आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताचं ब्राम्होस क्षेपणास्त्र दि. ९ मार्च रोजी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडलं. अर्थातच पाकिस्तानने त्वरित त्याचा निषेध करून त्याचं स्पष्टीकरण मागितलं. ही घटना अनवधानानं घडल्याचं स्पष्टीकरण भारताच्या वतीने देण्यात आलं. भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणलेले असूनही पाकिस्तानने संयम दाखवत ते मान्यही केलं. भारताच्या स्पष्टीकरणाला अमेरिकेनेही मान्यता दिली. मात्र, या घटनेमुळे फिलिपाईन्स अस्वस्थ आहे. त्या देशाने भारताकडे या घटनेबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
याचं कारणंही तसंच आहे. फिलिपाईन्स भारताकडून ब्राम्होस क्षेपणास्त्र विकत घेणार आहे. दोन्ही देशांमध्ये तसा ३७ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलरचा करारही झाला आहे. हे क्षेपणास्त्र जर असं चुकून निशाणा सोडून भरकटत दुसरीकडेच जात असेल तर त्यामध्ये काही तांत्रिक दोष आहेत का; हे फिलिपाईन्सला जाणून घ्यायचं आहे. ते स्वाभाविकच आहे.
आपण दुकानातून कोणतीही वस्तू विकत घेताना दुकानदाराला दहा प्रश्न विचारतो. जर खराब निघालं तर… अशी तंबीही देऊन ठेवतो. हा तर दोन देशांमधले करार आहे. तो ही संरक्षणसामग्रीचा. मग फिलिपाईन्स चुकून भलत्या ठिकाणी जाऊन पडलेल्या क्षेपणास्त्राबाबत सवाल करणारच! मात्र, ही घटना हा अपघात होता. ब्राम्होसमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी नाही, याची ग्वाही भारताने फिलिपाईन्सला दिली आहे.
काय आहे ब्राम्होस क्षेपणास्त्र?
ब्राम्होस हे भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेलं स्वनातीत; म्हणजे ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारं क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान आणि जमिनीवरून डागता येतं. हे कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र असून ते ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतं. भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही संरक्षण दलांना उपयुक्त असलेलं हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रही वाहून नेऊ शकतं .
काय झाला अपघात?
दि. ९ मार्च रोजी हरयाणाच्या सिरसा इथल्या वायुदलाच्या तळावरून एक क्षेपणास्त्र डागलं गेलं आणि ते पाकिस्तानच्या खानेवाल जिल्ह्याच्या मियां चिन्नू परिसरात जाऊन पडलं. या क्षेपणास्त्रामुळे आजूबाजूच्या परिसरात अल्प प्रमाणात नुकसान झालं असलं तरीही कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही.
नियमित देखभाल, दुरुस्ती करण्याचं काम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र अपघाताने डागलं गेल्याचं स्पष्टीकरण भारताच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलं आहे. भारत सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे आणि त्याच्या उच्चस्तरीय न्यायालयाला चौकशीचे आदेश दिले आहेत, असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
या अपघाताबद्दल भारताने खेद व्यक्त केला आहे. या पुढील काळात अशी दुर्घटना होऊ नये यासाठी क्षेपणास्त्र आणि अन्य संरक्षण सामग्रीच्या हाताळणीची कार्यपद्धती पुन्हा तपासून पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येईल; अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे.
भारताकडून पाकिस्तानवर कोणत्याही विशिष्ट उद्देशाने नियोजनपूर्वक क्षेपणास्त्र डागलं गेलं असल्याबाबत कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. ही घटना म्हणजे अपघाताशिवाय वेगळं काहीही नाही, केवळ औपचारिकता म्हणून या घटनेबाबत अमेरिकेकडून भारताला निवेदन पाठवण्यात आलं आहे. त्यावर आमची काहीही टिपण्णी नाही, अशा स्पष्ट शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्रह्मोसच्या लक्ष्य गाठण्यासाठीच्या यंत्रणेचं अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असेल किंवा यंत्रणेच्या पूर्ण क्षमतेची चाचणी घेतली जात असेल आणि त्याच वेळी अनावधानाने ते डागलं गेलं तर असा अपघात होऊ शकतो.
या घटनेमुळे भारताची शस्त्र आणि प्रक्षेपक हाताळणीची कार्यपद्धती सदोष आहे का; असा सवाल केला जात आहे. वास्तविक, जगभरात अशा मानवी हस्तक्षेप असलेल्या संरक्षण सामग्रीचे अपघात झाल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अमेरिका, रशिया, इंग्लंड या देशातही असे अनेक अपघात झाले आहेत. अशा अपघातांमध्ये अण्वस्त्रांच्या अपघाताचाही समावेश आहे.
सन १९५० पासून केवळ अण्वस्त्रांशी संबंधित ३२ अपघात जगभरात नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये अपघाती प्रक्षेपण, स्फोट, चोरी किंवा अण्वस्त्रांचे नुकसान यांचा समावेश आहे. जगभरात आजपर्यंत सहा अण्वस्त्रे चक्क हरवली आहेत किंवा चोरीला गेली आहेत आणि अद्याप ती परत मिळवता आलेली नाहीत.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पारंपरिक शत्रू आहेत. या देशांचे संबंध कायमच ताणलेले असतात. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या अपघाताचे पडसाद अतिशय गंभीर ठरण्याची दाट शक्यता होती. मात्र, भारताने प्रगल्भता दाखवत आपली चूक मान्य केली आणि पाकिस्ताननेही आक्रस्ताळी प्रतिक्रिया न देता भारताचे स्पष्टीकरण मान्य केले. दोन्ही देशांनी दाखवलेल्या सौजन्यामुळे एवढी गंभीर घटना घडूनही या दोन देशांतच नव्हे तर भारतीय उपखंडात शांतता आणि सौहार्द कायम राखण्यास मदत मिळली आहे.
भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडल्याच्या घटनेनंतर समाजमाध्यमांवर त्याबाबतच्या प्रतिक्रियांचा पूरच लोटला. त्यामधल्या बहुतेक प्रतिक्रिया अत्यंत उथळ होत्या. इतक्या गंभीर विषयावर व्यक्त होताना त्याबाबत तितकंच गंभीर राहणं आवश्यक आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ‘एकच क्षेपणास्त्र… आणि पाकिस्तानची टरकली,’ अशा छापाच्या प्रतिक्रियाच त्यात अधिक होत्या.
काही जणांनी संरक्षण किंवा परराष्ट्रसंबंध विषयक तज्ज्ञ असल्याच्या आविर्भावात, भारताने पाकिस्तानची संरक्षणक्षमता, त्वरित प्रत्युत्तर देण्याची तयारी तपासण्याकरता मुद्दाम हा ‘अपघात’ घडवून आणला, असं ‘विश्लेषण’ केलं आहे. वास्तविक कोणताही जबाबदार देश दुसऱ्याची क्षमता जोखण्यासाठी एक अद्ययावत क्षेपणास्त्र वाया घालवणार नाही. तसं केलं तर त्याचे आंतरराष्टीय पातळीवर उमटणारे पाडसादही त्या देशाला परवडणार नाहीत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.