आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इतिहासाच्या पानांमधील काही पात्रं जगावर आपला प्रचंड प्रभाव पाडतात, पण काही अनपेक्षित ऐतिहासिक घटनांमुळे किंवा अन्य काही कारणांनी ते लोक अचानक इतिहासाच्या पानांमधून गायबही होतात, अशीच एक शोकांतिका घडली ती इजिप्तच्या एका कर्तृत्ववान राणीबद्दल..
पाश्चिमात्त्य जग अद्याप अत्यंत मागासलेले आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत नसताना, इजिप्त मात्र मानवी सभ्यतेच्या प्रगतीच्या उंचीवर पोहोचले होते आणि अवाढव्य पिरॅमिड तयार करण्यात यशस्वी झाले होते. हे सर्व एका चमत्कारापेक्षा कमी नाही आणि कोणताही अभ्यासक इजिप्शियन इतिहासाचा अभ्यास करताना केवळ आश्चर्यचकित होतो.
आज जगभरात ‘फेमिनीजम’ बद्दल अनेक चर्चा होत आहेत. पण फेमिनीजम किंवा स्त्रीवादाचा खरा अर्थ प्राचीन इजिप्शियन संस्कृतीला कळला होता असं म्हटलं तर फारसं चुकीचं ठरणार नाही. प्राचीन इजिप्तमध्ये राजाला आणि धर्मप्रमुखाला ‘फारो’ म्हटले जात. क्लियोपेट्रा ही एका फारोची पत्नी फारोइतकीच आदरणीय होती.
बहुतेकांनी तिची कथा ऐकलीही असेल. आधुनिक जागतिक व्यवस्था येईपर्यंत कोणत्याही स्त्रीसाठी जी यशस्वीता साध्य करणे अशक्य होते, अशी यशस्वीता इजिप्तच्या त्या राणीने मिळवली होती. परंतु, इजिप्तच्याच इतिहासात आणखी एक अशीच महिला आहे, किंबहुना तिच्याकडे इतिहास दुर्लक्ष करतो, ती स्त्री म्हणजे नेफर्टिटी.
नेफर्टिटी ही एक प्रभावशाली राणी होती. ती इजिप्तच्या अठराव्या राजवंशाची राणी होती. तिने आपला पती, फारो अखेनातेन याच्यासोबत १७ वर्षे प्राचीन इजिप्तवर राज्य केले. ‘फारोज ऑफ द सन: अखेनातेन, नेफर्टिटी, तुतानखामेन’ या पुस्तकात आखेनातेन आणि नेफर्टिटी यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे.
या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे, या फारोचा कार्यकाळ हा इजिप्तचा सर्वात श्रीमंत काळ होता आणि या राज्यकर्त्यांनी या प्रदेशात मोठी प्रगती केली. फारो आणि राणीने प्राचीन इजिप्तमध्ये बहुदेववाद नाकारून एकेश्वरवाद लागू केला आणि इजिप्तमध्ये धार्मिक बदल घडवून आणले.
१९१२ साली एका आर्मेनियन दुकानात नेफर्टिटीचा अर्धाकृती पुतळा सापडला, तेव्हा तिच्यावर संशोधन सुरु झाले. हा प्राचीन अर्धाकृती पुतळा एका सुंदर स्त्रीचा होता, शिवाय तिच्या चेहऱ्यावरील हावभावांनुसार ती राणी असावी या अंदाजामुळे आणखी संशोधनाला प्रोत्साहन दिले गेले.
‘नेफर्टिटी’ नावाचा अर्थ ‘सुंदर स्त्री आली आहे’ असा होतो. याचा संदर्भ ‘अमरना सनराईज: इजिप्त फ्रॉम गोल्डन एज टू एज ऑफ हेरसी’ या पुस्तकात सापडेल. नेफर्टिटीच्या जन्माबद्दल आणि पालनपोषणाबद्दल आजमितीसही संशोधकांमध्ये मतभेद आहेत. पण तरीही तिचा जन्म ‘आय’ आणि ‘लुई’ यांच्या पोटी झाला हे मान्य केले जाते. अखेनातेनशी तिच्या लग्नाचे नेमके वर्षसुद्धा कोणाला माहित नाही. पण या जोडप्याला एकूण सहा मुली होत्या आणि हा विवाह केवळ एक करार नसून त्याचा पाया ‘आपापसांतील प्रेम’ हा होता याला मात्र निर्विवादपणे मान्यता आहे.
अखेनातेनने आपल्या पत्नीला श्रद्धांजली किंवा तिची आठवण म्हणून विविध मंदिरे बांधली आणि त्या मंदिरांमध्ये नेफर्टिटीची बरीच चित्रणे आहेत. तिचे स्वरूप फारोंच्या तुलनेत कित्येक पटींनी समृद्ध आणि पूजनीय असल्याचे दिसून येते. ती फारोच्या भूमिका पार पाडताना दिसते आणि काही चित्रणांमध्ये ती यु*द्ध लढताना तसेच शत्रूंची ह*त्या करतानासुद्धा दाखवली गेली आहे.
अखेनातेनने एटेनचा पंथ सुरू केला आणि एका नव्या धर्माची सुरुवात केली. हा धर्म एकेश्वरवादी अर्थात एकाच देवाला मानणारा होता. या धर्मामध्ये सूर्यदेव हे उपासनेचे प्रमुख दैवत होते तर अखेनातेन आणि नेफेर्टिटी हे पहिले मानव म्हणून चित्रित केले गेले होते. फारोला अनेक बायका होत्या. पण यापैकी काही बायकांना इतरांपेक्षा जास्त महत्त्व होते.
नेफर्टिटीला अखेनातेनने ‘ग्रेट रॉयल वाईफ’ ही पदोन्नती दिली होती, हीच गोष्ट तिच्या कारकिर्दीतील तिचा प्रचंड प्रभाव सिद्ध करते. प्राचीन स्थळांमधील चित्रणंअनेकदा नेफर्टिटीला यो*द्धा राणीच्या रूपात दाखवतात. यावरूनच एका काळात तिने नेफरनेफेरुतेनच्या वेषात फारो म्हणून राज्य केले असा सिद्धांत मांडण्यात येतो.
कालांतराने या ‘ग्रेट रॉयल वाइफ’ने पुरुषाचा वेष धारण करून इजिप्तवर राज्य करण्यासाठी एक प्रकारची युक्ती वापरली, शिवाय तिच्या पतीने प्रचार केलेल्या नवीन धर्माचे नुकसान देखील पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. तिने जुन्या देवांना पुनर्स्थापित केले आणि पुढील मतभेद टाळण्यासाठी भविष्यातील सम्राट तुतानखामनला त्याच तत्त्वांचे शिक्षण दिले जाईल याची खात्री करवून घेतली.
अखेनातेनच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी रेकॉर्डमधून ‘नेफर्टिटी’चे गायब होणे ही विद्वानांना खरोखरच गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. नेफरनेफेरुतेनच्या वेशात आणि तेच नाव तिने स्वीकारले असे सिद्धांत असले, तरी आजवर ते फक्त सिद्धांत आहेत, ते अजूनही सिद्ध होऊ शकले नाहीत. अशाच अनेक सिद्धांतांपैकी काही सिद्धांत म्हणजे, तिचा एकतर प्लेगमुळे मृत्यू झाला किंवा त्यावेळी ती काही कारणाने बदनाम झाली असावी, पण हेसुद्धा फक्त सिद्धांत आहेत!
पण, ‘इन द लाइट ऑफ अमरना: 100 इयर्स ऑफ द नेफर्टिटी डिस्कवरी’ या पुस्तकात प्रकाशित झालेल्या अखेनातेनच्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षातील, तिसऱ्या महिन्यातील आणि पंधराव्या दिवशीचा शिलालेख सापडल्यानंतर २०१२ साली एक लोकप्रिय नवीन सिद्धांत समोर आला. या शिलालेखात “ग्रेट रॉयल वाईफ, त्याची प्रेयसी, दोन देशांची राणी, नेफरनेफेरुटेन नेफेर्टिटी” यांच्या उपस्थितीचा उल्लेख आहे. नेफर्टिटीने निश्चितपणे तिचे नाव बदलले याचा हा पुरावा आहे, कारण नेफेर्टिटी हे नाव तिच्या उत्तरायुष्यात क्वचितच आढळते. तिने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर आणि तुतानखामनची वाढ होत असताना राज्य केले.
अखेनातेनच्या थडग्यात आणि तुतानखामनच्या थडग्यात नेफर्टिटीच्या दफनभूमीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत आणि त्याठिकाणी अद्याप संशोधन चालू आहे. इजिप्शियन लोकांनी ‘धार्मिकदृष्ट्या’ त्यांच्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीच्या नोंदी ठेवल्या, म्हणून नेफर्टिटीच्या बाबतीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि म्हणूनच प्रश्नाची संभाव्य उत्तरे शोधण्यासाठी अजून संशोधन होण्याची गरज आहे.
नेफर्टिटीच्या रहस्यांची उत्तरे मिळतील आणि तिचे खरोखर काय झाले, तिची अत्यंत मनोरंजक कथा कशी संपली याचे स्पष्ट चित्र आपल्याला मिळेल, याची आपण फक्त आशा करू शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.