आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीला सामोरे जाते आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली.
लॉकडाऊन सर्वांना सारखा नाहीये असं खूप लोकांना मी बोलताना पाहिलं. मला सुरवातीला हा प्रश्न पडला की नेमका असा काय फरक आहे? त्यावेळी लक्षात आलं की घरात बसून मोबाईल आणि टीव्ही यांच्यासारखी मनोरंजनाची साधन वापरणं आणि घरात बसणं हे सगळ्यांच्याच नशिबात नाहीये.
एकीकडे समाजाचा एक असा भाग आहे की ज्यांच्या एकवेळच्या जेवणाचेदेखील वांधे आहेत. त्यांना कष्ट करण्याशिवाय पर्याय नाहीये.
खेडेगावात तर ही परिस्थिती विचारायलाच नको. शेतकरी असो किंवा सामान्य लोक हातात पैसे येणं बंद झाल्याने सगळे प्रचंड त्रासले आहेत. पण या सगळ्यात सुद्धा एक अवलिया असा आहे की लॉकडाऊनमुळे नाराज न होता त्याने काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला व त्यात त्याला यश आलंय.
होय!
एक असं जोडपं ज्यांनी केवळ २१ दिवसांत विहीर खणली आहे. त्यांच्या कष्टांना नशिबाची साथ मिळाल्याने या विहिरीला केवळ २५ फुटांवरच पाणी लागलं सुद्धा.
हे सगळं काम या जोडप्याने केव्हा चालू केलं? किंवा सगळे घरात बसून असताना असं काहीतरी वेगळं करावं असं या जोडप्याला का वाटलं? त्याची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमचा हा लेख वाचावा लागेल.
वाशिम जिल्ह्यात असणाऱ्या मानोरा नावाच्या तालुक्यात कारखेडा नावाचं एक गाव आहे. गावाची लोकसंख्या पहिली तर जेमतेम तीन ते साडेतीन हजार इतकी. पण हे गाव आज गावातील पखमोडे दांपत्यामुळे प्रसिद्ध झालं आहे.
कारखेडा गावातील पकमोडे ६ सदस्यांचं कुटुंब आहे. यातील गजानन यांचं शिक्षण तर केवळ दहावी इतकंच.
घरी अडीच एकर शेती पण पाण्याचा प्रचंड तुटवडा. एवढा की उन्हाळ्यात फक्त तूर व सोयाबीन ही दोनच पिके घेता येतात.
स्वतःच्या भागात असणारी पाणीटंचाई आणि लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर पाणी आणायला बाहेर पडणं शक्य नसल्याने या दांपत्याला विहीर खणण्याचा विचार सुचला. मग काय? त्यांनी यावर विचार केला, घरातील सदस्यांशी चर्चा केली आणि कामाला लागले.

हातात २१ दिवस असल्याने आपण या दिवसांत किमान पाणी लागेल इतकी खोल विहीर खणू शकतो या गोष्टीची गजानन पखमोडे यांना खात्री होती. हे पकमोडे कुटुंब एकाच निर्धाराने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कामाला लागले व त्यांनी विहीर खोदायला घेतली. ही विहीर तयार करण्याच्या मागचा उद्देश हाच होता की उन्हाळ्यात आपली पाण्याची सोय होईल.
दिवसभर साधारण ७ ते ८ तास हे कुटुंबीय या विहिरीला खणण्याचं काम करत होते. तब्बल २१ दिवस न थकता हे काम चालू होतं. कमीत कमी ३५ फुटांपर्यंत खणण्याचा त्यांचा विचार होता. पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांना फक्त २५ फुटांतच पाणी लागलं.
पाणी लागताच कष्टाचं चीज झाल्याचे समाधान या जोडप्याला झाले.
आता लॉकडाऊन संपल्यानंतर याच विहिरीला अजून १० फूट खोल करायचं आहे. त्याशिवाय विहिरीचं बांधकाम करण्याचा देखील मानस आहे, असे हे कुटुंबीय सांगतात.
पकमोडे कुटुंबीयांनी सध्याच्या काळात केलेलं हे काम नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारे ठरले आहे. त्यांच्या ह्या जिद्दीमुळे, कष्टामुळे आज ते कौतुकास पात्र ठरत आहेत. केवळ सहावी पास असणाऱ्या पुष्पा आणि दहावी झालेले गजाननराव हे आज आदर्श बनले आहेत.
एकीकडे मिळालेला वेळ सार्थकी लावणारे हे कष्टकरी जोडपे आणि दुसरीकडे घरात बसून चैनीच्या गोष्टी असतानासुद्धा कंटाळणारे नागरिक हा फरक पहिला की सगळ्यांनाच लॉकडाऊन सारखा का नाहीये या प्रश्नाचं उत्तर मिळतं.
आता विहीर खणली तिला पाणीसुद्धा लागलं. गजाननराव एवढ्यावरच थांबले नाही. स्वतःच्या कुटुंबाने एवढ्या कष्टाने खणलेली विहीर ते उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत. एवढंच नाही तर, जनावरांना पाणी पिण्यास घराशेजारी हौदसुद्धा तयार करणार आहेत. त्यांची ही कष्टाळू आणि परोपकारी वृत्ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.