आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
समाजावर नेहमीच लेखक, विचारवंत आणि तत्त्ववेत्ते विचारांचा प्रभाव जाणवतो. तर लेखक, विचारवंत आणि तत्त्ववेत्ते घडवण्यासाठी त्यांच्या आजूबाजूचा समाजच कारणीभूत असतो. हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. कालातीत विचार मांडणारे विचारवंत, लेखक नेहमीच स्मरणात राहतात. तसेच आपल्या काळाची कठोर चिकित्सा करणारे विचारवंतही नेहमीच लक्षात ठेवले जातात.
मानवता आणि करुणेची शिकवण देणारे विचारवंत सगळीकडे पुजले जातात. पण, सत्तालालसेला पाठींबा देणाऱ्या विचारवंताविषयी कुणी चकार शब्दही उच्चारत नाही. असे आपल्याला वाटत असले तरी वास्तव चित्र मात्र उलटेच दिसते. राजेशाही असो की लोकशाही दोन्हीकडेही सत्तापिपासू वृत्तीचे लोक आहेत. अशा सत्तापिपासू लोकांना आपली सत्ता कशी टिकवावी, कशी वाढवावी याचे ज्ञान देणारा एक विचारवंत म्हणजे निकोलो मॅकीयावेली.
पंधराव्या शतकात युरोपमध्ये जन्मलेल्या निकोलोचे ‘द प्रिन्स’ हे पुस्तक वाचलेल्या कुणालाही वाटणार नाही की, त्याच्या विचारांवर प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जावी.
प्रिन्स म्हणजे राजकुमार. राजकुमार म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक सद्गुणी, सद्वर्तनी आणि लोभस, संपन्न व्यक्तिमत्त्व उभे राहते. राजकुमार राम आणि राजकुमार गौतमाच्या गोष्टी ऐकून वाढलेल्या लोकांना कधीच राजकुमार हा लांडग्यासारखा कपटी आणि वाघासारखा क्रू*र असावा असे वाटणे शक्यच नाही.
पण, निकोलोने ‘द प्रिन्स’मध्ये मात्र हेच सांगितले आहे की, एका राजामध्ये लांडग्याचे आणि वाघाचे गुण अवश्य असले पाहिजेत. राजा लांडग्यासारखा लबाड आणि धूर्त तर असलाच पाहिजे पण वाघासारखा चपळ आणि प्रसंगी क्रूरही असला पाहिजे.
कारण, फक्त दयाभावनेवर एक राजा कधीच आपले राज्य यशस्वीरीत्या चालवू शकत नाही, असे निकोलीचे मत होते.
निकोलोचा जन्म युरोपमधील फ्लॉरेन्स शहरात १४६९ साली झाला. त्याच्या जन्माच्या वेळी फ्लॉरेन्समध्ये गणतंत्र होते. निकोलोचे वडील वकील होते. निकोलोला त्यांनी लहानपणापासूनच चांगले शिक्षण दिले. तो फ्लॉरेन्समधील सरकारी सचिव आणि सल्लागार होता. त्याने राजकारण जवळून अनुभवले होते. गणतंत्र असल्याने सरकारी नेतृत्व कमजोर असेल तर लोक छोट्याछोट्या कारणावरूनही सरकार खाली खेचत असत. यामुळे राज्याला कधी स्थिर सरकार मिळून राज्याची प्रगती झालीच नाही.
पोपची सत्ता सर्वोच्च मानली जात असली तरी, काही सत्ताधीश पोपलाही आव्हान देत होते. त्यामुळे चर्च आणि सत्ताधीश यांच्यातही कायम रस्सीखेच चाललेली असे. फ्रांस, स्पेन, रोम या राज्यांत सतत संघर्ष होत असत. ज्याचा परिणाम राज्यातील स्थिरता आणि शांततेत बाधा निर्माण होऊ लागली. या अनुभवावरूनच निकोलोचे विचार लोकशाही विरोधी बनले असे म्हटले जाते.
१९४९ पूर्वी फ्लॉरेन्समधील मेडीची घराण्याची सत्ता होती. १९४९ साली मेडीची घराण्याची हकालपट्टी करून तिथे गणतंत्र पद्धती स्वीकारण्यात आली. याच गणतंत्र राज्याच्या काळात निकोलो राज्याचा सल्लागार आणि सचिव होता.
मेडीची घराण्याची सत्ता येताच त्यांनी आपल्या पूर्वीच्या सरकारमधील सर्वच कर्मचाऱ्यांना अटक करून तुरुंगात डांबले. निकोलीवर मेडीची घराण्याविरोधात कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि याच कारणाने तुरुंगात जावे लागले. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्याला फ्लॉरेन्स सोडून जाण्याच्या अटीवर मुक्त करण्यात आले. फ्लॉरेन्समधून बाहेर गेल्यावरच त्याने ‘द प्रिन्स’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाने निकोलोला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी आज सात शतकानंतरही त्याला फक्त याच पुस्तकासाठी ओळखले जाते.
‘द प्रिन्स’ हे एक छोटेसे पुस्तक आहे, जे निकोलोने फ्लॉरेन्सचा राजा लॉरेन्जो द मेडीची याला भेट देण्यासाठी लिहिले होते. या पुस्तकात निकोलोने सत्ता हस्तगत करणे आणि ती टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले आहे.
ज्या समाजात दुष्ट, स्वार्थी लोक राहतात त्या समाजात जर तुम्ही दयाळू आणि निस्वार्थीपणाने राज्य करू पाहाल तर यात तुमचा नक्कीच तोटा होण्याची शक्यता आहे. एखाद्या राजाला जर आपली सत्ता अधिक काळ टिकवायची असेल तर राजाला थोडेसे कठोर वर्तन करणे गरजेचे असल्याचे निकोलो म्हणतो. परिस्थितीनुसार राजाने आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे.
निकोलोने राजाला दिलेले काही सल्ले त्याच्याच शब्दात वाचा-
- राजाला जनतेवर जे काही अ*त्याचार करायचे असतील ते सर्व त्याने एकाच दमात केले पाहिजे.
- जनतेला फक्त आशा आणि आश्वासनांचीच गरज असते. गोड बोलून राजाने जनतेचा उत्साह वाढवत राहिला पाहिजे. जनतेची स्वप्ने भंगली तरी आपल्या नेत्याचे सांत्वनपर आणि संवेदनशील शब्द ऐकूनच जनता आश्वस्त होते.
- माणसाचा स्वभाव निसर्गत:च कृतघ्न, तापट, धूर्त, भित्रा आणि लालची असतो, म्हणून त्यांना दटावून ताब्यात ठेवणे जमले पाहिजे. जनतेला प्रेमाने ताब्यात ठेवता येत नाही. राजाला स्वच्छ चारित्र्याचे ढोंग करणे जमले पाहिजे. त्याचे असे म्हणणे होते की ‘एखादी व्यक्ती आपल्या वडिलांच्या खु*न्याला माफ करू शकते पण, आपली संपत्ती लुटणाऱ्याला कधीच माफ करू शकत नाही’.
- मोठमोठी ध्येये साध्य करण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब केला तरी नंतर त्याचे परिणाम पाहून जनता अनैतिक मार्गांच्या अवलंबनाकडे दुर्लक्ष करते.
- सत्ता मिळवण्यासाठी जशी बळाची आवश्यकता असते तशीच ती टिकवण्यासाठी छळाची आवश्यकता असते.
निकोलोचे हे विचार निश्चितच हुकुमशाहीचे समर्थन करतात. आजच्या लोकशाहीच्या जमान्यात या विचारांचे कुणीही उघडपणे समर्थन करताना दिसणार नाही, पण आजचे नेतेही निकोलोच्याच तत्त्वाने चालतात हे वास्तव आहे.
हिटलर, मुसोलिनी, स्टालिन यासारख्या हुकुमशहांनीही निकोलो मॅकियावेलीच्या या विचारातूनच प्रेरणा घेतली होती असे म्हटले जाते. पण, याचा कोणताही ठोस पुरावा आढळत नाही.
निकोलो मॅकियावेलीच्या या विचारांवर विचार केल्यास लोकशाहीचे महत्त्व पटल्यावाचून राहत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.