आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक विकार जगातील सर्व देशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये आढळतात. नैराश्य आणि चिंता या विकारांचा जगातील दहापैकी एका व्यक्तीवर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. नैराश्याचा सर्वांत वाईट परिणाम म्हणजे आत्म*हत्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दर ११ लाख लोकांमागे प्रत्येकी १ लाख लोक आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडतात. २०१९ साली १ लाख ३९ हजार १२३ भारतीयांनी आत्म*हत्या केल्या आणि त्यावेळी देशामध्ये आत्महत्येचे प्रमाण १०.४ टक्के होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात आत्म*हत्या ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. गेल्या पाच दशकांपासून भारतात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्येला दोनच गोष्टी प्रवृत्त करतात त्या म्हणजे नैराश्य किंवा चिंता.
‘चिंतायश्च चितायश्च बिंदुमात्र विशिष्यते । चिता दहती निर्जीवं चिंता दहती जीवनम ।।’ या सुभाषितानुसार चिंता ही जीवनाचं एकप्रकारे दहन करते. डिप्रेशन किंवा नैराश्य हे फक्त दुःखाने येत नाही. दुःखद घटना एकदाच घडते, पण त्या दुःखद घटनेचा वारंवार विचार करीत बसल्याने नैराश्य येण्याच्या शक्यता वाढतात. त्याउलट ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणून जे घडून गेलंय त्याची चिंता सोडून आपापल्या कामाला लागल्यास नैराश्य येण्याच्या शक्यता कमी होतील. याचं एक उदाहरण आपल्याच देशातलं, सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचं आहे.
मद्रासच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये क्लर्क असलेल्या एका ब्रिटीशाने स्वतःच्या कपाळावर बंदूक ठेवली. त्याने ट्रिगर खेचला, पण काहीही झाले नाही. मग त्याच्या मनात काही वेगळा विचार आला, त्याने आपली भूमिका बदलली आणि पिस्तूल जमिनीवर फेकले. आपण किती मूर्ख आहोत हे त्याच्या लक्षात आले होते.
या डिप्रेस्ड कारकुनाने ब्रिटनला भारतात आपले पाय रोवायला मदत केली होती. त्याने नैराश्य, अपमान, पराभवाची किंवा अपराधीपणाची भावना याविरोधात लढा दिला होता, तरीही एका कॅडरमधून तो ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख बनला. ज्याच्या नेतृत्वाखाली प्लासीची लढाई लढली गेली, त्या ब्रिटिश सैन्याधिकाऱ्याची ही गोष्ट, त्याचं नाव रॉबर्ट क्लाइव्ह! त्याला ब्रिटनचा नेपोलियनसुद्धा म्हणतात..
२६ सप्टेंबर १७२५ रोजी ब्रिटनमध्ये रॉबर्ट क्लाइव्हचा जन्म झाला. रॉबर्ट क्लाइव्हच्या वडिलांनी वशिलेबाजी करून आपल्या मुलाला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत क्लर्क पद मिळवून दिले. ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासला आपले ट्रेडिंग पोस्ट स्थापन केले होते आणि तिथे काम करण्यासाठी ते कर्मचारी शोधत होते. ब्रिटन ते भारत हा वादळ, रोग, इत्यादींनी भरलेला धोकादायक समुद्री प्रवास होता.
प्रवासानंतरही, कडक ऊन आणि विविध उष्णकटिबंधीय रोग कोणत्याही ब्रिटिश नागरिकाची अग्निपरीक्षाच घेत असे. भारतात आलेल्या प्रत्येक तीन ब्रिटिश नागरिकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. एकदा कोणीतरी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी पत्करली की, ते करार संपल्यानंतरच ब्रिटनला परत जाऊ शकत होते. साधारणत: चार वर्षांनी हा करार संपत असत. मद्रासच्या इस्ट इंडिया कंपनीमध्ये क्लर्कची नोकरी ही वन-वे होती आणि जिवंत राहण्याची शक्यता फक्त ३३ टक्के होती.
भारतात सुखरूपपणे पोहोचल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने स्थानिक चालीरीती आणि भाषा शिकल्या. यामुळे त्याला कारकीर्द सुधारण्यास खूप मदत झाली. यावेळी, त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवसांचा सामना केला. अप्रिय आणि वाढलेलं तापमान असलेल्या परदेशात, डेस्कच्या मागे बसलेला आणि पुढच्या दोन वर्षांत घरी न जाऊ शकणारा क्लर्क म्हणून, रॉबर्ट नैराश्यात गेला. नैराश्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला पण तो नशीबवान होता, कारण बंदुकीत बिघाड असल्याने त्यातून गोळ्या झाडल्या गेल्याच नाहीत.
नवीन ऊर्जेने, त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि स्थानिक राज्यकर्त्यांमध्ये आपले संपर्क वाढवले. नवीन कामांमुळे तो व्यस्त राहू लागला आणि काही काळातच नैराश्यातून बाहेरही आला. पण मद्रासमधील त्याच्या कारकुनी नोकरीत अनेक अडचणी होत्या आणि त्याचवेळी एका सुवर्ण-संधीने त्याचे दार ठोठावले. फ्रेंच सैन्याने एका स्थानिक शासकाशी करार केला आणि मद्रासला वेढा घातला. पाच दिवसांच्या वेढ्यानंतर मद्रासने शरणागती पत्करली. मद्रासचे रहिवासी पाँडिचेरीला स्थलांतरित झाले.
त्याचवेळी आपल्या काही लोकांसह क्लाइव्ह स्थानिक लोकांच्या वेशात जवळच्या फोर्ट सेंट डेव्हिडला पळून गेला. त्या किल्ल्यावरून, क्लाइव्हने स्थानिक शासकाशी वाटाघाटी सुरू केल्या आणि काही काळासाठी युद्धबंदी झाली. मग स्थानिक शासकांच्या मदतीने फ्रेंच आक्रमणापासून त्याने गड राखून ठेवला.
ईस्ट इंडिया कंपनीचं हाय कमांड पॉंडिचेरीमध्ये तुरुंगात होतं, या संकटाच्या घडीला क्लाइव्ह धाडसीपणाने सामोरं गेला आणि राज्याची कमान हाती घेऊन आपले नेतृत्व गुण सिद्ध केले. सेंट डेव्हिड किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी क्लाइव्हच्या शौर्यामुळे, त्याला त्याच्या कारकुनी पदासह लष्करी पद मिळाले. क्लाइव्हने मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
१७५५ साली भारतात फ्रेंचांच्या बाजूने गोष्टी घडू लागल्या होत्या. आर्कोटचे नवाब चंदा साहिब यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांनी दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली या प्रसिद्ध शहराला वेढा घातला. मद्रासमधील संपूर्ण ब्रिटीश सैन्याने तिरुचिरापल्लीला वाचवण्यासाठी मोहिमेची तयारी केली, परंतु क्लाइव्हने दुसरी योजना आखली.
चंदा साहिबची राजधानी आर्कोट ताब्यात घेण्यासाठी क्लाइव्हने ५०० माणसे आणि सहा तोफा मागवल्या. अर्कोटचा किल्ला ताब्यात घेणे ही एक धाडसी आणि कल्पक चाल होती त्याचबरोबर हा एक “आउट ऑफ बॉक्स” विचारही होता. एका लहान सैन्याच्या मदतीने आर्कोटवर वर्चस्व मिळवण्यात क्लाइव्हला यश आले. आपली राजधानी पडल्याचे ऐकून चंदा साहिब फ्रेंच मैत्री वगैरे सगळं विसरले आणि त्यांनी आपले लक्ष अर्कोटकडे वळवलं, त्यामुळे तिरुचिरापल्ली मुक्त करणे ब्रिटिश सैन्याचे काम सोपे झाले.
चंदा साहिबांनी आर्कोटला वेढा घातला पण क्लाइव्हने चतुराईने अर्कोट किल्ला राखून ठेवला. तिरुचिरापल्ली मुक्त झाल्यानंतर आणखी ब्रिटिश सैन्य आर्कोटकडे आले आणि त्यांनी आर्कोटचा वेढा वाढवला. भारताच्या ब्रिटिश वसाहतीच्या इतिहासात आर्कोटचा वेढा हा महत्त्वाचा भाग आहे. वेढा टिकवून ठेवण्याच्या विजयामुळे इंग्रजांना दक्षिण भारतात त्यांची सत्ता प्रस्थापित करणे सोपे झाले. हे सर्व घडले ते क्लाईव्हच्या आऊट ऑफ बॉक्स विचारामुळे. म्हणजेच जो विचार ९९ टक्के लोक करतात, त्यापेक्षा वेगळा पण तार्किक विचार.
ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे हुगळी नदीच्या काठावर एक कारखाना उभारला. सिराज-उद-दौलाह हा बंगालचा राज्य-कारभार पाहत होता. त्याच्या परवानगीशिवाय कलकत्त्याच्या किनाऱ्यावर ईस्ट इंडिया कंपनी किल्ला बांधू लागल्याने सिराज इंग्रजांवर नाराज होता आणि त्याने कलकत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. कलकत्त्याच्या लढाईचा निकाल सिराजच्या बाजूने लागला.
यानंतर कलकत्त्याच्या ब्लॅक होलचे प्रकरण घडले. क्लाइव्हला ईस्ट इंडिया कंपनीने या सर्व घटनांचा आढावा घेण्यासाठी आणि ब्रिटिश अंमल बसवण्यासाठी पाठवले.
सिराज-उद-दौलाहच्या सैन्याचा आकार ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यापेक्षा खूप मोठा आहे हे क्लाइव्हला माहित होते आणि म्हणूनच त्याने सिराज-उद-दौलाहच्या जवळील ‘मीर जाफर‘ला आपल्या जाळ्यात खेचले आणि प्लासीची लढाई जिंकली. प्लासीच्या लढाईत सिराज-उद-दौलाहला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर सिराजने ईस्ट इंडिया कंपनीच्या करारावर स्वाक्षरी करून कंपनीला बंगालचा जमीनदार बनवले. क्लाइव्हच्या कॅल्क्युलेटेड रिस्क टेकिंगमुळे बंगाल ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात येऊ शकला.
या घटनेच्या काहीच वर्षांपूर्वीच, १७०७ साली मुघलांचा प्रभाव कमी झाला होता आणि आता ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने त्यांना बंगालमधून हाकलून लावले होते. मग तत्कालीन मुघल शासक दुसरा शाह आलम याने अलाहाबाद करारावर स्वाक्षरी केली आणि भारतात प्रभावीपणे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. पुढच्या काही वर्षांत ब्रिटिशांनी आपल्या ‘डिव्हाइड अँड काँकर’ या तत्वाने सातारा, ग्वाल्हेर, इंदौर, बडोदा, मैसूर, हैदराबाद, कोल्हापूर आणि शीखांचे साम्राज्य ही शक्तिशाली राज्येसुद्धा आपल्या ताब्यात घेतली.
क्लाइव्हला ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटनमधून तीन वेळा परत बोलावले होते. जेव्हा जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीला भारतात समस्या भेडसावत असत, तेव्हा ते समस्येचे निराकरण करण्यासाठी क्लाइव्हवरच अवलंबून राहत असत. क्लाइव्हने आपल्या भारतीय कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात ‘लूट’ केली आणि ब्रिटनमधील एका प्रशस्त हवेलीत स्थायिक झाला.
क्लाइव्हने ‘ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्स’मध्येसुद्धा जागा मिळविली. हाऊस ऑफ कॉमन्स हे युनायटेड किंगडमच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आणि प्राथमिक कक्ष आहे, थोडक्यात ब्रिटनची लोकसभा. क्लाइव्हच्या आर्थिक घोटाळ्यांची संसदीय चौकशी झाली. क्लाइव्ह मात्र आपल्या वक्तृत्वाच्या आणि पैशाच्या सामर्थ्यावर या संकटातूनसुद्धा बाहेर पडला.
परदेशात असताना नैराश्यात असलेल्या क्लाइव्हने नैराश्यावर नियंत्रण मिळवले, परिस्थितीवर ताबा मिळवला आणि त्यातून बरेच काही मिळवले. क्लाईव्हचा भारतातील प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला, म्हणून त्याला ‘क्लाइव्ह ऑफ इंडिया’ म्हणूनही संबोधले जाते. नैराश्यावर मात केल्यास तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच आपण यातून शिकू शकतो, नाहीतर एक क्लार्क ‘क्लाइव्ह ऑफ इंडिया’ बनला नसता!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.