आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चहा आणि कॉफी मूळ भारतातील पदार्थ नसले तरीही भारतीयांना मात्र या दोन्ही पदार्थांचे व्यसन आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दोन्ही पेयं भारतातील करोडो लोकांच्या पसंतीची आहेत. अनेकदा तर कोणते पेय सरस यावर वादही होतात, कॉफी आणि चहाच्या चाहत्यांमध्ये देखील सतत शीतयु*द्ध सुरु असते. कॉफीपेक्षा तुलनेने चहाची दुकानं जास्त दिसत असली तरी चहाप्रमाणेच कॉफी देखील प्रसिद्ध आहे.
भारतात, विशेषतः दिल्लीमध्ये आपल्याला अनेक वर्षे जुनी हॉटेल्स पाहायला मिळतात. भारतातील असंख्य जुन्या हॉटेल्समध्ये समावेश होतो प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन ‘इंडियन कॉफी हाऊस’चा. इंडियन कॉफी हाऊस नावानुसार सुरुवातीपासूनच कॉफीसाठी प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटला स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा आणि कामगारांच्या लढ्याचा इतिहास आहे. नेमका काय आहे तो इतिहास या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..
१९३६ साली मुंबईच्या चर्चगेटला इंडियन कॉफी हाऊसची पहिली शाखा सुरु झाली, सुरुवातीला याचं नाव होतं ‘इंडिया कॉफी हाऊस’. हे रेस्टॉरंट चालवण्याची जबाबदारी ‘इंडियन कॉफी बोर्ड’वर होती. अशा प्रकारच्या “इंडिया” कॉफी हाऊसेसची गरज नेमकी का भासली असावी? याचं कारण म्हणजे ब्रिटिश काळात उभ्या राहिलेल्या कॉफी हाऊसेसमध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये भारतीयांबरोबर भेदभाव केला जात असे.
इंडिया कॉफी हाऊसच्या चेनला त्यावेळी प्रचंड प्रसिद्धी मिळाली, त्यामागे भारतीयांबरोबर ब्रिटिशांच्या हॉटेल्समध्ये केला जाणार भेदभाव हे प्रमुख कारण होते. त्यावेळी लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात राष्ट्रवादाची भावना जागृत होती. जवळ जवळ प्रत्येकालाच “स्वदेशी”बद्दल आत्मीयता होती. याच्याच परिणामस्वरूप, इंडिया कॉफी हाऊसचा उद्योग दोन दशकांत प्रचंड वाढला आणि १९४० चं दशक संपता संपता, ५० चं दशक सुरु होताना इंडिया कॉफी हाऊसच्या देशभरात ७२ शाखा उघडल्या होत्या.
पण १९५० नंतर मात्र त्यांचा खप कमी होऊ लागला, आणि व्यवसायातील नुकसानीबरोबरच धोरणातील बदलामुळे १९५० च्या मध्यापर्यंत कॉफी बोर्डाने कॉफी हाऊसचे सर्व शाखा बंद केल्या.
एखादी कंपनी किंवा अशा प्रकारचे मोठे व्यवसाय, हॉटेल्स बंद होताना मात्र त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा विचार केला जात नाही. खरंतर कंपनी बंद करताना कंपनी मॅनेजमेंटने हा विचार करायला हवा, किंवा सरकारने तरी अशा प्रकारच्या कामगारांबद्दल संवेदना जागृत ठेऊन त्यांच्यासाठी तात्पुरती आर्थिक व्यवस्था करायला हवी. परंतु दुर्दैवाने तेव्हाही अशा प्रकारचे कोणतेही धोरण सरकारकडे तयार नव्हते आणि आत्ताही नाहीत.
कदाचित या कारणानेच कामगारांनी पुढाकार घेऊन कॉफी हाऊस सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच, कामगार सहकारातून या ब्रॅण्डची पुनर्स्थापना झाली, ब्रॅण्डचे नामांतर करायचे ठरले आणि त्याला नाव देण्यात आले – ‘इंडियन कॉफी हाऊस’. १९५७ साली बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे कामगारांच्या पुढाकारातून ‘इंडियन कॉफी हाऊस’च्या पहिल्या शाखा उघडल्या गेल्या.
इंडिया कॉफी बोर्ड वर्कर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, थ्रिसूर या संस्थेची १० फेब्रुवारी १९५८ रोजी स्थापन करण्यात आली. पहिले इंडियन कॉफी हाऊस ८ मार्च १९५८ रोजी त्रिशूर येथे उघडण्यात आले. थ्रिसूर, एर्नाकुलम, इडुक्की, कोट्टायम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोल्लम आणि तिरुवनंतपुरम येथे सोसायटीच्या पन्नासहून अधिक शाखा आहेत. स्वयंशासित आणि कामगारांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या कॉफी हाऊसच्या या चेनची वाढ प्रचंड वेगाने झाली.
आजमितीस ‘इंडियन कॉफी हाऊस’च्या देशभरात ४०० हून अधिक शाखा असून, या शाखांचे व्यवस्थापन १३ सहकारी संस्थांकडून केले जाते. एकट्या केरळ राज्यात ‘इंडियन कॉफी हाऊस’च्या ५१ शाखा आहेत. इतर कोणत्याही राज्यातील शाखांपेक्षा केरळमधील शाखांची संख्या सर्वांत जास्त आहे. त्यातील काहींचे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. त्रिशूर येथील शाखा १९५७ साली स्थापन करण्यात आली, ती देशातील चौथी शाखा होती आणि त्याचे उद्घाटन तत्कालीन कम्युनिस्ट, समाजवादी नेते ए. के. गोपालन यांनी केले होते. या ब्रॅण्डला कामगारांनी पुढे न्यावे यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता.
एकेकाळी ब्रिटिशांच्या भेदभावाला कृतीतूनच प्रत्युत्तर देण्यासाठी तयार झालेली ही चेन अनेक स्थित्यंतरांमधून गेली आणि आज देखील भारतीय स्वातंत्र्य चळवळीची तसेच स्वदेशी आंदोलनाची साक्षीदार म्हणून उभी आहे.
संदर्भ: इंडियन कॉफी हाऊस वेबसाईट
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.