आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काही काही संकल्पना आपण अगदी लहानपणापासून मनाशी घट्ट बांधून घेतलेल्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे गोरे ते सुंदर. किंबहुना सौंदर्याचा गोरेपणा हा सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे. अगदी लहान मुले देखील गोरीपान असतील तर त्यांना जवळ करणारे अनेकजण असतात. पण गोऱ्यांचा उदोउदो करणाऱ्या या दुनियेत काळ्यांचे काय होत असेल, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
गेल्या काही वर्षांत अमेरिकेमध्ये #BlackLivesMatter ही टॅगलाईन चांगलीच लोकप्रिय झाली आहे. मुख्यतः सोशल मीडियावर ही टॅगलाईन जास्त प्रचलित आहे. आफ्रिकन अमेरिकन लोकांना आजही अमेरिकेत वंशभेदाचा, वर्णभेदाचा सामना करावा लागतो. त्यावर ही ओळ भाष्य करते. पण हे प्रकरण नवीन नाही. अनेक वर्षे गोरे आणि काळे यांच्यातील संघर्ष अमेरिकेमध्ये एक मोठा मुद्दा ठरला आहे.
अगदी सतराव्या शतकाच्या आधीपासून कृष्णवर्णीयांना अन्यायाचा, भेदभावाचा सामना करावा लागत आहे. शिक्षण, नोकऱ्या, मूलभूत सोयीसुविधा यामध्ये त्यांचे हक्क डावलले जात आहेत. आणि हे चित्र आज दिसत असले तरी त्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत.
आफ्रिकन लोकांना युरोपात गुलाम म्हणून आणले गेले. अमेरिकेतील सिव्हिल वॉर नंतर गुलामगिरीची प्रथा बंद झाली तरी प्रत्यक्षात मात्र काळे आणि गोरे यांच्यातील दरी अजूनही बुजलेली नाही.
गोरे म्हणजे चांगले आणि काळे म्हणजे वाईट इतका सरळसरळ अपप्रचार आहे हा. अगदी शाळेतील मुलांना बालवयापासून याच प्रकारचे बाळकडू मिळते. त्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी एक रंजक प्रयोग 1940 मध्ये केला गेला. या प्रयोगातून हाती आलेला निष्कर्ष म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत आफ्रिकन काळ्या मुलांना अमेरिकेत काळे असणे म्हणजे खालच्या दर्जाचे असणे इतपत समज आलेली असते.
#BlackLivesMatter या टॅगलाइनचा जन्म 2013 मधील. त्याला पार्श्वभूमी देखील एका दुःखद घटनेची होती. 26 फेब्रुवारी 2012 या दिवशी ट्रेव्हिऑन मार्टिन नावाच्या कृष्णवर्णीय मुलाचा गोळीबारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना फ्लोरिडा येथील सॅनफोर्ड येथे घडली. ही केवळ नांदी होती.
त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आणि त्यामध्ये काळ्यांना आपला जीव गमवावा लागला. अगदी नुकतीच 2020मध्ये एका गोर्या पोलिसाने 46 वर्षाच्या एका कृष्णवर्णीयाला संशयावरून ठार मारल्याची घटना घडली. या सगळ्यातून अमेरिकेत काळ्यांचे काय स्थान आहे हेच सातत्याने अधोरेखित होत राहिले.
अमेरिकेमध्ये गोरे आणि काळे यांच्यात उघडउघड भेद करणारे काही नियमच होते. त्यांना जिम क्रो लॉज असे म्हणत. या जिम क्रो नियमांविरोधात काळ्यांनी अनेकदा उठाव करण्याचा प्रयत्न केला. त्या नियमांनुसार पब्लिक पार्क्स, थिएटर्स, बस स्टॉप, शाळा व महाविद्यालये अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी कृष्णवर्णीयांसाठी वेगळ्या जागा राखून ठेवलेल्या असत. त्यांना सर्वसामान्य गोऱ्या माणसाप्रमाणे हवे तेथे बसता, वावरता येत नसे.
थोडक्यात कृष्णवर्णीय लोक अमेरिकेत कसे नकोसे झाले आहेत हे दाखवणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात होत्या. पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम व्हायचा तो आफ्रिकन अमेरिकन मुलांवर. अगदी कोवळ्या वयापासून त्यांना या भेदभावाचा सामना करावा लागे. त्यातूनच गोरे म्हणजे चांगले आणि काळे म्हणजे वाईट अशी समजूत वाढीला लागे.
1940 मध्ये केनेथ आणि मामी क्लार्क या दाम्पत्याने मुलांवर वर्णभेदाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी एक प्रयोग केला. मुळात या प्रयोगाची कल्पना मामी क्लार्क हिला तिच्याच थिसिसमधून मिळाली होती. स्वतः ती या गोष्टींचा बळी ठरली होती. सेग्रीगेटेड स्कूल म्हणजे काळ्यांसाठी असलेल्या शाळांमधून शिकताना, इतरत्रही सतत काळे म्हणून हिणवले जात असताना मनाला काय यातना होतात हे तिने स्वतः अनुभवले होते. त्यातूनच तिला हा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली होती.
हा प्रयोग सुरुवातीला डॉल टेस्ट या नावाने प्रचलित झाला. वॉशिंग्टन डीसी येथील काळ्यांच्या शाळांमधून शिकणारी मुले आणि न्यूयॉर्कमधल्या इंटिग्रेटेड शाळांमधून शिकणारी मुले यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला. या मुलांना दोन बाहुल्या दाखवण्यात आल्या. या दोन्ही बाहुल्या दिसायला अगदी सारख्या होत्या. त्यांच्यात फक्त रंगाचा फरक होता. एक बाहुली काळ्या रंगाची आणि तपकिरी केसांची होती, तर दुसरी गोऱ्या रंगाची आणि सोनेरी केसांची होती.
नंतर मुलांना प्रश्न विचारण्यात आले. कुठली बाहुली छान आहे? कुठली बाहुली दिसायला कुरूप आहे? तुला कुठल्या बाहुलीबरोबर खेळायला आवडेल? कुठली बाहुली तुझ्यासारखी दिसते? यासारखे ते प्रश्न होते. कुठली बाहुली चांगली आहे, आणि तुला कुठल्या बाहुली बरोबर खेळायला आवडेल या प्रश्नाला सर्व मुलांनी गोऱ्या, सोनेरी केसांच्या बाहुलीकडे बोट दाखवले. तर तुझ्यासारखी दिसणारी बाहुली कोणती यावर सगळ्यांनी काळी बाहुली दाखवली.
गोऱ्या रंगाची बाहुली निवडण्यामागे या मुलांनी दिलेली उत्तरेदेखील मासलेवाईक होती. ती गोरी आहे, ती सुंदर आहे, तिला दोन डोळे आहेत, तिचे हात, पाय, केस, कान, हाताचे कोपर, गुडघे छान गोरे आणि स्वच्छ आहेत. काळी बाहुली नाकारण्यामागेदेखील अशीच कारणे होती. ती काळी आहे, ती कुरूप आहे, ती दिसायला वाईट आहे, तिला पापण्या नाहीत अशी कारणे देण्यात आली.
पण या प्रयोगादरम्यान नोंदवले गेलेले सगळ्यात महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे यापैकी कोणती बाहुली तुमच्यासारखी दिसते? या प्रश्नाचे उत्तर देताना दोन मुले अक्षरशः रडत बाहेर निघून गेली. ही गोष्ट पुरेशी बोलकी होती.
यानंतर एकदा या प्रयोगाचे सुप्रीम कोर्टातही सादरीकरण झाले. त्याचा परिणाम म्हणून पब्लिक स्कूलमध्ये असलेले सेग्रीगेशन संपुष्टात आले.
या टेस्टवर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले. पण इतक्या वर्षानंतरही ही टेस्ट श्वेतवर्णीयांच्या बाजूने असल्याचे आढळून येते. आजदेखील सकारात्मक गुण आणि गोरा रंग यांचा नैसर्गिकपणे संबंध जोडला जातो आणि तितक्याच सहजपणे काळा रंग आणि दुर्गुण एकमेकांशी जोडले जातात.
दुर्दैव हे आहे, की आपणही याच दुनियेचा एक भाग आहोत.
आईन्स्टाईनने पूर्वी उद्धृत केलेले वचन या वेळी हमखास आठवते, ज्या काळात पूर्वग्रहाचे तुकडे करण्यापेक्षा अणूचे तुकडे करणेही सोपे आहे अशा काळात जगणे खरोखर खूप मनस्ताप देणारे आहे. तुम्हाला काय वाटते?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.