नाही, नाही. शीर्षक वाचून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाहीये. कारण अद्यापतरी जागतिक आरोग्य संघटनेने असे कुठलेही निष्कर्ष काढलेले नाहीत.
पण जपानमधल्या ओसाका शहरातल्या एका चाळीस वर्षीय महिलेची फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात केलेली कोरोनाची चाचणी पुन्हा एकदा पॉझीटिव्ह आल्यानंतर मात्र ही शंका अनेक जणांच्या मनात व्यक्त केली जात आहे. तरीदेखील कोणीही त्याचे उत्तर देऊ शकलेले नाही.
कोरोना व्हायरसची लागण पुन्हा होऊ शकते की नाही यापेक्षासुद्धा आपण एखाद्या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती कशी काम करते हे सगळ्यात आधी समजून घेऊयात.
आपण आजारी पडतो म्हणजे नेमक काय होतं?
तर जेव्हा आपल्या शरीरात विषाणू किंवा जीवाणू ह्यासारखे परकीय घटक प्रवेश करतात त्यावेळी आपल्याला एखाद्या रोगाची लागण झाली असे समजले जाते. त्यावेळी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती प्रणाली त्या घटकाला एका परकीय घटकाप्रमाणे (फोरेन पार्टिकल) ओळखते.
शरीरात काही अशा रक्तपेशी असतात ज्यांचे कार्य शरीरावर नजर ठेवणे आणि नवीन संसर्ग आढळल्यावर ताबडतोब संदेश पाठवणे हे असते. संदेश पाठवल्यानंतर संसर्गावर मात करण्यासाठी काही विशिष्ट अँटीबॉडीजची निर्मिती केली जाते.
ह्या प्रक्रियेला बराच काळ जातो. याच काळात जीवाणू किंवा विषाणू गुणाकाराच्या संख्येत वाढतात. त्यामुळे आपण आजारी पडतो. अँटीबॉडीजची निर्मिती व्हायला काही दिवस अथवा आठवडे लागतात त्याच काळात आपल्या शरीरात संसर्गाची लक्षणे दिसायला सुरुवात होते.
ज्यावेळी शरीरात पुरेश्या अँटीबॉडीजची निर्मिती केली जाते त्यावेळी संसर्ग दूर होऊन आपल्याला बरे वाटायला लागते. त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती प्रणाली एक चांगले काम करते ते म्हणजे स्मृती पेशींची निर्मिती करणे.
या स्मृती पेशी पुन्हा भविष्यात असा संसर्ग शरीरात आल्यास तयारच असतात. जर शरीरात पुन्हा तोच विषाणू अथवा जिवाणू आढळला तर स्मृती पेशी लगेच कार्यरत होतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा संसर्ग झाल्याचे कळत देखील नाही. ह्या स्मृती पेशी पुन्हा विषाणू किंवा जीवाणू शरीरात आल्यास ताबडतोब आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती प्रणालीला संदेश पाठवत असतात.
या काळात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली एवढ्या वेगाने कार्य करते की आपल्याला आजारी असल्याचे जाणवत नाही. आपण संसर्गग्रस्त आहोत हे कळत सुद्धा नाही. आणि आपण आधी सारखे आजारी पडत नाही.
ही रोगप्रतिकारशक्ती बहुदा शरीरात आयुष्यभरासाठी असते. पण असतेच असेही नाही. एकूणच रोगप्रतिकारशक्ती आणि स्मृती पेशी असे काम करतात की, आयुष्यात पहिल्यांदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा आजारी पडण्याची शक्यता अत्यंत कमी असते. कारण स्मृती पेशी लगेचच बनून कायमस्वरूपी लढा देण्यास तयार असतात.
विषाणू नुसार प्रतिकारशक्ती प्रणाली देखील बदलते. म्हणजे उदाहरणार्थ सार्स हा आजार असेल तर ह्यात दोन ते तीन वर्षाचा प्रतिकारशक्तीचा काळ असतो.

मग पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का ह्याच उत्तर द्यायचं झाल तर स्मृती पेशी कोरोना विषाणूची लागण पुन्हा पटवून द्यायला अयशस्वी झाले तर अशी शक्यता निर्माण होऊ शकते.
पण ह्याविषयीची ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. बहुतेक तज्ञांचा असा विश्वास आहे कि त्यांना कोरोनावर लस
सापडू शकेल. आणि कालांतराने एक नैसर्गिक प्रतिकारशक्तीच तयार होईल. शास्त्रज्ञ हे मान्य करतात की ह्याबद्दल अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. covid १९ ची प्रतिकारशक्ती आयुष्यभर असेल कि नाही ह्याबद्दल सांगणे अवघड आहे. तथापि, काही तज्ञ आशावादी आहेत
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रोपिकल मेडिसिनमधील उदयोन्मुख आणि संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक मार्टिन हिबर्ड म्हणतात,
आम्हाला याची खात्री करण्यासाठी अधिक पुरावे हवेत असले तरी, ज्यांना बरे झाले आहे त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाही.
चीन मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरसची लागण झालेल्या आणि अँटीबॉडीज विकसित केलेल्या माकडांना पुन्हा कोरोना लागण झाल्याचे अद्याप दिसून आलेले नाही.
द गार्डियन च्या एका माहितीनुसार , सर पॅट्रिक व्हॅलेन्स आणि बोरिस जॉनसनचे मुख्य वैद्यकीय सल्लागार प्रो क्रिस व्हिट्टी यांनी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की ज्यांना एकदा विषाणूची लागण झाली आहे त्यांच्यात थोडीशी रोगप्रतिकार शक्ती निर्माण नक्कीच निर्माण होईल त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही.
या सर्वांमध्ये जर स्वतःला संसर्गापासून दूर ठेवायचे असेल तर आपले हात वारंवार धुवा ,परिसर निर्जंतुकीकरण करा आणि घाबरून न जाता आवश्यकतेनुसार सामाजिक अंतराचे आणि सरकारी सूचनांचे पालन करा.