आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या काही वर्षांत चीन आणि भारतामध्ये अनेक खटके उडाले. चीनचा मित्र देश असलेला पाकिस्तान या सर्व गोष्टींकडे तटस्थपणे बघतो आहे. चीनबद्दल आज पाकिस्तानच्या लोकांची जी भूमिका आहे ती ६०-७० वर्षांपूर्वी फार वेगळी होती.
१९५९ साली पाकिस्तान आणि अमेरिकेत एक रक्षा करार झाला होता, ज्या अंतर्गत पेशावर जवळचं बडाबोर विमानतळ पाकिस्तानने सोव्हिएत संघ आणि चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला देऊ केलं होतं.
चीन देखील तेव्हा पाकिस्तानच्या विरोधात होता आणि चीनने पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तानला आपला भूभाग म्हटले होते.
पाकिस्तानचे पहिले फिल्ड मार्शल अय्युब खान यांनी १९५८ साली पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली. ते कम्युनिस्ट चीनच्या विस्तारवादी राजकारणाच्या विरोधात होते. जनरल खान यांनी त्याकाळात भारतासमोर अशी मागणी ठेवली होती, ज्यावर आपण आज विश्वास ठेवू शकणार नाही.
अय्युब खान यांनी चीनविरोधात भारत पाकिस्तानने एकत्र येऊन सैन्यलढा उभारला पाहिजे अशी मागणी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंकडे केली होती.
२४ एप्रिल १९५९ साली हा प्रस्ताव अय्युब खान यांनी भारतासमोर ठेवला होता. हा प्रस्ताव भारतासमोर येण्याच्या एक महिन्याआधीच दलाई लामा यांनी तिबेटमधून पलायन करून भारतात शरणागती पत्करली होती. यामुळे चीन भारतावर नाराज होता.
२० एप्रिल १९५९ रोजी टोकियोत पाकिस्तानी राजदूत असलेल्या मोहम्मद अली यांनी चीनच्या सैन्याच्या तिबेटमधील हालचाली आणि पाकिस्तान प्रतीची त्यांची भूमिका याची निंदा केली होती. इतकंच नाही तर चीनविरोधात भारताला सोबत घेऊन पाकिस्तान लढा उभारणार असल्याची आणि तशी मागणी अय्युब खान यांनी भारताकडे केली असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. परंतु भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानच्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली होती. त्यांनी संसदेत सांगितले होते की ते पाकिस्तानसोबत कुठलाच सामायिक कार्यक्रम आखणार नाहीत. कुठल्याही प्रकारे दोन्ही सैन्य एकत्र लढणार नाहीत.
नेहरूंना अय्युब खान यांनी केलेली मागणी ही जम्मू-काश्मीर प्रश्नाशी निगडित वाटल्यामुळे त्यांनी आपली भूमिका बदलली होती आणि प्रस्ताव नाकारला होता. १९४८च्या यु*द्धानंतर यु*द्धबंदी कराराची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती ज्याला पाकिस्तानने नकार दिला होता, तेव्हापासून नेहरू पाकिस्तानबाबत उदासीन होते. सप्टेंबर १९५९ मध्ये अय्युब खान यांनी पाठवलेल्या प्रस्तावात जम्मू काश्मीर आणि वॉटर कॅनल या दोन समस्यांवर चर्चा होणे देखील अपेक्षित होते, पण नेहरू यासाठी तयार नव्हते. अनेक तज्ज्ञांच्या मते यावरून नेहरू आणि भारतीय सेना प्रमुख के. एस. थिमय्या यांच्यातील मतभेदांमुळे अय्युब खान यांची मागणी नेहरूंनी फेटाळली होती.
१९६० साली चाउ एन लाई यांनी भारत-चीन सीमाप्रश्न सोडण्याची मागणी केली, ज्यानुसार नेहरू यांना अकसाई चीनचा प्रदेश चीनला देऊन टाका आणि दक्षिणी हिमालय तुमच्या जवळ ठेवा असा प्रस्ताव होता, जो नेहरूंनी मान्य केला नाही. परिणामी दोन्ही देशात १९६२ साली भीषण यु*द्ध झालं, ज्यात भारत पराभूत झाला.
यातही संयुक्त राष्ट्रात सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेने भारताची बाजू घेतली ज्यामुळे पाकिस्तान नाराज झाला. यानंतर पाकिस्तानने चीनसोबत संबंध सुधारण्यास सुरुवात केली. काही काळातच सीमाबंदीचा निर्णय घेतला. १९६५ च्या यु*द्धानंतर पाकिस्तान आणि चीनची मैत्री अजून दृढ होत गेली, ती आजवर कायम आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.