आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या कार्यकर्त्यांमध्ये दुर्गा भाभी म्हणून परिचित असणाऱ्या दुर्गा देवी नामक एका स्त्रीने भारतात ब्रिटिशांविरोधात सुरू असलेल्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
भगतसिंह, सुखदेव थापर, चंद्रशेखर आझाद आणि इतर अनेक क्रांतिकारक या संघटनेशी संबंधित होते. इतर अनेक महिला क्रांतिकारकांप्रमाणे दुर्गा देवींनी ब्रिटिशांच्या एकाधिकारशाही विरोधात लढा दिला होता.
दुर्गा देवींचा जन्म ७ ऑक्टोबर १९०७ रोजी प्रयागमधील एका गुजराती ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईच्या मृत्युनंतर व वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला होता. अत्यंत कमी वयात त्यांचा भागवत चरण व्होरा यांच्याशी विवाह झाला.
विवाहानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याकाळच्या इतर लग्नांप्रमाणे दुर्गा देवी यांच्या नशिबी चूल आणि मूल आलं नाही, त्यांचे पती हे एक विद्रोही होते. ज्याचा दुर्गा देवींवर मोठा प्रभाव पडला व त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला.
त्यांचे पती हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचे सदस्य होते , त्यांच्यामुळेच दुर्गादेवी या संघटनेच्या संपर्कात आल्या,
त्यांचे पती एका अत्यंत सधन गुजराती कुटुंबातील होते. लाहोरच्या नॅशनल कॉलेजातून शिक्षण घेत असताना त्यांची भगत सिंहांशी भेट झाली. या भेटीनंतर विचार जुळल्याने त्यांच्यात खास मैत्रीचं नातं निर्माण झालं. काही दिवसांतच हे या संघटनेशी संबंधित सर्व कार्यकर्त्यांचा दुर्गा देवी यांच्या घरी वावर वाढला.
या कार्यकर्त्यांचा संपर्कात आल्यावर त्यांनी क्रांतिकार्यात आपला सहभाग वाढवला होता. सशस्त्र क्रांतीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
त्या संघटनेच्या कामकाजात सक्रिय झाल्या. त्यांनी नवभारत सभा नामक अजून एका समविचारी संघटनेचे सदस्यत्व देखील स्वीकारले. त्यांनी कर्तार सिंह सारभा यांच्या अकराव्या शहिद दिनाचे आयोजन १६ नोव्हेंबर १९२८ रोजी केले होते.
त्यांनी भगत सिंह, सुखदेव आणि आझाद यांना आईची माया दिली व सोबतच ब्रिटिशविरोधी क्रांतीच्या कार्यासाठी प्रेरणा देखील दिली. त्यांना हे सर्व क्रांतिकारक प्रेमाने ‘दुर्गा भाभी’ म्हणत. त्यांनी आपल्या पतीबरोबर संघटनेच्या विमल प्रसाद जैन या सदस्याला दिल्लीत बॉ*म्बगोळे बनवण्याचा कारखाना चालवण्यात मदत केली होती.
जतींद्रनाथ दास या कार्यकर्त्याचा सलग ६३ दिवस उपोषण केल्याने मृत्यू झाला. त्याचा विधिवत अंत्यसंस्कार पार पाडायचे काम देखील दुर्गादेवींने केले होते.
१९ डिसेंबर १९२८ रोजी भगत सिंहांनी सँडर्सचा वध केला, यानंतर सबंध ब्रिटिश फौजेने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुर्गा देवींनी भगत सिंहांना पलायन करण्यात मदत केली. दुर्गा देवी यांना लाहोरला एकटं सोडून त्यांचे पती भगवतीचरण हे कोलकात्याला काही सरकारी कामाला गेले होते. त्यावेळी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू त्यांच्या घरी आश्रयाला आले. दुर्गा देवींनी त्यांना संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले.
भगतसिंहांनी स्वतःचा वेष संपूर्णपणे बदलला, आपले केस छोटे केले. भगतसिंहांनी त्यांना आपली पत्नी असल्याचे भासवण्यास सांगितले. त्यांनी यासाठी नुसती तयारीच दर्शवली सोबतच त्यांनी या तिघांना आर्थिक मदत देखील केली. त्यांनी भगत सिंह यांची पत्नी होण्याचं ढोंग करण्यासाठी दिलेली संमती त्याकाळातील एक क्रांतीकारक बाब होती. दुर्गा देवी नसत्या तर भगत सिंहांना अजून एक वर्षाचं आयुष्य मिळालं नसतं, इतकी मदत दुर्गा देवींनी त्यांना केली होती.
त्यांनी भगत सिंहांच्या पत्नीचा वेष परिधान केला. आपल्या मुलाला सोबत घेऊन त्यांनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी दिली. त्यांनी रेल्वेच्या फर्स्टक्लास डब्ब्यात चढून, आपलं सामान तिसरा डब्ब्यात ठेवलं. यावेळी राजगुरू यांनी त्यांच्या नोकराची भूमिका घेतली. अत्यंत शिताफीने ते पसार झाले.
पुढे एका स्थानकावर दुर्गा देवी उतरल्या व भगत सिंह व त्यांचे साथी भूमिगत झाले, यानंतर त्यांनी सशस्त्र उठावात सहभाग नोंदवला. कोलकात्याला जाऊन त्यांनी आपल्या पतीची भेट घेतली. त्यांनी भगत सिंहांच्या सुटकेत दिलेल्या योगदानामुळे त्यांचं कौतुक केलं.
कोलकातामध्ये त्यांनी बॉ*म्ब बनवणाऱ्या क्रांतिकारकांना सहकार्य केले होते. ८ एप्रिल १९२९ साली सेंट्रल असेंम्बलीत झालेल्या स्फो*टात याच बॉ*म्बचा वापर करण्यात आला होता. दुर्गादेवींनी भगत सिंह व बटूकेश्वर दत्त यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंदोलन देखील केले होते.
त्यांनी क्रांतिकारकांना शस्त्र पुरवठा करण्यात देखील एक महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना दिल्लीतल्या क्रांतिकारकांना शस्त्रपुरवठा करण्याचा आरोपाखाली तीन वर्षांचा कारावास झाला होता. आपल्या साडीत त्या शस्त्रास्त्रे लपवून क्रांतिकारकांना पोहचवत होत्या. त्यांनी त्याठिकाणी एका युरोपियन जोडप्याला मारहाण केल्याची देखील नोंद आहे.
यामुळे भारतीय इतिहासातील पहिली महिला क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. परंतु भगतसिंह , राजगुरू आणि सुखदेव यांच्या फाशीला रोखण्याचा प्रयत्न करून देखील यश आलं नाही. १९३१ साली त्यांनी भगत सिंहांची फाशी रद्द करण्यासाठी गांधींजीना विनंती करायला सांगितली होती.
दुर्गा देवींचे पती भगवंत यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्या खचल्या नाहीत, त्या राजकारणात सक्रिय झाल्या, १९३७ साली त्या दिल्ली काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा बनल्या. पण एकाएकी त्यांनी १९४० साली राजकारणातून संन्यास घेत लखनऊ येथे एका शाळेची स्थापना केली. ही शाळा सिटी मोंट्सरी स्कुल म्हणून आजही लखनऊ शहरात आहे. १९५६ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी शाळेला भेट दिली होती. दुर्गा देवींनी पुढे आयुष्यभर विद्यादानाचे कार्य केले. १५ ऑक्टोबर १९९९ साली वयाच्या ९२व्या वर्षी या थोर क्रांतिकारकेला देवाज्ञा झाली.
त्यांचा सर्वार्थाने क्रांतिकार्याने भरलेल्या चरित्राने एक नवा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र आदरांजली!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.