आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जग एकदम लहान झालं आहे. आपल्याला हवी ती माहिती काही सेकंदांत आपल्याला मिळवता येते. याच क्रांतीमुळे जगभरातल्या बातम्या देखील आपल्याला घरबसल्या फुकटात वाचायला मिळतात. परंतु बऱ्याचदा आपण या इंटरनेटच्या माध्यमातून मिळणाऱ्या बातम्यांची शहानिशा न करता तशाच पुढे पाठवून देतो.
याच कारणामुळे समाजामध्ये अनेक अफवा पसरल्या जातात. त्यामुळे समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं आणि त्यातून अनेक प्रकारच्या दुर्घटना घडतात.
साहजिकच आपण या पसरणाऱ्या अफवांसाठी किवा फेकन्युजसाठी फेसबुक, व्हाट्सॲप या सोशल नेट्वर्किंग साईटला दोषी धरतो. परंतु या सोशल नेट्वर्किंग साईट्स येण्याच्या देखील कितीतरी आधीसुद्धा आपल्या समाजात अशा अफवांचे पेव फुटत होते.
पोरं पळवणारी हाकामारी असल्याच्या संशयावरून गावागावात कित्येक स्त्रियांच्या ह*त्या झाल्या आहेत. तेव्हा फेसबुक, व्हाट्सॲप, टेलिग्राम वगैरे काही नव्हतं. फेक न्यूजचा इतिहास मानवी इतिहासाइतकाच जुना आहे. फक्त त्या पसरवण्यासाठीचे मार्ग तेव्हा वेगळे होते आता ते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अजून प्रगत झाले आहेत.
साधारण १४७५ सालची इटलीच्या त्रेन्त शहरातील गोष्ट आहे. ‘बर्नार्डीन ‘नावाच्या एका ख्रिस्ती धर्माप्रचारकाने चर्चमध्ये प्रवचन देताना सांगितलं, की स्थानिक ज्यू लोकांनी एका लहान मुलाची ह*त्या केली आणि त्याचं रक्त पिऊन इस्टर साजरा केला.
ही भयंकर अफवा वाऱ्यासारखी देशभर पसरली. सगळीकडे ज्यू लोकांबद्दल संताप उफाळून आला.
राजपुत्र ‘बिशप जोहान्स हिंडर बा’ याने या परिस्थितीचा वापर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला. त्याने मृत बालकाला मरणोत्तर संत ‘सायमन ऑफ ट्रेट’ घोषित करून त्याच्या नावावर शंभर चमत्कार चिटकवले.
अशा या महान संताच्या ह*त्येसाठी त्याने शहरातील सर्व ज्यू समाजाला दोषी धरलं. त्याच्या ह*त्येसाठी त्रेन्त शहरातील आणि संपूर्ण इटलीमधील कित्येक ज्यूंना जिवंत जाळण्यात आलं. ‘पोप सिक्स्टस’ने सदर घटना खोटी असून, ज्युंवरील ह*ल्ले थांबवण्याच आवाहन केलं. परंतु ज्यू द्वेष्ट्या बिशपने ते ऐकण्यास नकार देत ज्यू बद्दलच्या अशा अनेक अफवा पसरवणं चालू ठेवलं.
या कारणाने बहुसंख्य ख्रिस्ती जनतेमध्ये ज्यूद्वेषाची लाट सबंध इटलीभर उसळली आणि ज्यूंचं मोठ्या प्रमाणावर शिर*काण झालं. या घटनेला फेक न्यूजचं पहिलं मोठं उदाहरण म्हणता येईल.
पंधराव्या शतकात योहान्स गुटेनबर्गने प्रिंटींग प्रेसचा शोध लावला. त्यामुळे युरोपमधील साक्षरता वाढीस लागली. खोटी माहिती छापून वितरीत करणं जास्त सोयीस्कर झालं. पुढे विज्ञान आणि चर्च यांच्या सैद्धांतिक मतभेदामुळे एकाच घटनेवर दोन विरुद्ध संदर्भांची माहिती प्रसारित केली जाऊ लागली त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. खोट्या बातम्या, घटना छापून पत्रक स्वरुपात वाटणं चालूच राहिलं.
गॅलिलिओ गॅलिली खटल्यानंतर मात्र प्रकाशकांनी छापलेल्या माहितीची शहानिशा करून संबंधित माहितीचा संदर्भ छापायला सुरु केलं.
जगाचं राजकारण वेगळा आकार घेऊ लागलं तेव्हा काही वर्तमानपत्रांची सुरुवात झाली. आजच्याप्रमाणेच त्या काळातली वर्तमानपत्रे देखील एका विशिष्ट पक्षाला किवा व्यक्तीला वाहिलेली असत. त्यातला बराचसा मजकूर खोटा आणि राजकीय फायद्यासाठी छापलेला असे.
आजचे आघाडीचे वर्तमानपत्र ‘द सन’ ने १८३५ साली चंद्रावर एक एलिअन संस्कृती सापडल्याची खोटी बातमी तिखट मीठ लाऊन महिनाभर चालवली.
माणूस आणि वटवाघुळ यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका जीवाचा फोटोसुद्धा त्यांनी छापला होता. या एलिअन प्रजातीबद्दल वाचण्यासाठी लोकांच्या द सन वर अक्षरशः उड्या पडत.
त्या काळात त्यांचा खप वीस हजाराच्या वर गेला. पुढे ही बातमी खोटी असल्याचं सिद्ध झालं तरीही त्यांच्या विक्रीत फार घट झाली नाही. एखाद्या वर्तमानपत्राने एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीने फेक न्यूज चालवण्याची ही पहिलीच वेळ होती. पुढे त्याचं हे मोडेल अनेक वर्तमानपत्रांनी कॉपी केलं. वर्तमानपत्रातील अशा फेक न्यूज मुळे छोट्या मोठ्या घटना होत राहिल्या.
मॉर्निंग जर्नल नावाच्या एका अमेरिकन वर्तमानपत्राने क्युबा मध्ये स्पानिश अधिकरी अमेरिकन नागरिकांवर अत्याचार करत असलेली बातमी छापली.
बातमीसोबत स्पॅनिश अधिकारी अमेरीकन महिलेचे कपडे काढून तिची झडती घेत असलेल एक खोटं चित्र छापलं. त्याचं पर्यावसन पुढे स्पानिश अमेरिकन यु*द्धात झालं.
जनभावना चेतवण्यासाठी खोटे इंटरव्ह्यू, खोट्या बातम्या घेणं याला येलो जर्नालीजम (पीत पत्रकारिता) असं नावं पडलं.
जर्मन हुकुमशहा हि*टल*र याचा खास विश्वासू कार्ल गोबेल याने याच फेक न्यूज आणि पद्धतशीर चालवल्या जाणाऱ्या खोट्या प्रचाराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पुढे याच तंत्राला गोबेल तंत्र असं नाव पडलं. १९९३ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी पत्रकारांना त्याचं भाषण ऐकण्यासाठी बोलवलं. भाषणाच्या शेवटी प्रश्नोत्तरांच सत्र देखील ठेवल होतं. ती जगातील पहिली प्रेस कॉन्फरन्स.
पत्रकारांना पाहिजे ती माहिती आपणच दिली तर ते इकडे तिकडे डोकावून खोट्या बातम्या छापणार नाहीत असा त्यामागचा त्यांचा अंदाज होता.
नंतरच्या काळात प्रत्येक राजकीय पक्षाने, विचारधारेने आपापले मुखपत्र सुरु करून फेकन्युज आणि प्रोपोगंडामध्ये आणखीन भर घातली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वर्तमानपत्राने विविध विषयांवर संशोधनात्मक, तटस्थ आणि विश्वासार्ह लेख, बातम्या देऊन एक वेगळा पायंडा पाडला. त्यांनी सरकार आणि मोठ्या उद्योजकांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. परंतु पत्रकारितेच्या जगात या प्रकारची उदाहरणे अगदीच नगण्य आहेत.
रेडीओच्या प्रचारानंतर लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याची गती वाढली. त्याचा गैरवापर तर अपेक्षेपेक्षा लवकर सुरु झाला.
एकदा अशाच एका अमेरिकन रेडीओवरून एलिअन आर्मी ने पृथ्वीवर ह*ल्ला केल्याची बातमी प्रसारित केली. देशभर मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण झालं.
एकूणच काय तर बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबारोबत फेक न्यूज पसरवण्याचे माध्यम बदलत गेले आहेत.
सध्याच्या काळात या खोट्या बातम्यांमुळे अनेक ठिकाणी सरकारं कोसळली आहेत. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झालेली आहे. मॉब लीन्चींगच्या कित्येक घटना आपल्या आसपास घडलेल्या आपण पाहिल्या आहेत. परंतु आपल्या संवेदना बोथट झाल्याने आपल्याला यातली तीव्रता कधी फारशी जाणवत नाही.
विसाव्या शतकाच्या शेवटी माहितीतंत्रज्ञान क्रांती झाली आणि लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचा वेग आणखीन वाढला.
त्याच बरोबर माहितीचे वहन दोन्ही बाजूने होऊ लागले. साहजिकच फेक न्यूजचा धोका देखील वाढला. आज इंटरनेट अक्षरशः फेक न्यूज आणि प्रोपोगंडाचे भांडार झाले आहे. फेक न्यूज, वेल रन प्रोपोगंडा कशाप्रकारे सरकार उलथून टाकू शकतो हे सबंध जगाने पाहिलं आहे.
एकंदरच फेक न्यूजचा आवाका आणि इतिहास पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे सरकार अथवा कोणतीही व्यवस्था यावर अंकुश घालण्यास असमर्थ आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.