आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१८९१ साली जन्माने पॉलिश असणारी मारिया सक्लोदोवस्का उर्फ मेरी आपला देश सोडून फ्रान्सला आली. तिने फ्रान्सच्या सोर्बोने विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातच त्यांची ओळख पेरी क्युरी यांच्याशी पॉलिश भौतिकशास्त्रज्ञ जोझेफ विरुसझ कोवालस्की यांनी करून दिली.
जोझेफ हे मेरीला आधीपासूनच ओळखत होते. वॉर्सा येथे त्यांनी तिच्या अभ्यासाला अर्थसहाय्य देऊ केलं होतं. त्यांनी तिला पॅरिसमध्ये आल्यावर आपल्याकडे काही काळासाठी वास्तव्यास ठेवले होते. त्यांनी सोर्बोने विद्यापीठातील तिच्या प्रवेशासाठी देखील मदत देऊ केली होती.
पेरीला जेव्हा मेरी पहिल्यांदा भेटली त्या प्रसंगाचं वर्णन मेरी यांनी करून ठेवलं आहे,
‘मी जसा खोलीत प्रवेश केला, पेरी क्युरी आपल्या फ्रेंच खिडकीच्या बाल्कनीत उभे होते. मला ते फार तरुण वाटले होते, पण त्यांचं वय फक्त ३५ वर्षे होतं. मी त्यांचा मनमोकळ्या स्वभावाने प्रभावित झाले. त्यांचा चेहऱ्यावरील हावभावांनी मला मोहित केलं. त्यांच्या अमोघ वाणीने मी मंत्रमुग्ध झाले होते व त्यांच्या स्मितहस्याने माझ्यात नवऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटलं.’
कदाचित मेरी ही पहिल्या भेटीतच पेरीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पुढे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्या भेटीगाठीतून प्रेम फुलत गेलं. पेरी पण तिच्या प्रेमात पडला. एकमेकांचा सहवास त्यांना आवडू लागला होता. एका वर्षाच्या आत पेरीने मेरीला लग्नासाठी मागणी घातली. मेरीच्या आनंदाला सीमा उरली नाही. परंतु तिने त्याला नकार दिला. ती म्हणाली की तिला पोलंडला परत जायचे आहे. ती पोलंडला परत देखील गेली. तिने पोलंडच्या क्रॅकोव विद्यापीठात नोकरीसाठी अर्ज केला, परंतु ती केवळ स्त्री आहे या एका कारणामुळे तिला ती नोकरी नाकारण्यात आली.
पेरीला मेरीने आपल्या आयुष्यात घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची माहिती दिली. पेरीने तिला तत्काळ पॅरिसला परतण्याचा सल्ला दिला. तिने थोडे दिवस विचार केला आणि पॅरिसकडे आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. २६ जुलै १८९५ ला पॅरिसच्या एका उपनगरात पेरी आणि मेरी विवाहबद्ध झाले. हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.
कमालीची बाब म्हणजे मेरीने विवाह प्रसंगी लॅबमध्ये घालते तो अत्यंत साधा ड्रेस परिधान केला होता. तिला याबद्दल विचारणा करण्यात आल्यावर ती म्हणाली की,’मी रोज हाच पोशाख परिधान करते. माझ्याकडे दुसरा कुठलाच वेगळा ड्रेस नाही.’ त्यांनी प्रॅक्टिकल करून आपल्या लग्नाला उपस्थिती लावली होती. इतक्या मेरी आपल्या कामाप्रती निस्वार्थ आणि निष्ठावान होत्या.
पेरी आणि मेरीने लग्नानंतर हनिमून पण अगदीच साध्या पद्धतीने साजरा केला होता. त्यांनी दोन सायकलवर फ्रान्सच्या ग्रामीण भागात फेरफटका मारला. या हनिमूननंतर त्यांनी स्वतःला वैज्ञानिक संशोधनाला अर्पित केलं. या दरम्यानच्या काळात त्यांना दोन कन्यारत्न देखील प्राप्त झाले. यामुळे दोघांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
पेरी आणि मेरी दोन्ही आपल्या प्रयोगशाळेत स्वतःला मूलभूत रसायनशास्त्राच्या अभ्यासात गुंतवून घेतलं. २६ डिसेंबर १८९८ साली मेरी आणि पेरी क्युरीला रेडियम मूलद्रव्याचे विघटन करणे सहज शक्य झाले. हा एक क्रांतिकारी शोध होता, असं म्हणायला हवं. या संशोधनामुळे पेरी क्युरीला हेन्री बेक्वेरलसोबत विभागून रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. मेरीला या पुरस्काराचं नामांकन मिळालं नव्हतं. पण पेरीने नोबेल समितीजवळ शिफारस केली की त्याचा कार्यात तिचेसुद्धा समसमान योगदान राहिले आहे.
नोबेल समितीने पेरीच्या शिफारसीला लक्षात घेऊन मेरीला देखील नोबेल पारितोषिक प्रदान केलं. नोबेल पारितोषिक जिंकणारी मेरी ही पहिली महिला ठरली होती. यानंतर पेरी आणि मेरी यांचे संबंध अजून दृढ होत गेले. प्रयोगशाळेतील एकमेकांचे साथीदार ते आयुष्याचा वाटेवरील साथीदार असा त्यांच्या नात्याचा प्रवास झाला होता. पण त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
१९ एप्रिल १९०६ रोजी एका घोडागाडीच्या चाकाखाली येऊन पेरी क्युरीचा दुर्दैवी अंत झाला. मेरीने अशा दुःखाच्या प्रसंगातून स्वतःला सावरले आणि आपलं संशोधन करत राहिली. १३ मे १९०६ ला त्यांना सोबोर्न विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यांनी त्या नोकरीमुळे एक मोठी प्रयोगशाळा संशोधनासाठी उपलब्ध झाली होती. जर पेरी त्यांच्या आयुष्यात आला नसता तर त्यांना कधीच ही यशप्राप्ती झाली नसती. पेरी हा एक उत्तम जोडीदार होता, ज्याने पत्नीला समान दर्जा देऊ केला होता.
खरं प्रेम कसं असतं याचा एक सुंदर वस्तुपाठ पेरी आणि मेरी क्युरी या जोडीने आपल्याला घालून दिला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.