या ग्रंथालयातील रामायणाची सुरुवात ‘ओम्’ने न होता ‘बिस्मिल्ला-अर्रहमान’ने होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ग्रंथालये ही नुसतीच विरंगुळ्याची ठिकाणे नसतात तर त्यांनी काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देखील जपलेला असतो. जितके जुने ग्रंथालय तितकीच तिथला खजिनाही समृद्ध असण्याची शक्यता जास्त. उत्तरप्रदेशच्या रामपूरमध्ये असेच एक ग्रंथालय आहे जिथे हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या आणि गंगा-जमनी परंपरेच्या खुणा मिळतात.

रामपूरचे नवाब फैज उल्ला खान यांनी १७७४मध्ये या ग्रंथालयाची स्थापना केली होती. रामपूरच्या किल्ल्यातील जामा मशिदीमागे हामिद मंजिलमध्ये हे ग्रंथालय स्थित आहे. हे ग्रंथालय आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय असल्याचे मानले जाते.

रामपूरचे नवाब हामिद अली खान यांनीच तिला आधुनिक रूप दिले. म्हणूनच या ग्रंथालयाच्या इमारतीला हामिद मंजिल म्हटले जाते. या ग्रंथालयाचे बांधकाम १९०७ मध्ये पूर्ण झाले होते.

या ग्रंथालयात पुस्तकांच्या रुपात देशाचा एक मोठा सांस्कृतिक खजिना लपलेला आहे. इथे संस्कृत, फारसी, उर्दू, हिंदी, तुर्की, तमिळ या भाषेतील हस्तलिखितेही या ग्रंथालयात जतन करून ठेवण्यात आली आहेत. रामपूरच्या नवाबांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. इथल्या नवाबांनी लिहिलेल्या शायरीतही राधा-कृष्णाचा उल्लेख सापडतो. म्हणूनच रामपूरची ही संस्कृती भारतीयांसाठी कोहिनूरपेक्षाही मौल्यवान आहे जिचे आपण सर्वानीच संवर्धन केले पाहिजे.

१७ व्या शतकात संस्कृत रामायणाचा पारसी अनुवाद करण्यात आला आहे, त्याचीही प्रत या ग्रंथालयात आढळते. इथल्या रामायणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या रामायणाची सुरुवात ‘ओम्’ऐवजी ‘बिस्मिल्लाह-अर्रहमान-अर्रहीम’ने होते. 

याचा अर्थ होतो, ‘अल्लाहच्या नावाने सुरुवात करतो, जो खूपच दयाळू आहे. त्या अद्वितीय ईश्वराच्या कृपेमुळेच मी हे रामायण लिहित आहे.’ रामपूरमधील रझा ग्रंथालयातील या रामायणाचा आधी संस्कृतमधून फारसीमध्ये अनुवाद झाला आणि नंतर फारसीतून हिंदीमध्ये अनुवाद करण्यात आला. संस्कृत रामायणाचा फारसी अनुवाद सुमेर चंद यांनी १७१३मध्ये केला. फारुखसियारच्या काळात त्याने हा फारसी अनुवाद केला होता.

फारसी भाषेतील या रामायणातील प्रत्येक पान सोन्याने मढवलेले आहे. शिवाय अनेक मौल्यवान रत्ने देखील या पानांवर सजवण्यात आली आहेत. या रामायणात प्रसंगानुरूप काही चित्रेही रेखाटण्यात आली आहेत. या चित्रात राम, सीता आणि रावण फारच वेगळे दिसतात. फारसी रामायणात रेखाटलेल्या या चित्रात रावणाला दहा तोंडे दाखवण्यात आली असून या दहा तोंडाच्या वरती ११ वे डोके दाखवण्यात आले आहे, जे गाढवाचे आहे. शिवाय, या रेखाटनातील पात्रांची वेशभूषा, त्यातील वास्तुकला, वेशभूषा, यावर मध्ययुगीन कलेचा प्रभाव दिसतो. मध्यकालीन संस्कृतीची झलक या रेखाटनातून पाहायला मिळते.

रामायणाच्या या प्रतीवर लिहिल्यानुसार या पुस्तकाची किंमत त्याकाळी ४००० रुपये होती. फारसी रामायणातील राम-लक्ष्मण आणि सीता हे मुघल शैलीच्या शाही वेशभूषेत पाहायला मिळतात. या पात्रांच्या डोक्यावरील पगडी आणि टोप्या मुघलकालीन आहेत. काही ठिकाणी पात्राच्या हाती धनुष्याऐवजी तलवार दाखवण्यात आली आहेत.

ऋषींसोबत बसलेल्या रामाने धोतर आणि जानवे घातले असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर एका चित्रात विश्वामित्र, राम आणि राजा दशरथ यांच्यासमोर काही भांडी ठेवण्यात आली आहेत आणि ही भांडी हिऱ्यांनी सजवली आहेत.

रझा लायब्ररीचे ग्रंथपाल अबु साद इस्लाही यांनी दिलेल्या माहितीनुसार फारसी रामायणावरून पुढे त्याचा हिंदी अनुवाद करण्यात आला. प्रा. शाह अब्दुस्सलाम आणि डॉ. वकारूल हसल सिद्दिकी या दोघांनी हा अनुवाद केला होता. वाल्मिकी रामायणाचा फारसी अनुवाद हिंदू सुमेर चंद यांनी तर फारसीवरून हिंदी अनुवाद दोन मुस्लिमांनी केला आहे.

भारतातील रझा ग्रंथालय हे आशियातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे. इथे अनेक जुनी हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. अनेक परदेशी संशोधकही या ग्रंथालयाला आपल्या संशोधनाच्या निमित्ताने भेट देतात. या ग्रंथालयात अनेक भाषेतील आणि वेगवेगळ्या लिपीतील ६० हजारपेक्षा जास्त पुस्तके आहेत. यात १७ हजार हस्तलिखितेही आहेत. 

मक्केतून आणलेल्या कुराणचे हस्तलिखितही इथे सापडते. शिवाय, १७ व्या शतकातील रामायणाचेही हस्तलिखित आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या ग्रंथालयातील ७व्या शतकातील कुराणचे हस्तलिखितही आहे. या अमुल्य खजिन्याच्या रक्षणासाठी इथे ६-७ तज्ञ नेमण्यात आलेले आहेत. हे तज्ञ दिवसरात्र हा खजिना जपण्यासाठी झटत असतात.

रामपूरच्या खासदार बेगम नुरबानो यांनी आपल्या लग्नात ४००० पुस्तके आपल्यासोबत आणली होती. यामध्ये लोहारू साहित्याची अनेक पुस्तके होती. नवाब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला लिहिण्या-वाचण्याचा छंद होता हे, यावरून स्पष्ट होते. दिल्ली-लखनऊनंतर कविता आणि शायरीला राजाश्रय देणारे रामपूर तिसरे मोठे संस्थान होते.

जगप्रसिद्ध शायर मिर्जा गालिब यांचे रामपूरसोबत काहीसे गहिरे नाते होते. रामपूरच्या दोन नावाबांना त्यांनी शिक्षणाची तालीम दिली आहे. रामपूर संस्थानात त्यांना दरमहा १०० रुपये पगार मिळत असे.

डॉ. चंद्रप्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार १८५७च्या उठावानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मिर्जा गालिब रामपूरमध्ये पोहोचले. १८६०मध्ये ते या संस्थानाचे नवाब युसुफ अली खान यांचे उस्ताद म्हणून काम करू लागले.

नवाब युसुफ अली खान यांच्यानंतर ते नवाब कल्बे अली यांचेही उस्ताद होते. त्यांना दरमहा तनखा आणि रामपूरमध्ये राहण्यासाठी घर दिले होते. काही वर्षांनी ते दिल्लीला निघून गेले पण रामपूरच्या नवाबांशी असलेला त्यांचा संपर्क तुटला नाही. मिर्जा गालिब आणि रामपूरचे नवाब यांच्यातील पत्रव्यवहार आजही रझा ग्रंथालयात पाहायला मिळतील. ही एकूण १५० पत्रे आहेत. रामपूरच्या नवाबांना कविता आणि शायरीचे खूपच वेड होते. म्हणूनच त्यांनी मिर्जा गालिबसारख्या श्रेष्ठ शायरकडून शिक्षण घेतले.

रामपूरची ही संस्कृती गंगा-जमना परंपरेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. भारतातील हिंदू आणि मुस्लिमांनी रामपूरची ही ओळख जतन करून ठेवली पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!