आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
मला सांगा पेरियार चुकले कुठे होते? त्यांनी जे कार्य केले ते योग्यच केले आहे, एखादा समाज जर शिक्षण, धर्म, ज्ञान आणि इतर सर्व गोष्टींवर एकाधिकारशाही गाजवत असेल तर ज्यांचा वर अन्याय होतोय त्यांनी बंड पुकारायला नको का?
काल का परवा सुप्रिया सुळेंनी राजकीय मानस ठेऊन मागणी केली, “ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या”, परंतु त्यावर आलेल्या प्रतिक्रिया सुन्न करणाऱ्या होत्या, एका कोणीतरी प्रश्न विचारलाय की भारतरत्न देण्यासारखं काय कार्य केलं आहे?? आता ही धुसमस म्हणायची का आतली ?
ज्या लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं ते लोक आज त्यांचं कार्य विचारत आहे पण कधी स्वतःच्या आत झाकून स्वतःत सुधारणा करण्याची व आपल्या चूक सुधरवायची साधी तसदी ही मंडळी घेत नाही, याला कारणीभूत आहे ती वर्चस्ववादी मानसिकता जी अजूनही जशीच्या तशी आहे काही लोकांत, ती बदलावी असे त्यांना वाटत ही नाही आणि वेळोवेळी ती मानसिकता वर काढते.
मी सर्वार्थाने सर्वांना दोष देत नाही कारण समाजसुधारणेच्या बाजूने त्यावेळेही काही लोक होते आणि आजही अनेक लोक आहेत, समाज सुधारणा झाली नसती तर कदाचित आज आपण कुठल्या तरी आफ्रिकन, इस्लामिक देशाप्रमाणे बेचिराख झालो असतो.
आजही स्त्रिया सती गेल्या असत्या, आजही कोमल वयातील मुलींची लग्न लागली असती, आजही एका विशिष्ट जातीचं वर्चस्व राहील असतं. बाकीच्या तुम्हा आम्हाला ते पारंपरिक धंदे करण्यातच आयुष्य घालावं लागलं असतं. हे सर्व बदलणारे कोण होते ते समाज सुधारक, त्यावेळी शिव्या खाल्ल्या, शेण खाल्लं त्यांनी पण त्यांचा कार्यामुळेच आज हा समर्थ, सुंदर पुरोगामी असा भारत आपण बघत आहोत.
नरेंद दाभोळकर यांचा हत्येवर आनंद साजरा करणारी प्रवृत्ती आज समाजात वावरत आहेत, यांना अजूनही आशा आहे की त्यांचे वर्चस्व कायम राहील, आपल्या श्रेष्ठत्वाचा माज ही काही मंडळी अजूनही बाळगून आहे, परंतु यांच्या प्रत्येक प्रयत्नांना हाणून पाडण्याचं काम विवेकवादी विचार करत आहे. तो या जुलमाविरुद्ध उठून उभा राहत आहे.
आज समाजाचा प्रत्येक घटक प्रगती या एका गोष्टीवर काम करतोय, प्रत्येक घटक एकत्र येऊन काम करतोय, सण साजरा करतोय, एकमेकांच्या आनंदात सहभागी होतोय, एकमेकांच्या डब्ब्यातलं जेवण जात धर्म न पाहता वाटून खातोय, हाच विजय आहे विवेकवादाचा, बाकी मग याला तोड म्हणून आणि आपलं वर्चस्व कायम राहावं म्हणून काही समाजविघातक, मग पेरियार यांचा पुतळ्याची विटंबना करणं या सारखी कामे करत आहेत, ज्यातून त्यांना फक्त श्रेष्ठत्व सिद्ध करायचे आहे.
अय्यर व अय्यंगार या दोन जातींना वगळता इतर जातींना तामिळनाडूत नोकरी करणे, पूजा पाठ करणे, शिक्षण घेणे ह्यावर बंदी होती त्यावेळी पेरियार यांनी त्या रंजल्या-गांजल्या लोकांना वर उचलून धरायचे कार्य केले. त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं, आर्य-द्रविड ही त्यांनी केलेली मांडणी जरी चुकीची होती तरी त्यातून समाजाला आत्मभान आणायचं कार्य त्यांनी केलं.
असामाजिक प्रथांचा बिमोड केला आणि एक सुसंघटित असा तमिळ समाज तयार केला, रंजलेल्या गंजलेल्याना समानता, शिक्षण, न्यायिक हक्कांची जाणीव करून दिली, त्यामुळे ज्यांचं वर्चस्व इतके वर्ष होतं त्यांचा माज जिरला आणि त्याचाच राग काही लोक बाळगून आहेत आणि पेरियार यांचा वर टीका करत आहेत, त्यांचा पुतळ्याची विडंबना करत आहेत.
परंतु तमिळ कलाकार सत्याराज यांनी अशा प्रवृत्ती वर केलेली टीका ही योग्यच आहे, ते म्हणाले
“पेरियार हे काही पुतळ्यात , हाडामासात जिवंत नाही, ते जिवंत आहेत आमच्या विचारात…”
तसंच शाहू फुले आंबेडकर यांचा बाबतीत ही आहे, ते आमच्या विचारात जोपर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत पुतळे पाडून, ग्रंथ जाळून काहीही साध्य होणार नाही.
आज मी अनेक लोक बघतो की जे टीका करतात मेकौलेच्या शिक्षण पद्धतीवर की त्याने भारतीयांमध्ये वेस्टर्न, असामाजिक संस्कृती रुजवले जे आजच्या आमच्या व्यवस्थेला मान्य नाही, त्याने आमचं भारतीयत्व हरवलं आणि आम्ही गुलामी मानसिकतेचे झालो, काही अंशी हे बरोबरही आहे.
पण जर मुळापासून विचार केला तर दिसुन येईल की ह्याच मेकौलेच्या शिक्षणपद्धतीमध्ये सर्वाना समान शिक्षणाचा हक्क मिळाला, ह्याच मेकौलेच्या शिक्षण पद्धती मुळेच ज्यांना वेद ग्रंथांना हात लावायची मनाई होती त्यांना ते वाचण्याची संधी मिळाली, त्यामुळे सर्वांसोबत इतर प्रगती करू शकले.
शैक्षणिक समानता आली, भले ही त्यातून इंग्रज व त्यानंतर काँग्रेसने नोकर तयार केले असले, तरी त्यातून अनेक विद्वान ही उपजले आहेत ज्यांनी देशाच्या प्रगती साठी अथक परिश्रम घेतले आहेत, ज्यांच्यामुळे आज आपला देश उभा आहे, सुशिक्षित समाज उभा आहे.
या शिक्षणपद्धतीत थोडे फार बदल केल्यास , जे नव्या शैक्षणिक धोरणातून साध्य होणार आहेत, त्यामुळे भारतात एक वैचारिक परंपरा नक्कीच निर्माण होणार आहे जी या समाज सुधारकांचा व विवेकवादी विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणार आहे , ज्याची गरज आज आहे.
आजही खेड्यापाड्यात अनेक अनिष्ट रुढीगत परंपरा आहेत, अनेक अशा प्रथा आहेत ज्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, या अशा कुप्रथांचा बिमोड अत्यावश्यक आहे आणि ते साध्य शिक्षणानेच होणार आहे, अनेक सनातनवादी लोकांना ते जरी आवडणार नसलं तरी ते करावं लागणार आहे.
तेव्हा कुठे ज्या स्वर्ण युगाचे स्वप्न आपण बघत आहोत, ज्या रामराज्याची कल्पना करत आहोत ते अस्तित्वात येणार आहे, त्यासाठी अजून कितीही दाभोळकराना जीव द्यावा लागला तरी चालेल, परंतु कायम लक्षात ठेवा जीव घेतल्याने विचार संपत नसतो तो पसरत असतो आणि अजून दाभोळकर जन्माला घालत असतो.
मूर्ती तोडल्याने विचार संपत नसतो तो अजून पेरियार जन्माला घालत असतो, राष्ट्राची प्रगती विवेकवादातूनच शक्य आहे आणि धर्माचे अस्तित्व सुद्धा!
त्यामुळेच धर्म व जातीय वर्चस्वाच्या नादात आंधळे होऊन विवेकाला नाकारण्यापेक्षा त्याच्या बळावर सामाजिक उत्थान सर्व समान या भावनेने एकत्र येऊन स्वतःहून सामाजिक सुधारणा घडवून, अनिष्ट त्याचा बिमोड करून नवसमाज उभारणी करण्यातच भारताचं व हिंदू धर्माचे उज्जवल भविष्य आहे.
त्यासाठी दुसऱ्याचे विचार समजून घेण्या इतपत सहिष्णू होणे गरजेचे आहे आणि स्वतःला विवेकवादी म्हणणाऱ्यांनी सुद्धा धर्मशास्त्र व त्याचा मर्म समजून घेऊन टीका करणे यथोचित आहे कारण लोक तुमचं तेव्हाच ऐकतील जेव्हा तुम्ही त्यांचा मुळावर वार करणं थांबवाल आणि आपले विचार त्यांना स्पष्ट करून समजावून सांगाल.
मला तरी वाटते की असा वर्चस्ववाद, द्वेष मनाशी, नको त्या टीका समाज सुधारकांवर करणं टाळून, पुतळे फोडून, काहीही साध्य होणार नाही उलट भविष्यात सर्वाना सोबत घेऊन प्रगती करून विश्व गुरु भारत घडवणं जास्त त्रासदायक होईल आणि देश विघातक शक्तींना यातुन फुकट सहानुभूती भेटेल व बळ येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.