आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
कोरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास संपूर्ण जग प्रभावित झालेले आहे. या नव्या विषाणूच्या आक्रमक प्रसारापुढे मोठे मोठे देश देखील हतबल झाले आहेत. एक तर हा विषाणू नवीन असल्याने यावर लस उपलब्ध नाही आणि याच्या प्रसाराचा वेग मात्र प्रचंड आहे. अशावेळी बहुतांश राष्ट्रांनी सोशिअल डिस्टन्सिंग हाच एकमेव प्रभावी पर्याय शोधला आहे. यामुळे बऱ्याच देशातील दळणवळण आणि कारखाने देखील बंद आहेत.
सर्वच देशातील अर्थव्यवस्था अगदी जैसे थे स्थितीत आहेत. पण, यातून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असला तरी, पर्यावरणाच्या दृष्टीने मात्र या काळात एक सकारात्मक गोष्ट घडत आहे.
दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होऊन हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या दाहक समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. ज्याचे दुष्परिणाम अजूनही काहीशा प्रमाणात अदृश्य असले तरी, एकवेळ अशी येईल की संपूर्ण प्राणिमात्राला याचे चटके बसू शकतात.
अगदी याच वर्षी ऑस्ट्रेलिया आणि अमेझॉनच्या जंगलात पेटलेल्या आगीने याची एक झलक दाखवून दिली आहेच. त्यामुळे याच्या परिणामांपासून आपण अगदीच अनभिज्ञ आहोत असे अजिबात नाही.
मात्र ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे अध्यक्ष रॉब जॅक्सन यांच्या मते यावर्षी मात्र दरवर्षीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ५% नी घसरू शकते. अर्थात, इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्याची ही इतिहासतील पहिलीच वेळ असेल. दुसऱ्या महायुद्धानंतर हेच प्रमाण १.४% नी खाली आले होते. पण, त्याच्याही तुलनेत यावर्षी होणारी घसरण अधिक आहे.
जॅक्सन म्हणाले की,
“यावर्षी ५% किंवा त्यापेक्षाही अधिक कार्बन उत्सार्जानातील घट पाहून मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अक्षरश: दुसरे महायुद्ध संपल्यापासून इतक्या कमी प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोव्हिएत युनियनचे पतन किंवा गेल्या ५० वर्षातील तेल निर्मिती किंवा बचत किंवा कर्जाच्या संकटामुळेही कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणावर इतका मोठा परिणाम झाला नव्हता.”
हवामान संशोधकांनी व्यक्त केलेल्या या नवीन अंदाजानुसार ‘संकटाच्या काळातही दिलासा देणारी बातमी’, असे म्हणायला हरकत नाही. तसेही हवामान तज्ञांनी जगातील सर्व देशांना हा इशारा दिलाच होता की हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यावश्यक आहे.
अर्थात, हवामानाच्या दृष्टीने हा बदल सकारात्मक असला तरी यामागची प्रेरणा मात्र दुखद कारणातून पुढे आली आहे, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. जगभरात ९ लाख ५० हजारहून अधिक लोक कोरोनाग्रस्त झाल्याने जगभरातील सरकारांना देशातील कारखाने, विमानतळे बंद ठेवणे आणि कोट्यावधी नागरिकांना घरीच बंदिस्त राहण्यास भाग पडले आहे.
जागतिक स्तरावरील आरोग्य आणीबाणीच्या स्थितीमुळे हा बदल पाहायला मिळत आहे, ही बाब खेदजनक आहे.
अर्थात, या आणीबाणीच्या काळात कार्बन उत्सर्जन थांबल्याने दिसणारा हा सकारात्मक परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. हा परिणाम दीर्घकाळ टिकणारा नाही. दीर्घकालीन परिणाम साध्य करायचे झाल्यास आपल्याला संरचनात्मक बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे.
पूर्व अँग्लिया विद्यापीठाच्या हवामान शास्त्रज्ञ कोरीन ले क्वारे यांच्या मते, “उत्सर्जनातील ही घसरण काही संरचनात्मक बदल स्वीकारल्याने झालेला नाही. म्हणूनच सोशिअल डिस्टन्सिंगचा काळ संपताच उत्सर्जनाचे हे प्रमाण पूर्व पदावर येणारच आहे. त्यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण देखील पुन्हा आहे त्या स्थितीत पोहचेल.”
जॅक्सन यांच्या मते, “२००७-०८ च्या आर्थिक संकटांनंतर ग्रीनहाउस मधून होणारे उत्सर्जन काही प्रमाणात कमी झाले. पण, त्यातून पुन्हा सावरल्यानंतर मात्र हेच प्रमाण पुन्हा ५.१% नी वाढले.”
चीनमध्ये देखील सुरुवातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण जास्त होते तेंव्हा त्यांनी लोकांना एकाच ठिकाणी बंदिस्त राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारखाने बंद ठेवण्यात आले. यामुळे चीनमधील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण २५%नी कमी झाले होते. पण जसेजसे कोरोनाच्या प्रसारावर त्यांनी नियंत्रण मिळवले आणि त्यांचे जनजीवन पूर्व पदावर आले, कारखान्यांचे कामकाज पुन्हा सुरु झाले तसे उत्सर्जनाचे प्रमाण देखील पूर्वपदावर आले.
म्हणजेच कोरोनाच्या काळात झालेला हा बदल सकारात्मक असला तरी, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.
संयुक्त राष्ट्राने नोव्हेंबर मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, जगातिक स्तरावरील तापमान वाढीचे प्रमाण १.५ सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवायचे असेल तर त्यासाठी दरवर्षी होणारे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे ७.६%नी कमी करावे लागेल.
अर्थात, मानवनिर्मित ग्रीनहाउसमुळेच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे हेच यातून सिद्ध होते. यात दुसरी सकारात्मक अशी बाबा कोणतीच नाही.
आजही आपली ८०% उर्जेची गरज ही जीवाश्म इंधनातून भागवली हाते. कार्बन उत्सर्जनाचा अंदाज हा नेहमीच जागतिक आर्थिकविकास दारावरून ठरवला जातो. गेल्या महिन्यात, ओस्लो येथील आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन केंद्राचे संशोधन संचालक ग्लेन पीटर्स यांनी अंदाज व्यक्त केला आहे की यावर्षी कार्बन उत्सर्जन 0.3 टक्के ते 1.2 टक्क्यांच्या दरम्यान घसरेल. यासाठी त्यांनी जागतिक जीडीपी वाढीचा अंदाजित उच्चस्तर आणि निम्नस्तर यांचा वापर केला. जागतिक आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या आकडेवारीचीही यासाठी आधार घेण्यात आला. जागतिक आर्थिकविकास दर आणि कार्बन उत्सर्जन यांचा अनोन्य संबंध आहे. या
नंतर काही दिवसांनी, कॅलिफोर्नियामधील संशोधन केंद्राच्या अंदाजानुसार यावर्षी ०.५-२.२% नी कार्बन उत्सर्जन कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
कारण जागतिक अर्थव्यवस्था दुसऱ्या सहामाहीत सुधारेल असा त्यांचा अंदाज होता. यासाठी त्यांनी जेपी मॉर्गनच्या अंदाजे वाढ निश्चित करण्याचा पद्धतीचा अवलंब केला. हवामान आणि उर्जा विश्लेषक असलेले सिव्हर वँग यांच्या मते, “या महामारीमुळे हवामान बदलात सकारात्मक परिणाम दिसत असला तरी, हा परिणाम अगदीच नगण्य आहे.”
लंडन मधील इकॉनॉमिक्स आणि बिझनेस संशोधन केंद्राच्या अंदाजानुसार, या आरोग्य आणीबाणीच्या स्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर ४%नी घसरेल अशीही भीती काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. आर्थिक पडझड रोखण्यासाठी सरकार आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पॅकेजेस घोषित करतात का याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
चीन, युरोपियन युनियन, जपान आणि इतर देशातील गुंतवणूकदार, सरकार कितपत कमी उत्सर्जन करणाऱ्या उर्जा स्त्रोतांना प्राधान्य देतात हे पहात आहेत.
अर्थात साध्यचा काळात कार्बन उत्सर्जनात घट झाली असली तरी, जेंव्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल तेंव्हा हेच उत्सर्जन पुन्हा वाढल्यास हवामान बदलावर याचा काहीही चांगला परिणाम होणार नाही. जगभरातील देश एका मोठ्या आरोग्य संकटातून बाहेर पडणार आहेत. अशावेळी आर्थिक प्रोत्साहन पॅकेज देताना ज्या-त्या देशातील सरकारांनी हवामान आणि पर्यावरणाचाही विचार करावा, असे आवाहन जागतिक संसाधन संस्थेचे संचालक डॅन लॅशॉफ यांनी केले आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.