आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अर्जुनाने कृष्णाला ‘हे मन अतिशय चंचल आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवणे वाऱ्यावर नियंत्रण मिळवण्यापेक्षाही कठीण आहे मग मी काय करू’ असे विचारले असता, कृष्ण म्हणतो, “असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् | अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ||” अर्थात, हे मन खूप चंचल आहे आणि ते नियंत्रित करणे देखील खूप कठीण आहे, तु म्हणतो ते (खरंच) आहे. पण हे कुंतीनंदन ! ते (मन) अभ्यास आणि वैराग्य यांच्याद्वारे नियंत्रित केले जाते.
तूर्तास वैराग्याचा भाग आपण सोडून देऊ, पण मनाला नियंत्रित करण्यासाठीचा ‘अभ्यास’ मानसिकच कसा आहे, यावरील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ही कथा, या कथेत तो मनावर नियंत्रण मिळवण्याचा अभ्यास रुग्णाला जमला नसला तरी डॉक्टरला मात्र जमला..
१९३७ चा हिवाळा सुरु होता. इतिहासात व्हॅन्स वँडर्स म्हणून ओळखला जाणारा एक शेतमजुर अलाबामामधील स्मशानभूमीत एका वूडू जादूगाराला भेटण्यासाठी गेला. तेथे त्यांचा एकमेकांशी वाद झाला. त्याचवेळी या जादूगाराने व्हॅन्सच्या नाकाखाली एक दुर्गंधीयुक्त द्रव पदार्थ शिंपडला. या प्रक्रियेत त्या जादूगाराने त्याच्यावर मृत्यू होण्याची जादू केली, त्याला शाप दिला. त्यानंतर लगेचच या जादूटोण्यामुळे व्हॅन्स आजारी पडू लागला, त्याची भूक कमी झाली आणि तो खूप अशक्त झाला. अखेरीस तो अंथरुणाला खिळून राहायला लागला.
काही महिन्यांच्या त्रासानंतर, १९३८ मध्ये व्हॅन्सच्या पत्नीने आपल्या पतीला डॉ. ड्रेटन डोहर्टीला दाखवले. पण डॉ. ड्रेटन डोहर्टीला निदान काय असू शकते याबद्दल शंका होती. व्हॅन्सने पन्नास पौंडपेक्षा जास्त वजन गमावले हे लक्षात घेता, त्याला क्षयरोग किंवा कर्करोग असावा अशी शंका होती. कैक चाचण्या घेतल्यानंतरही सर्व चाचण्यांचे निकाल सकारात्मक होते. पण तरीही वँडर्स मरत होता आणि डॉ. डोहर्टीला त्यामागचे कारण माहित नव्हते.
शारीरिक तपासणीत त्रास होऊ शकेल असे काहीही दिसून आले नाही. त्यामुळे रुग्णाला कोणताही रोग नसल्याचे समोर आले. म्हणून, रुग्णाबद्दल जे काही शक्य आहे ते जाणून घेण्याच्या इच्छेने, डॉ. डोहर्टीने आपल्या रुग्णाच्या पत्नीला पतीच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल विचारले. त्याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये, किंवा त्याच्या कुटुंबात सगळं काही ठीक होतं आणि मेडिकल हिस्ट्रीमुळे काही झालेलं आहे असं काहीही दिसत नव्हतं. शेवटी, तिला शापाबद्दल डॉक्टरांना सांगण्यास भाग पाडले गेले.
अखेरीस, पेशन्टच्या पत्नीने मिस्टर वँडर्स यांचा शापाच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे हे डॉ. डोहर्टी यांना हे पटवून दिले. त्यामुळे या रुग्णासोबत डॉक्टरांसारखे वागणे काही उपयोगाचे नाही हे त्याच्या लक्षात आले. मग त्याने त्याऐवजी जादूगारासारखे वागण्याचा निर्णय घेतला. मनोदैहिक मृत्यूची संपूर्णतः रोखू शकेल असा हा एकच मार्ग डॉक्टरकडे उपलब्ध होता. म्हणून, एकदा त्याला घडलेल्या सर्व गोष्टींची माहिती मिळाल्यावर डॉ.डोहर्टी काही काळासाठी बाहेर निघून गेला. तो त्याच्या पेशंटसाठी एक छोटासा शो करण्याच्या तयारीत होता.
जेव्हा डॉ.डोहर्टी परत आला, तेव्हा त्याने व्हॅन्स वँडर्सला सांगितले की तो त्या जादूगाराला भेटायला गेला होता. जादूगाराने कोणत्या प्रकारचे औषध वापरले होते ते मी शोधून काढले आहे असे डॉ. डोहर्टीने व्हॅन्स वँडर्सला सांगितले. त्या जादूगाराने त्याच्या तोंडात आणि घशात सरड्याची अंडी फुंकली होती असं डॉ. डोहर्टी व्हॅन्स वँडर्सला म्हणाला.
पुढे डॉ. डोहर्टी म्हणाला, “जोपर्यंत मी सांगेल तसं तू करणार नाहीस तो पर्यंत ते सरडे तुला आतून खाणार आहेत!” त्यावेळी डॉक्टरने त्याला उलट्या होण्यासाठी औषध दिले. त्याने एका धातूच्या बेसिनमध्ये उलटी केल्यानंतर डॉ. डोहर्टीने व्हॅन्सच्या नकळत खिशातून एक सरडा त्यात टाकला.
त्यानंतर, त्याच्या शरीरातून काय बाहेर आले आहे हे दाखवण्यासाठी त्याने पेशन्टच्या कुटुंबियांना भांड्यातील उलटीकडे पाहण्यास सांगितले. त्यानंतर, डॉक्टरांनी सरडा काढून टाकला आणि शाप तुटल्याचे घोषित केले. त्या वेळी, व्हॅन्स वँडर्स अचानक गाढ झोपला. दुसऱ्या दिवशी, तो उठला, त्याला भूक लागली आणि त्याला पूर्वीपेक्षा खूप बरे वाटले.
जरी सुरुवातीला वॅन्स वँडर्सला शाप देणारा एक जादूगार होता तरी शेवटी तो शाप काढून टाकणारा एक डॉक्टरच होता. फक्त माणसाच्या मनावर ताबा मिळवण्याचे काम करण्यासाठी जादूगार किंवा डॉक्टरांसारखे अधिकारी असणे आवश्यक आहे. नोसेबो इफेक्टने व्हॅन्सला जरी आधी आजारी पाडले तरी डॉ. डोहर्टीने त्याला पुन्हा बरे करण्यासाठी प्लेसबो इफेक्टचा योग्य वापर केला. हेच काम प्राचीन चेटूक करत असे आणि आता ते आधुनिक विज्ञानाने होते. विश्वासाची आणि धारणेची ही अशी शक्ती आहे. ही शक्ती एखाद्या शापाचे रूपांतर उपचारात करू शकते आणि उपचाराचे शापामध्ये!
म्हणूनच जेव्हा जादूगार, धर्मपंडित किंवा डॉक्टरांसारखे कोणी चांगले किंवा वाईट खोटे बोलतात तेव्हा ते सत्य बनू शकते!! उदाहरणादाखल १९९२ सालच्या ‘सदर्न मेडिकल जर्नलमधून आलेल्या ‘सायकोसोमॅटिक मृत्यूच्या पाठ्यपुस्तका’तील एक कथा आपण पाहू.
एका रुग्णाला डॉक्टरांनी कर्करोगाचे निदान केले होते. त्यानंतर, त्याला सांगण्यात आले की त्याच्याकडे जगण्यासाठी फक्त काही महिने आहेत. शेवटी तो माणूस मरण पावला तेव्हा शवविच्छेदन अहवालात त्याच्या कर्करोगाची प्रगती झाली नसल्याचे समोर आले. खरं तर त्याच्या मृत्यूचे कोणतेही कारण माहित नव्हते. शेवटी, रुग्णाच्या विश्वासाने आणि धारणेनेच त्याचा जीव घेतला. डॉ. डोहर्टी नसता तर, व्हॅन्स वँडर्सच्या बाबतीतही हेच घडले असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.