आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रिय मेरी क्युरी,
तुझा पोलंड देश जेव्हा रशियाच्या वर्चस्वाखाली होता, तेव्हा तुझा जन्म झाला. फिजिक्सचे प्राध्यापक असणारे तुझे बाबा प्लादिस्लाव्ह स्लोदोवस्की आणि हेडमिस्ट्रेस आई ब्रोनोस्लोव्हीया. ७ नोव्हेंबर १८६७ चा तुझा जन्म. म्हणजे तू माझ्या पणजीच्या काळातील. म्हणजे जेव्हा आमच्या पणज्या, आज्या इकडे ‘चूल आणि मूल’ एवढ्याच बंदिस्त कार्यक्षेत्रात खितपत संपल्या, त्याच कालावधीत तू तिकडे पोलंडला नवेनवे शोध लावत होतीस.
तुझं बालपण करपलेलं होतं. आईच्या खोकण्याचा सततचा आवाज आणि वडिलांच्या चेहऱ्यावरची व्याकूळता तुम्हां भावंडापासून लपून राहिली नाही. घरातील गरिबी आणि दु:ख लेकरांना लहानपणीच प्रौढ बनवतं. अगदी तसंच तुझ्याबाबतही घडलं.
रशियन राजवटीत देशप्रेमी वडीलांची नोकरी गेली, त्यामुळे घरात पैसे येणं बंद झालं. म्हणून तुम्ही चारही भावंड आईसह मौजमजेपासूनही पोरके झालात.
तू शाळेतील आघाडीची गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थ्यीनी, पण आई गेल्यानंतर एकाकीपणे आयुष्य जगू लागली. डिप्रेशनच्या या भोवऱ्यातून तुला बाहेर काढण्यासाठी वडिलांनी तुला काका ड्रीजस्लाव्हकडे पाठवलं.
बायको तारूण्यातच गेल्यावर, पोरांना सावत्र आईचा त्रास होऊ नये म्हणून तुझ्या बापाने आजीवन लग्नही केलं नाही. घरात एवढी गरिबी असतानाही तो बाप दर आठवड्याला पोरांना घेऊन बाहेर गार्डनमध्ये जायचा. परवडेल ते घेऊन द्यायचा. साहित्यावर आणि भौतिकशास्रावर चर्चा करायचा. बाप तुम्हा लेकरांना सांगत रहायचा, आणि तुम्ही लेकरं ऐकत रहायची.
पुढेपुढे जेव्हा आपल्या मुलीने भौतिकशास्रात नोबेल मिळवलं, प्रबंध लिहीले, ती सगळी या नव्वदीतील बापाने वाचून काढली, संग्रहीत ठेवली आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत अभिमानाने मिरवली.
पैशांच्या कमतरतेमुळे उच्चशिक्षणास तुम्हाला अडचण येत हाेती. मुलांना उच्चशिक्षण देण्यास बाप असमर्थ होता, याचं त्या बापमाणसाला प्रचंड वाईट वाटायचं. पण पैशांपुढे कशाचंही ढोंग करता येत नाही.
जिथे खाण्याचे वांधे झालेत, तेथे उच्चशिक्षणाची स्वप्नं रंगवणं शक्यच नव्हतं. म्हणून तुम्ही ठरवलं, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पोलंडची शिष्यवृत्ती मिळवायची, ती मिळवलीही.
स्वत:सह बहिणीचं शिक्षण पुर्ण केलं. पुढे आणखी शिकण्याची इच्छा होती, तेव्हा दोन बहिणींनी मिळून योजना आखली. पहिली बहिण मेरी, काम करणार, त्यातून मिळणारे पैसे बहिणीला पाठवणार. नंतर दुसरी बहीण ब्रोन्या काम करून मेरीला पैसे पाठवणार. दोघीही उच्चशिक्षणाची भूक अशा पद्धतीने भागवणार, असं ठरवून घेतलं.
१९८३ च्या कालावधीत, दोघी बहिणींनी केलेली ही योजना, या दरम्यान मेरी जोरावस्की कुटुंबातील लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ लागली आणि त्यातून मिळणारा पैसा परदेशात शिकणाऱ्या बहिणीला पाठवू लागली.
जोरावस्की कुटूंबातील थोरला मुलगा कँशमिर, सुट्टीत घरी आला. तेव्हा शांत आणि हुशार मेरीवर त्याचं प्रेम जडलं. मेरीही त्याच्या प्रेमात पडली. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाबाबत कँशमिरने घरी विचारलं असता, एका सेविकेबरोबर लग्न करण्यास जोरावस्की कुटूंबाने मुलाला नकार दिला. त्याला घराबाहेर काढलं. नंतर पुढील शिक्षणासाठी परदेशी पाठवलं.
सुंदर असणाऱ्या आणि नुकत्याच वयात आलेल्या तुला हे ब्रेकअप पचवणं जडं गेलं. याकाळात तू प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलीस. आत्मह*त्येचे विचारही तुझ्या मनात घर करून गेले. याचदरम्यान तुला सिगारेटचं भयंकर व्यसन लागलं.
यादरम्यान पुढच्या शिक्षणासाठी तू सोरोबोन विद्यापिठात प्रवेश मिळवला. फक्त ४० रूबलमध्ये याकाळात तुला महिना भागवावा लागे. या छोट्याश्या रकमेतून खोली, भाडं, खाणे, कपडे, वह्या, पुस्तके आणि विद्यापीठाचे शुल्क, इ. गरजा तुला पुर्ण कराव्या लागत असत.
(पॅरिसमध्ये अशाप्रकारचं कठीण जीवन फक्त मेरीच नाही तर अनेक विद्यार्थी असेच जगत होते.) रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करणारी तू फळांऐवजी, चहावर आपली भूक भागवत असे, त्यामुळे अँनेमियासारख्या रोगाने ग्रस्त झालीस.
जूलै १९८३ मध्ये भौतिकशास्र विषयात पदवी प्राप्त करण्यासाठी तुला परिक्षेला बसायचे होते. त्यावेळी तू पॅरिस विद्यापीठात फिजिक्समध्ये पहिला क्रमांक मिळवला.
गरीब परदेशी मुलीने भौतिकशास्रासारख्या विषयात, असे असाधारण यश प्राप्त करणे म्हणजे एक मोठी कामगिरीच. म्हणून तूला ‘जडविगा शिष्यवृत्ती’ मिळाली आणि पुढील शिक्षण सुखकर झाले.
यादरम्यान पेरी नामक कवी मनाच्या संशोधकासोबत तुझी मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुढे दोघांनी लग्नही केले.
भौतिकशास्राच्या वेगवेगळ्या प्रयोगात तुम्ही एकमेकांना मदत करू लागलात. विवाहानंतर मेरीचे जीवन अधिक व्यस्त झाले. संशोधनाच्या कामात तुला आठ-आठ तास लागायचे. घरची देखरेख करण्यात तीन तास जायचे. अशी व्यस्तता आयुष्याने प्रदान केलेल्या मेरीला पाकशास्रापेक्षा रसायनशास्र सोप्प वाटायचं.
विवाहनंतर दुसऱ्याच वर्षी तू आयरिन नामक गोंडस बाळाला जन्म दिला. आई झालीस. पण बाळांतपणानंतर आठवड्याभरातच संशोधनासाठी प्रयेागशाळेत जाऊ लागली.
तुझ्या या पहिल्या मुलीनं, पुढे तुम्हा मायबापांसारखचं फिजिक्समध्ये नोबेल पारितोषिक मिळवलं. दूर्दैवाने आपल्या लेकीचं हे यश पहायला तुम्ही दोघही जिवंत नव्हतात गं!
१८९८ ते १९०२ पर्यंत पैसा, प्रयोगशाळा सहाय्यक यांपैकी कोणतीही सुविधा तुमच्याकडे नव्हती. तरीही उद्देशपुर्तीसाठी अनेक वर्षं तुम्ही झगडत राहिले. हताश न होता, निराश न होता, शेडरूपी प्रयोगशाळेत आपले प्रयोग चालू ठेवले.
१९०२ मध्ये या प्रयत्नांना यश मिळालं. ४५ महिन्यांच्या प्रयत्नानंतर रेडीयमचे अस्तित्व समोर आले. १० डिसेंबर १९०३ ला स्विडनच्या स्काँटहोम सायन्स अकॅडेमीने तुम्हाला नोबेल सन्मान घोषित केला. यानंतर त्या पैशांची गुंतवणूक प्रयोगशाळांची उभारणीसाठी करणारं तुम्ही दांपत्य, ज्यांनी कुठलेही पेटंट आपल्या नावावर करून घेतले नाही, तुम्ही ग्रेट आहात गं राणी!
१९०४ साली तुझ्या दुसऱ्या मुलीचा, ‘ईव्ह’चा जन्म झाला. ती अवघ्या दोन वर्षाची असताना, १९ एप्रिल १९०६ दुपारी दिड वाजता बैठकीवरून घरी येताना अपघातात तुझा पेरी मरण पावला. यानंतर तू पुर्णपणे खचली. अलिप्तपणे वागू लागली. डिप्रेस झालीस. सासऱ्यांनी या काळात तुला प्रचंड धीर दिला.
पुढे १९०९ साली सासरेही वारले आणि तुझा शेवटचा आधारही निखळला. या काळात मुलींना घडवण्यासाठी तू परिश्रम घेत होती. सोबतच तुझं संशोधन चालू होतं.
१९१० मध्ये, ९७१ पानांचा रेडीयम संदर्भातील लेखांचा संग्रह प्रकाशित केला. वयाच्या ३९ व्या वर्षी वैधव्य आल्यानंतर पॉल लँग्विनबरोबर तुझे प्रेमसंबध निर्माण झाले. यादरम्यान दोघांत झालेले प्रेमपत्ररूपी संदेश पॉलच्या बायकोने वर्तमानपत्रातून प्रकाशित केले. या विवादाच्या छायेत असतानाच, १९११ साली तुला रसायनशास्रासाठी नोबेल घोषित झालं.
पण पॉल लँगेविन आणि तुझ्या प्रेमसंबधामुळे तुला आमंत्रित करण्याविषयी नोबेल समिती पुनर्विचार करू लागली तेव्हा, “व्यक्तिगत आयुष्य तुमच्या कर्तुत्वाला मर्यादा घालू शकत नाही. त्याचा संशोधनाशी काहीही संबध नसतो.” अशी खरडपट्टी तू काढलीस. यानंतर १९११ साली दुसऱ्यांदा नोबेल मिळवलं.
१९१४ साली पहिल्या महायु*द्धात सैनिकांच्या उपचारासाठी तू केलेली मदत कौतुकास्पद आहे. एक्सरे मशिनयुक्त अँम्ब्युलन्स तयार करून जखमी सैनिकांची केलेली सेवा, यु*द्धाच्या दरम्यान फ्रान्सजवळ पैशांची चणचण निर्माण झाली, तेव्हा या मोठ्या संकटाच्या काळात तू आपले पुरस्कार, पैसे, सुवर्णपदक देशाला दिले.
यानंतरच्या काळात गरिबीत जगणं, एवढंच तुझं परिघ राहिलं. कारण आपली सर्व संपत्ती तू आधीच सरकारला देऊन टाकली होती.
वयाच्या ६०व्या वर्षीही, दोन नोबेल पारितोषिक पटकावूनही तू गरीबच होती. तुझे वार्षिक वेतन जे बारा हजार फ्रँन्क होते, तेचं तुझे एकमात्र उत्पन्नाचे साधन..
तुला कुणाचीही मदत घेणं आवडलं नाही. तू गर्दीने घाबरून जायची. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत तुझं फुलांवर प्रेम होतं. तू दररोज फुलं विकत घ्यायची. आयुष्यभर मेकअपपासून आणि आकर्षक कपड्यापासून दूर राहिलीस.
तूझं सौंदर्यशास्र तू तुझ्या शिकवण्यात शोधलं आणि ते बहरवलं. भल्यापहाटे दररोज उठून, टिपणे काढून, तू शिकवायला जात होती. विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका असणारी तू, आजही आमची लाडकी आहेस.
१९२२ साली तू क्युरी फाउंडेशन उभारले. यानंतर सततच्या दगदगीमुळे तुझंं शरीर तुला साथ देत नव्हतं. १९३४ साली प्रयोगशाळेत काम करताना तू तापामुळे अस्वस्थ झाली आणि नंतर दवाखान्यात नेत असतानाच मरण पावली. यावेळी तू अनेमियाने ग्रस्त होती असं डॉक्टर म्हणाले.
अनेमियाने ग्रस्त असणारी, दोनदा नोबेल पटकवणारी, काम करताना मरणाला जवळ केलेली तू…. आणि उपवास धरून अनेमियाच्या बळी असणाऱ्या माझ्या भारतातील लाखो स्त्रिया…. यांना तू कळावीस, म्हणून हा लेखनप्रपंच….!
तुझ्यानंतर तुझ्या दोन्ही मुलींनी नोबेल मिळवलं, ईव्हने साहित्यात तर आयरिनने फिजिक्समध्ये… अशी तू डायनॅमिक मेरी. लब्यू गं, स्रीशक्तीच्या खऱ्या रूपका!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.