आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
क्रिकेटमध्ये आपण असे अनेक खेळाडू बघितले आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर क्रिकेटमध्ये एक वेगळी उंची गाठली आहे. अशाच खेळाडूंपैकी एक आहे ख्रिस गेल!
धडाकेबाज फलंदाजीच्या शैलीमुळे ख्रिस गेल सिक्सर मॅन म्हणून क्रिकेटविश्वात प्रसिद्ध आहे. ख्रिस गेल हा तसा एक हसतमुख आणि सदैव आनंदी असणारा दिलदार खेळाडू आहे. पण आज ज्या यशाच्या शिखरावर ख्रिस गेल पोहचला आहे, तिथवर पोहचण्यासाठी त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला होता.
आयुष्यात सदैव आनंदी राहणाऱ्या ख्रिस गेलचे बालपण एका पत्र्याच्या छोट्याशा घरात गेले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ‘गेल’ला शिक्षण सोडावे लागले. गेलचा परिवार आपल्या उदरनिर्वाहासाठी कचरा उचलण्याचे काम करायचा.
एका मुलाखतीत गेल म्हणाला होता की ज्यावेळी त्याच्याकडे खायला काही नसायचे त्यावेळी तो चोरी देखील करायचा, इतकी त्याची परिस्थिती बिकट होती. त्यावेळी आयुष्याचा विचार करण्याचा वेळ देखील गेल आणि त्याच्या कुटुंबीयांकडे नसायचा, फक्त रात्री रिकाम्या पोटी झोपावे लागू नये, यासाठी अन्नाची तजवीज करण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु असायचा.
ख्रिस गेलच्या कारकिर्दीची सुरुवात जमायकाच्या लुकास क्रिकेट क्लबमध्ये झाली. वयाच्या १९ व्या वर्षी गेलने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १९९९ साली गेलने भारताच्या विरोधात आपला पहिला वन डे सामना खेळला. यानंतर सहा महिन्यांनी गेलने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला.
गेलने न्यूझीलंडच्या विरोधात आपला पहिला टी-ट्वेंटी सामना खेळला. यानंतर गेलने त्याचा खेळ अधिक चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. २००० साली आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत असताना गेलने हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. गेलच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीमुळे त्याचे नाव रनमशीन असे पडले.
२००२ साली भारताच्या विरोधात गेलने तीन आक्रमक शतक ठोकले. गेलच्या या कामगिरीमुळे वेस्ट इंडिजच्या संघात त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ख्रिस गेल हा एक असा खेळाडू म्हणून समोर आला ज्याला १-२ रन्स न काढता सरळ चौकार आणि षटकारांची भाषा बोलायला आवडते, त्याच्या या शैलीमुळे तो जगभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये लोकप्रिय ठरला. त्याला क्रिकेटच्या जगातील सुपरमॅन म्हणायला लोकांनी सुरुवात केली.
गेलच्या बॅटिंगचा तडाखा असा होता की एक टोलवलेला चेंडू परत मिळेल अशी अपेक्षाच उरायची नाही.
ख्रिस गेलने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आयपीएलमध्ये केली. खरंतर आयपीएलचा पहिला आणि दुसरा सिझन गेलसाठी फारसा चांगला नव्हता, त्याची कामगिरी निराशाजनकच होती. पण आयपीएलच्या तिसऱ्या सिझनमध्ये गेलने चमत्कार घडवला, त्याने दोन शतकांसह ६०८ धावा केल्या. यानंतर गेलचा प्रवास असाच न थांबता सुरु होता.
२०११ साली रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाकडून गेलने खेळण्यास सुरुवात केली. आयपीएलमध्ये ११२ सामन्यात गेलने ४१.९७ च्या सरासरीने ३९९४ धावा केल्या. यात त्याने ६ शतक आणि २४ अर्धशतक लगावले. आयपीएल सर्वाधिक १७५ धावा काढण्याचा विक्रम गेलने केला.
२०१८ साली रॉयल चॅलेंजर बंगलोरने गेलला बाहेरचा रस्ता दाखवला आणि आयपीएलच्या लिलावात कोणत्याच संघाने गेलला विकत घेतले नाही, यामुळे गेलचा आयपीएलमधील प्रवास संपतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने त्याला विकत घेतले. तेव्हापासून तो हा किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग आहे.
मैदानावर जरी गेल विरोधी टीमवर बरसत असला तरी मैदानाबाहेर त्याच्या इतका मवाळ हृदयी व्यक्ती दुसरा कोणीच नाही. गेलला पार्टी करायला फार आवडते. तो नेहमी भारतात आयपीएल खेळायला आल्यावर साथीदार खेळाडूंसह वेगवेगळ्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये पार्टी करताना दिसतो.
ख्रिस गेल आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असून दोघेही एकमेकांचे चाहते आहेत. विराट कोहली बंगळूर संघाचा कर्णधार असून गेल त्या संघात खेळत होता, पण आता गेल पंजाबकडून खेळत असला तरी विराट आणि त्याचे संबंध आधीसारखेच मैत्रीपूर्ण आहेत.
अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेल्या ख्रिस गेलने मेहनतीच्या व आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीच्या बळावर मोठे यश संपादन केले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.