आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे!’ असे म्हटले जाते. परंतु, हे भाग्य फार कमी लोकांना लाभते. पण, जे आपल्या मागे आपल्या कीर्तीचा सुगंध सोडून जातात त्यांचे शब्द, कृती, विचारही तितक्याच अमर होऊन जातात. त्यांचे विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दिपस्तंभासारखे मार्गदर्शक बनून राहतात. अशा अजरामर व्यक्तींना कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. ते कोण्या एका समाजाचे, समूहाचे किंवा देशाचे राहत नाहीत तर ते संपूर्ण मानव समुदायाचे होऊन जातात. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांना स्वीकारले जाते. त्यांना आपले मानले जाते.
अशीच एक व्यक्ती म्हणजे थोर ग्रीक तत्वज्ञ प्लेटो. फक्त ग्रीकमध्येच नाहीतर संपूर्ण जगात प्लेटोचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्याच्याबद्दल एकेरी उल्लेख केला जातो तो त्याच्यावरील प्रेमापोटी. या प्रेमात एक आदरयुक्त नम्रता आहे. एक नवी विचारधारा जन्माला घालणारा प्लेटो फक्त ग्रीस पुरताच मर्यादित राहिला नाही. तर, संपूर्ण जगात आजही त्याच्या विचारांचे अभ्यासक मिळतील.
प्लेटोला वगळून तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची निव्वळ कल्पनाही अशक्य आहे. त्याचा गुरु सॉक्रेटीसला तत्वज्ञानात जे स्थान आहे तेच स्थान प्लेटोला आहे.
प्लेटो एका सुखवस्तू श्रीमंत कुटुंबात जन्मला. परंतु ज्ञानार्जनाची त्याची तहान खूप मोठी होती. त्यासाठी त्याने कित्येक वर्षे तपश्चर्या केली. या दीर्घकालीन तपश्चर्येचे जे फळ मिळाले ते त्याने इतरांसोबत वाटून घेतले. आजही कित्येक शतकांनंतर त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी वाचल्या जातात आणि त्यावर चिंतन केले जाते.
प्लेटोच्या बालपणाविषयी तशी ठोस काही माहिती मिळत नाही. परंतु इसवी सन पूर्व ४२८ साली ग्रीसच्या अथेन्स शहरात त्याचा जन्म झाला असा काही इतिहासकारांचा तर्क आहे. तर काही इतिहासकार इसपू ४२४ आणि इसपू ४२३ या दरम्यान प्लेटोचा जन्म झाला असावा असे मानतात.
प्लेटोच्या वडिलांचे माव अरिस्टीन आणि आईचे नाव पेरीटोयोनि होते. प्लेटो हेही त्याचे खरे नाव नव्हते असे काहींचे मत आहे. ग्रीसमध्ये मुलाला त्याच्या आजोबांचे नाव देण्याची प्रथा होती आणि प्लेटोच्या आजोबांचे नाव अरिस्टोक्लेस होते. प्लेटो हे तर त्याचे टोपण नाव होते. पण, नंतर हेच नाव अधिकाधिक रूढ झाले. आज तर कुणालाही पटणारच नाही की प्लेटो हे त्याचे टोपणनाव होते. ग्रीक भाषेत प्लेटो म्हणजे सदृढ मुलगा. प्लेटो शरीराने तंदुरुस्त होता म्हणूनच त्याला प्लेटो हे टोपणनाव मिळाले असावे.
प्लेटोच्या वडिलांचा त्याच्या लहानपणीच मृत्यू झाला आणि त्याच्या आईने दुसरे लग्न केले असे म्हणतात. प्लेटोच्या आईने त्याच्या काकाशीच दुसरे लग्न केले होते आणि प्लेटोचे हे काका ग्रीक राजा फारसच्या दरबारी राजदूत म्हणून काम करत. काकांमुळे प्लेटो लहानपणापासूनच समाजातील उच्चवर्गीय वर्तुळात वावरत होता. राजघराण्यातील लोकांसोबत त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. शिवाय, त्याकाळातील प्रसिद्ध विद्वजन्य लोकांसोबतही त्याची उठबस होत असे. या विद्वानांकडून त्याला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.
पुढे त्याने सॉक्रेटीसचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. तसे तर त्याकाळातील अनेक विद्वानांकडून त्याने दर्शनशास्त्र, साहित्य, शरीरशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयातील वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या होत्या पण, तरीही सॉक्रेटीसचा त्याच्यावर खूप मोठा प्रभाव होता.
सॉक्रेटीसचे बोलणे तो मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे. सॉक्रेटीसच्या विचारांनी प्लेटो आरपार बदलून गेला. सॉक्रेटीसच्या शिकवणुकीनेच प्लेटोच्या तत्वज्ञानाचा पाया घातला होता.
प्लेटोच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करणारी आणखी एक घटना म्हणजे पेलोपोनेसियनचे यु*द्ध. या यु*द्धात प्लेटोने सेवा बजावली होती. परंतु या यु*द्धात पराभव स्वीकारावा लागला. यानंतर अथेन्सवर स्पार्टाची हुकुमशाही सत्ता अस्तित्वात आली. स्पार्टाने अथेन्समधील लोकशाही नष्ट करून तिथे हुकुमशाही राजवट सुरु केली. या राजकीय बदलाचा प्लेटोवरही खूप मोठा परिणाम झाला.
काही काळाने अथेन्समधील घराणेशाहीचा अंत झाला आणि तिथे पुन्हा एकदा लोकशाही राज्य सुरु झाले. या काळात लोकांचे होणारे हाल प्लेटोला बघवत नव्हते. अत्यंत हळव्या मनाच्या प्लेटोने लोकांचे हे त्रास कमी व्हावेत म्हणून राजकारणात प्रवेश करण्याचे ठरवले पण, सॉक्रेटीसने त्याला राजकारणात जाण्याऐवजी तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. प्लेटोने ज्ञान मिळवावे आणि ते लोकांसमोर मांडावे हीच सॉक्रेटीसची इच्छा होती आणि प्लेटोनेही आपल्या गुरूची ही इच्छा पूर्ण करून दाखवली. सॉक्रेटीसच्या शिकवणीतील एक कणही वाया घालवणे प्लेटोला मान्य नव्हते. म्हणूनच तो सतत सावलीसारखा त्याचा पाठलाग करत राही.
सॉक्रेटीसच्या क्रांतिकारी विचारांनी तरुणांमध्ये बदल घडून येत होता. जुन्या मान्यता आहे तशा स्वीकारण्याऐवजी तरुण त्याविषयी प्रश्न विचारत होते. सॉक्रेटीस आपल्या भाषणातून राज्यातील तरुण मुलांना वाईट मार्गाला लावतो. त्यांना धर्म आणि राजनीतीबद्दल चुकीच्या गोष्टी शिकवून त्यांना बंडखोर करतो अशा प्रकारचे आरोप लावून अथेन्समध्ये सॉक्रेटीसला मारून टाकण्यात आले. सॉक्रेटीसच्या मृत्यूने प्लेटो खूपच हडबडून गेला. जिथे आपल्या गुरूला मारले तिथे राहायचे नाही असे ठरवून त्याने अथेन्स सोडले.
तो देशोदेशी फिरत राहिला. या प्रवासात त्याने सियरा, इटली, सिसिली आणि इजिप्त अशा अनेक देशांना भेट दिली. या भेटी दरम्यानच त्याची ओळख इटलीचा थोर गणितज्ञ पायथागोरस याच्याशी झाली.
पायथागोरसकडून त्याने भूविज्ञान, भूमिती, खगोलशास्त्र आणि धर्माचे ज्ञान घेतले. सॉक्रेटीस त्याच्यासोबत नसला तरी त्याची शिकवण मात्र प्लेटोसोबत नेहमीच होती.
या देशातून त्या देशात असे देशाटन करतानाही त्याने ज्ञानसाधनेची कास सोडली नाही. सॉक्रेटीसप्रमाणे त्यालाही थोर तत्त्वज्ञ व्हायचे होते. भरपूर प्रवास करून झाल्यानंतर त्याने आपले विचार लिहिण्यास सुरुवात केली. सॉक्रेटीस आणि प्लेटो यांच्यातील संवाद रुपात त्याने बरेच लेखन केले आहे. हे लेखन तीन भागात विभागले आहे. यात पहिला भाग आहे, ‘अपॉलॉजी ऑफ सॉक्रेटिस’. यात सॉक्रेटीसच्या विचारांवर विशेष भर दिला आहे आणि त्याच्या विचारांचे विश्लेषण केले आहे. प्लेटोच्या लिखाणामुळेच सॉक्रेटीसचे तत्वज्ञान आजच्या काळातही समजून घेणे सोपे झाले.
‘द रिपब्लिक’, ‘द स्टेट्समन’, ‘द लाग’, ‘इयोन’, ‘सिम्पोजीयम’ हे प्लेटोचे आणखी काही महत्त्वाचे लेखन. या लेखनात विषयाचे वैविध्य आहे. कला, विज्ञान, खगोलशास्त्र, राजनीती, समाजकारण, अशा कोणत्याच विषयाचे बंधन या लेखनाला नव्हते. जवळजवळ समाजातील सर्व अंगांना या लेखनातून त्याने स्पर्श केला होता. या लेखनातून तत्कालीन जीवनाविषयीचीही अधिकृत माहिती मिळते. त्याकाळचा समाज, प्रथा, परंपरा समजून घेण्याच्या दृष्टीनेही हे लेखन महत्वाचे आहे. प्लेटोच्या अचूक निरीक्षणामुळे या लेखनाला एक उच्च दर्जा लाभाला आहे. म्हणूनच आजच्या काळातही त्याचे लिखाण कालबाह्य झालेले नाही.
काही काळाने प्लेटो पुन्हा अथेन्सला परतला. तिथे त्याने स्वतःची एक अकॅडमी स्थापन केली. त्याकाळी पाश्चिमात्त्य देशात उच्चशिक्षणासाठी ही संस्था चांगलीच प्रसिद्ध झाली होईत. या अकॅडमीतून शिकून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी एक ख्यातनाम तत्त्वचिंतक म्हणून नावारूपास येत असे. म्हणून या अकॅडमीलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली.
या अकॅडमीतील प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्याशी निगडीत बाबींवर इतके ज्ञान मिळत असे, की आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर त्याला या ज्ञानाचा उपयोग होऊ शकेल.
सॉक्रेटीसची शिकवण आणि त्यानंतर केलेला भरपूर प्रवास, वेगवेगळ्या देशातील विद्वानांकडून वेगवेगळ्या विषयांवर केलेला अभ्यास अशा अनेक गोष्टींमुळे प्लेटोचे ज्ञान समृद्ध झाले होते. ज्ञानाच्या क्षेत्रातील कुठलाच विषय त्याच्यासाठी वर्ज्य नव्हता. परंतु इतक्या प्रगाढ ज्ञानाचा त्याने कधीच गर्व केला नाही. त्याने नेहमीच आपले ज्ञान इतरांसाठीही खुले ठेवले. ज्योतीने ज्योत पेटते तसेच ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते म्हणतात ते काही खोटे नाही. म्हणूनच प्लेटोचा हा ज्ञानप्रवाह आजही अखंडितपणे वाहतो आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.