं ट्रेलर बघून वाटत होतं. पण आपल्या वाट्याला मेलोड्रामाने भरलेला एक टिपिकल पण चांगला बॉलिवूडपट येतो.

आज सिनेमागृह सुरू असते तर हा सिनेमा एक टिपिकल फॅमिली सिनेमा म्हणून चांगलाच गाजला असता. शेवटी आई आणि मुलीच्या भावनिक प्रसंगातून बरीच लोकं रडलीही असती. पण या ऑनलाइन माध्यमाची गरज आणि प्रेक्षक वेगळे आहेत.

इथे चटकन डोळ्यात पाणी आणणारा एक प्रसंग नाही तर, सतत अंतर्मुख करत जाणारी लेयर्ड आणि सटल मांडणी जास्त प्रभावशाली ठरते. म्हणून अपेक्षित हाय पॉईंट नाही मिळाला तरी सगळं बंद असताना भारतीय लोकांचं क्रिकेट आणि बॉलिवूडवरचं प्रेम लक्षात घेता त्यांच्या अपेक्षांना पूर्ण करणारा असा माईल्ड एंटरटेनर एक पर्वणी आहे.

सिनेमा सुरू होतो तो शकुंतलादेवीची मुलगी, “अनुपमा बॅनर्जी”च्या मोनोलॉगने. अनुपमा आणि शकुंतला या माय-लेकीतला संघर्ष शकुंतलाचा तिच्या आईसोबत असणाऱ्या संघर्षामुळे आहे असं सुचवणारा फ्लॅशबॅक सुरू होतो.

या संख्यांच्या जादूची सुरुवात शकुंतलाच्या बालपणात कशी होते, त्यामुळं ती कशी सामान्य आयुष्यापासून दुरावते इथून ते तिचा एक महान गणिती होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय संथ गतीत आपल्याला बघायला मिळतो.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि इतर देश, त्यावेळचं राहणीमान, वेशभूषा, गाड्या, घरं याचं चित्रण अगदी खरं वाटावं असं केलं आहे. कलादिग्दर्शनात विशेष लक्ष दिल्यामुळं इथे कथा जरी फार पुढे जात नसली तरी ते विश्व बघणं एक पर्वणीच आहे.

आता आपल्याला “तुम्हारी सुल्लू”मधली हजरजबाबी, विनोदबुद्धी असणारी विद्या बालन ओळखीची वाटू लागते. शकुंतला देवी इतक्या विनोदी नव्हत्या हे माहीत असतानाही विद्या बालनने घेतलेलं हे कलात्मक स्वातंत्र्य तिला शोभून दिसतं आणि आपण शकुंतला देवींना बघण्यापेक्षा विद्याच्या अभिनयात जास्त गुंग होतो.

विद्या स्वतःचेच रेकॉर्ड मोडून काढत अधिकाधिक दर्जेदार काम करत आता महिलाप्रधान चित्रपटांची ब्रँड अँबेसेडर बनली आहे. अमित साध आणि सान्या मल्होत्रा यांनीही त्यांच्या इतर कामांपेक्षा जास्त चांगलं काम केलंय.

स्क्रीनवर विद्या बालनला फिकं पाडेल असा प्रेझेन्स असणारी अभिनेत्री शकुंतलादेवीच्या मुलीच्या पात्रासाठी हवी होती. सान्या मल्होत्राने हे इंद्रधनुष्य एकदम परफेक्ट पेललंय. याआधीही दंगल, बधाई हो आणि फोटोग्राफमधून तिने स्वतःला सिद्ध केलंच आहे. पण, विद्या बालन स्क्रीनवर असताना देखील स्वतःची छाप पाडणं हेच तिच्या असामान्य कौशल्याचं प्रतीक आहे.

चित्रपट कॉमेडी-ड्रामा प्रकारात मोडतो, यशस्वी चरित्रपट “भाग मिल्खा भाग”मधून या सिनेमाच्या स्क्रिप्टच्या फॉरमॅटची प्रेरणा घेतली आहे असं वाटत राहतं. यशस्वी माणसाचं आयुष्य सुद्धा एखाद्या सामान्य माणसासारखंच चढउताराने भरलेलं असतं. पण सिनेमा बनवताना कुठला तरी एक हाय पॉईंट घेऊन त्याआधीच्या कथेतून त्या माणसाबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यायची असते.

जसं मिल्खा सिंगला भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान झालेल्या पालकांच्या मृत्युमुळे पुन्हा पाकिस्तानमध्ये जाणं भावनिक पातळीवर अशक्य होतं. ते सोपं करतानाची रेस हा चित्रपटाचा हाय पॉईंट ठरतो.

तसंच शकुंतलादेवीच्या मुलीशी त्यांचं झालेलं भांडण सिनेमातला हाय पॉईंट आहे आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला होते.

पण यात उगाच गोंधळ वाढवायला त्याकाळी सुसंगत नसलेला फेमिनिस्ट विचार लेखकांनी संवादात टाकलाय. पुरुष यशस्वी झाला तरी त्याला काही गमवावं लागत नाही, पण महिलांना नेहमीच अडथळे येतात हे वास्तव आता आपल्या चर्चेचा भाग आहे. पण 1954मध्ये परिस्थिती अशी नव्हती. तेव्हा फेमिनिझम चर्चेचा काय, विचारांचाही भाग नव्हता. म्हणून तेव्हाच्या प्रसंगात शकुंतला देवीला स्त्रीवादी म्हणून बघणं काल सुसंगत वाटत नाही (जरी त्या स्त्रीवादी असल्या तरीही).

दर्जेदार विनोदी संवाद आणि उत्तम अभिनय यामुळे आपण खिळून राहतो.

एक गरीब, सामान्य मुलगी ते यशस्वी, श्रीमंत गणिती हा प्रवास आपण एन्जॉय करतो. त्यांच्या मुलीशी असणारं त्यांचं नातं देखील आपल्याला भावनिक करतं.

पण हे सगळं दाखविण्याची टिपिकल बॉलिवूडछाप ड्रॅमॅटिक पद्धत अडथळा वाटू लागते. कदाचित शकुंतलादेवीच्या डोक्यात त्यांचं सत्य तसं ड्रॅमॅटीक असेल म्हणून किंवा चित्रपट जरा हलका वाटावा म्हणून त्यांनी अशी शैली स्वीकारली असावी .

यातून त्या पात्रातलं गांभीर्य फक्त एका शेवटच्या सीनपुरतं मर्यादित राहून इतर वेळी नशेत काहीही बरळणाऱ्यासारखं वाटतं. गाणे फॉरवर्ड करावेसे वाटतात. थिएटरमध्ये शिट्ट्या मिळाल्या असत्या पण मोबाईलवर ते सगळं फारच उथळ वाटतं.

तरीही विद्या बालनची तुफान एनर्जी आणि गणिताला सोपं करणारी अशी ही “ह्युमन कम्प्युटर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका स्त्रीची सत्यकथा या दोन गोष्टींसाठी हा चित्रपट चुकवू नये असा आहे.

शकुंतला देवींना ही जादू कशी काय जमत होती याचं कारण शोधणं त्याकाळी तज्ञांना जमलं नाही, म्हणून तसं सिनेमात किंवा माहितीत कुठेच नाही. पण त्या ट्रिक्सला “वेदिक मॅथ्स” असं म्हणतात.

फर्ग्युसनमध्ये शिकत असताना “जे. व्ही. खेडकर” सरांनी या विषयावर घेतलेलं एक लेक्चर या निमित्ताने आठवलं. हे जमणाऱ्या खूप कमी लोकांपैकी ते एक आहेत. आता ते सेवानिवृत्त झालेत.

वेदिक मॅथ्समध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांनी हा चित्रपट नक्की बघावा असं मी सांगेल. आज इतकंच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!