या माणसाच्या शोधामुळे शेकडो हत्तींचा जीव वाचलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एका गोष्टीत आलेले अपयश कधीकधी दुसऱ्या एखाद्या नवीन शोधाची पायरी बनतं. पहिली जैविक लस पेनीसीलिनचा शोध असाच लागला. असंच काहीसं प्लास्टिकच्या बाबतीतही झालं.

बिलियर्ड्सच्या खेळाचे चेंडू बनवण्याच्या एका जाहिरातीने प्लास्टीकच्या विश्वाचा कसा कायापालट झाला हे आपण आज बघणार आहोत.

बिलियर्ड्सच्या खेळात तसं तर कोणीही श्रेष्ठ असा खेळाडू नाही. शार्क माशांसारखे एकापेक्षा एक वरचढ असे खेळाडू या खेळात असतात. तुम्ही एकाला हरवून पैसे मिळवले तर तुम्हाला हरवून तुमचे पैसे घेणारा दुसरा खेळाडू लगेच तयार असतो. जो खेळाडू हातातील काठीच्या साहाय्याने कोणालाही हरवून पैसे मिळवायचा त्याला पूर्वीच्या काळी ‘पूल शार्क’ असं म्हटलं जाई.

१९३५मध्ये प्रदर्शित झालेल्या बॅड बॉय या चित्रपटातील एडी नोलन म्हणजे पूल शार्कचं एक उत्तम उदाहरण.

१९व्या शतकाच्या शेवटी सुरु झालेल्या या बिलियर्ड्सच्या युगाचा शेवट झाला तो २०व्या शतकाच्या मध्यकाळात. यादरम्यान पूल हॉल्स एक महत्त्वाचे सामाजिक केंद्र बनले होते. १०० वर्षांपुर्वी शिकागो शहरात १०० पूल हॉल्स होते यावरुन खेळाचे त्यावेळी असलेले महत्त्व लक्षात येते.

कधीकाळी हे हॉल म्हणजे झटक्यात पैसे कमावण्याचे अड्डे बनले होते. खऱ्या आयुष्यातील पूल शार्क असणारी एक व्यक्ती होती- माईकेल फेलन. खेळात सर्वोत्कृष्ट असलेल्या माईकेल फेलनने या खेळाच्या इतिहासात उल्लेखनीय योगदान दिलं आहे. खेळातील नियम, पध्दती याबद्दल त्याने पुस्तकं लिहिली.

पूल टेबलसाठी वापरण्यात येणाऱ्या गादीचे पेटंट त्याच्या नावावर होतं.

खेळाडुंचा नेम अजुन चांगला व्हावा म्हणून त्याने हिऱ्याच्या आकाराचे साचे टेबलवर बसवले. हे आकार खेळाडुंना योग्य नेम धरण्यात मदत करत.

फेलनला अमेरिकेतील बिलियर्ड्सचा निर्माता म्हणून ओळखलं जातं ते या कारणांमुळेच. फेलनने आपले खेळातील गुण बिलियर्ड्सच्या व्यवसायातही वापरले. वेगवेगळे आराखडे, पध्दती वापरून व्यवसायातील विरोधकांच्या कमकुवत बाजू हेरून त्याने बिलियर्ड्समध्ये आपला पैसा गुंतवला.

फेलनला बिलियर्ड्समधली एक मोठी कमतरता लक्षात आली ती म्हणजे खेळाच्या नियमांमध्ये असलेली अनिश्चितता.

शिवाय खेळाच्या साहित्याच्या बाबतीतही कोणतेच नियम नव्हते. वापरण्यात येणारे चेंडू खोलीच्या वातावरणानुसार, आकारानुसार पूल टेबलवर वेगळ्या पद्धतीने काम करत. याच अनिश्चिततेमुळे प्रत्येक सामना हा पुर्णपणे वेगळा असायचा. प्रत्येक वेळी वेगळी काठी, वेगळा चेंडू यामुळे खेळातली अनिश्चितता अजूनच वाढत होती.

फेलनसाठीच नाही तर सगळ्याच खेळाडूंसाठी हा चिंतेचा विषय बनला होता. खेळाच्या साहित्याचं मानकीकरण करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय आता समोर दिसत नव्हता. खेळाची ही अशी अनिश्चितता खेळाच्या लोकप्रियतेत घट निर्माण करत होती.

खेळाचं मानकीकरण करायचंच हे पक्कं करून फेलनने आपली कमाई या कामात ओतण्याचा निर्णय घेतला. या पैशातून त्याने बिलियर्ड्सच्या साहित्य उत्पादनाचा पहिला निर्मिती कारखाना उभा केला.

इथंही एक मोठी समस्या आ वासुन उभी होती. बिलियर्ड्सच्या चेंडूंना बनवण्यासाठी त्यावेळी हस्तिदंताचा वापर केला जात असे. फेलनला असे अनेक चेंडू बनवण्याची गरज होती. एकसारखे चेंडू निर्माण करणं म्हणजे सोपं काम नक्कीच नव्हतं.

चेंडूने एका विशिष्ट प्रमाणातच उसळी घेणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी चेंडुची घनता एकसमान असायला हवी. यासाठी तेव्हा हस्तिदंताचा वापर करणं एवढा एकच उपाय होता

बिलियर्ड्सचा खेळ त्यावेळी अतिशय दयनीय अवस्थेत होता. खेळाची स्थिती हत्तीला मारुन बनवण्यात येणाऱ्या चेंडूंच्या संख्येवर अवलंबून होती. हे काम अतिशय जिकरीचं आणि महागडं होतं. त्यावेळी हत्तींच्या संख्येची काळजी नसली तरी या एकमेव स्त्रोतावर एका संपूर्ण खेळाचा भार टाकणं अवघड होत चाललं होतं.

हे चेंडू पुर्णपणे हस्तिदंतापासून बनवले जात असत. त्यात फक्त उत्तम गुणवत्तेच्या हस्तिदंतापासूनच हे चेंडू बनवले जाऊ शकत होते. कमी गुणवत्तेच्या हस्तिदंतापासून बनवले गेलेले चेंडू खेळासाठी वापरता येत नव्हते. त्यात एका हत्तीच्या दातापासून फक्त ३ चेंडू बनवता येत होते. म्हणजे ८ चेंडूंचा एक सेट बनवण्यासाठी ३ हत्तीचा जीव जात होता.

या गोष्टींवरुन एकच निष्कर्ष निघत होता, तो म्हणजे बिलियर्ड्स खेळाला वाचवण्यासाठी चेंडू दुसऱ्या कच्च्या मालापासून बनवणं. दुर्दैवाने त्यावेळी असा कुठलाच कच्चा माल उपलब्ध नव्हता. हा अडथळा पार करण्यासाठी फेलनला एका वेगळ्या पध्दतीचा शोध घेणं गरजेचं होतं.

फेलनने वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली. हस्तिदंताचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीला त्याने १०,००० अमेरीकन डॉलर्सचं पारितोषक जाहीर केलं. त्याच वेळी ‘जॉन वेस्ले ह्याट’ या व्यक्तीने प्लास्टीकचा समावेश असलेल्या एका पदार्थाचा वापर करून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न केला.

छपाईचे काम करणाऱ्या जॉनने नायट्रेट सेल्यूलोजचा वापर चेंडू बनवण्यासाठी केला. (आजही औद्योगिक प्लास्टीकच्या निर्मितीसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात वापरला जातो.)

सेल्यूलॉईड एक चांगला पर्याय असला तरी त्यापासून बनवले गेलेले चेंडू उसळी कमी घेतात. त्यामुळे जॉनला १०,००० डॉलर्सचं पारितोषक जिंकता आलं नाही. म्हणून मग जॉनने आपले स्वत:चे हे बिलियर्ड्सचे चेंडू बनवले. प्लास्टीकचे आवरण असलेले सेल्यूलॉइड पासून बनलेले हे चेंडू त्याने कमी किमतीत विकण्यास सुर केले.

पहिल्या महायुध्दाच्या काळात हस्तिदंताचा तुटवडा जाणवू लागला. याच वेळी जॉनने बनवलेले सेल्यूलॉइडचे महत्त्व वाढत गेले होते. बिलियर्ड्सचे चेंडू बनवत नसले तरी या सेल्युलॉइड पासून अनेक वस्तूंची निर्मिती होण्यास सुरवात झाली होती. प्लास्टीकच्या वापराच्या चळवळीची सुरुवात या सेल्यूलॉइडने केली.

पुढे, पिव्हीसी, विनाईल आणि नायलॉन यांसारख्या पदार्थांनी क्रांती घडवून आणली होती. प्रयोगशाळा टेफ्लॉन आणि सरन बनवण्यात व्यस्त होत्या.

जॉनने स्वत: सेल्युलॉइडचा वापर करून हस्तिदंतांच्या वस्तूंना पर्यायी वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या आणि त्यातून बक्कळ पैसा कमावला.

सेल्युलॉईडचा सगळ्यात मोठा उपयोग केला गेला तो चित्रपट उद्योगात. सेल्यूलॉईड चित्रफितींनी चित्रपट उद्योगाचा कायापालट केला. चार्ली चॅप्लीनचा ‘मॉडर्न टाइम्स’, ऑर्सन वेल्सचा “सिटीझन केन” हे सगळे सेल्यूलोइडच्या चित्रफितीवर चित्रीत केलेले सिनेमे होते. जॉनच्या हस्तिदंताच्या पर्याय शोधण्याच्या फसलेल्या प्रयत्नाने अनेक नवनवीन पदार्थांचे शोध लागत होते.

मात्र, या सेल्युलॉईडचा एक दुर्गुण होता. तो म्हणजे त्याची ज्वलनशीलता. यामुळेच त्याकाळी बनवलेल्या चित्रपटांपैकी फक्त ३०% चित्रपट आज अस्तित्वात आहेत.

चित्रपटगृहात प्रोजेक्टरसाठी वेगळी खोली असण्याचे कारणही सेल्युलॉईडची ज्वलनशीलता. यामुळे बऱ्याच वेळा प्रोजेक्टरवर काम करणारया व्यक्तींचे मृत्यू सुध्दा होत असत. अमेरीकेत दर १८ दिवसाला एका व्यक्तीचा मृत्यू या कारणाने होत होता असं म्हटलं जातं.

सेल्युलॉईड आजही अनेक खेळांसाठी चेंडू बनवण्यासाठी वापरलं जातं.

बिलियर्ड्सचा खेळ वाचवण्यात अपयशी ठरलेल्या जॉनने प्लास्टीकच्या विश्वात मात्र क्रांती घडवून आणली होती. १०,००० डॉलर्सला मुकलेल्या जॉनने नंतर त्याहीपेक्षा कितीतरी पट पैसे कमावले.

सेल्यूलॉइडपासून बनवलेले चेंडू आज टेनिस आणि पिंग पॉंग यासारख्या खेळांसाठी वापरले जातात. पूल शार्कपासून पिंग पॉंगच्या खेळापर्यंतचा प्लास्टीकचा हा प्रवास थक्क करून सोडणारा आहे.

नविन शोध आणि भविष्याबरोबर त्याच्या वापरात होणारा बदल याचे हे जिवंत उदाहरण आहे. पेनिसीलिन सारखं मानवाचं आयुष्य वाचवता आलं नसलं तरी जॉनच्या सेल्युलॉईडने ते सुखकर नक्कीच बनवले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!