आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सर्फ एक्सेलची “दाग अच्छे होते हैं” ही जाहिरात तुम्ही बघितली असेलच. रंगपंचमीच्या दिवशी पांढरा पोशाख घालून नमाज पढण्यासाठी मशिदीत चाललेल्या एक छोट्या मुलाला रस्त्यावरून जाताना कोणीही रंग लावत नाही. मात्र तो मशिदीतून बाहेर येताच सर्व मुले त्याच्यावर रंगाची उधळण करतात आणि आपल्या रंगपंचमीच्या खेळात त्यालाही सहभागी करून घेतात. रंगपंचमी हा आनंदाचा सण आहे आणि तो साजरा करताना धर्म आड येऊ शकत नाही, असे या जाहिरातीतून सांगण्याचा प्रयत्न केला गेला.
होळी हा हिंदूंचा सण असल्याचे सांगितले गेले. परंतु, मुघल शासकांच्या काळात मुस्लीमही रंगपंचमीचा खेळ खेळत असत, तसे पुरावे अनेक पुस्तकातून आढळतात.
मुघल शासकांच्या काळात याला ईद-ए-गुलाबी म्हटले जात असे. फुलांपासून बनवलेल्या रंगानी हौद भरलेले असत. पिचकारीत गुलाबजल आणि केवड्याचे अत्तर घालून ते एकमेकांवर उडवले जात असे. बेगम-नवाब आणि प्रजा सर्वजण मिळून होळीचा आनंद लुटत असत.
सध्याचे वातावरण पाहता होळी हा फक्त हिंदूंचा सण आहे असे वाटते. मात्र मुघलांच्या काळात हिंदू-मुस्लीम मिळून हा सण साजरा करत असत. इतिहासकरांनी मुघलकालीन होळीच्या सणाविषयी बरेच काही लिहून ठेवले आहे.
इतिहासकार मुन्शी झकौल्लाह यांनी ‘तारीख-ए-हिंदुस्तानी’ या आपल्या पुस्तकात असे म्हटले आहे की, ‘कोण म्हणते होळी फक्त हिंदूंचा सण आहे?!’ झकौल्लाह यांनी बाबरलासुद्धा होळीचे किती आकर्षण होते याचे वर्णन या पुस्तकात केले आहे. होळीचा सण साजरा करण्यासाठी हिंदू लोकांनी एकमेकांच्या अंगणात रंगांनी भरलेले हौद उभारले होते. ते एकमेकांना उचलून या हौदात टाकत आणि अक्षरश: रंगाने अंघोळ घालत. बाबराला हा खेळ इतका भावाला की त्याने रंगीत पाण्याऐवजी दारूचे हौद बनवले.
अबुल फजल हा आणखी एक इतिहासकार ज्याने ‘ऐन-ए-अकबरी’ या पुस्तकात राजा अकबराच्या होळी खेळण्याचा उल्लेख केला आहे. वर्षभर अकबर राजाला या सणाची आतुरता असायची. या सणासाठी तो वर्षभर अशा वस्तू जमा करून ठेवत असे ज्यांचा या रंगपंचमीच्या खेळात उपयोग होईल. लांबपर्यंत रंगांची पिचकारी जाऊ शकेल अशा खास पिचकाऱ्या ते जमा करत असत. होळीच्या दिवशी राजा अकबर आपल्या किल्ल्यातून बाहेर येऊन रयतेसोबत मिळून होळी खेळत असे.
मुघल बादशहा जहांगीर यालाही होळीचे आकर्षण होते. ‘तुझ्क-ए-जहांगिरी’ या पुस्तकात त्याच्या होळी साजरा करण्याच्या पद्धतीबद्दलची माहिती मिळते. होळीच्या दिवशी जहांगीर बादशहा रंगांच्या खेळासोबतच संगीत मैफिलींचे आयोजन करत असे. या मैफिलीत सर्वांना प्रवेश दिला जात असे.
जहांगीर बादशहा स्वतः तर होळी खेळत नसे पण, आपल्या किल्ल्याच्या खिडकीतून तो जनतेचा होळी खेळण्याचा उत्साह आणि आनंद आवर्जून पाहत असे. त्याच्याच काळात होळीला ‘ईद-ए-गुलाबी’ (रंगांचा सण) आणि ‘आब-ए-पाशी’ (पाणी उडवण्याचा सण) ही नावे देण्यात आली.
शाहजहानच्या काळात आज जिथे राजघाट आहे त्या परिसरात होळीचा सण साजरा केला जात असे. शाहजहान स्वतः जनतेसोबत रंगांची उधळण करत असे. बहादूर शाह जफरच्या काळात तर होळी हा लाल किल्ल्याचा शाही सण बनला होता. जफरने या सणावर अनेक गीते लिहिली. या गीतांना होरी म्हटले जाई. होळी हा कुठल्या एकाच धर्माचा सण नव्हता तर तो सर्वधर्मियांचा सण आहे असे त्याचे मत होते.
लखनऊ शहरात होळीचा सण दिल्लीपेक्षाही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असे. लखनऊचे नवाब सआदत आली खान आणि असिफुद्दौला दोघेही होळीच्या सणासाठी करोडो रुपये खर्च करत. होळीच्या निमित्ताने नाचगाण्याच्या मैफिली सजवल्या जात. नर्तकींवर सोन्या चांदीच्या मोहरा उधळल्या जात. ज्येष्ठ उर्दू कवी मीर तकी मीरने या होळी सणाविषयी विशेष गीते लिहिली आहेत.
मुघलांच्या काळात होळीसाठी विशेष प्रकारच्या फुलांपासून रंग बनवले जात. विविध रंगांची फुले एकत्र केली जात. त्यांना पाण्यातून उकळून घेऊन थंड केले जात असे आणि हे पाणी पिचकाऱ्यामध्ये किंवा हौदामध्ये भरले जात असे. त्या काळी सकाळपासूनच हा सण साजरा केला जाई. आधी बेगम आणि बादशहा महालात होळी खेळत मग नंतर प्रजेसोबत होळी खेळण्यासाठी बाहेर पडत. राण्यांसाठी पाण्या ऐवजी अत्तर आणि गुलाबजलाने भरलेले हौद असत. या दिवशी दिवसभर कारंजे सुरु ठेवले जात. या कारंज्यातून देखील रंगीत पाणी फवारले जात असे.
पाण्यासोबतच यात अत्तर देखील मिसळले जात असे. होळीच्या निमित्ताने असे खास हौद बांधले जात. या हौदात रंग आणि अत्तर यांची कमी पडणार नाही हे पाहण्यासाठी खास माणसे नेमली जात.
अनेक कलाकारांनी मुघल शासक होळी खेळत असल्याची चित्रे रेखाटली आहेत. अकबर आणि जोधाबाई तसेच नुरजहां आणि जहांगीर यांची होळी खेळतानाची चित्रेही पाहायला मिळतात.
अनेक कवींनी देखील आपल्या काव्यातून मुघल शासक आपल्या राण्या आणि जनतेसोबत होळी खेळत असल्याचे वर्णन केले आहे. अमीर खुस्रो, इब्राहीम रसखान, माझूर लखनवी शाह नियाज आणि नजीर अकबराबादी अशा अनेक कवींनी मुघल राजांच्या होळी खेळण्याचे काव्यात्म वर्णन केले आहे.
अमीर खुस्रोला तर स्वतःलाच होळीचा सण खूप आवडत असे. होळी खेळत असताना ते गुलाबजल आणि फुलांपासून बनवलेले रंग वापरत असत. मुस्लीम सुफी कवी आणि संतांना देखील होळीने आकर्षित केले. या कवींनीही आपल्या लेखनातून होळीचे रंग अजरामर केले.
सुफी संप्रदायातील पहिले धर्मनिरपेक्ष संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजामुद्दीन औलिया यांनी सर्वात आधी सुफी मठातून होळीचा सण साजरा करण्यास सुरुवात केली. सुफी परंपरेत आजही होळीचा सण साजरा केला जातो.
मुघल साम्राज्याचा अंत झाला तसा हिंदू-मुस्लीम यांनी एकत्र येऊन होळी खेळण्याची परंपरा देखील खंडित झाली. मुघल साम्राज्यातील शेवटचे शास्ते इब्राहीम आदिल शाह आणि वाजिद अली शाह हे देखील होळीचा सण धुमधडाक्यात साजरा करत असत. होळीच्या निमित्ताने त्या दिवशी सगळ्यांना गोडधोड मिठाई आणि थंडाई पाजण्यात येत असे. आज फक्त सुफी आणि उर्दू कवींच्या लेखणीतच हिंदू-मुस्लीम यांच्या एकत्रित होळी साजरा करण्याच्या खुणा सापडतात
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.