आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
देशभरात कोरोना व्हायरस विरोधातील लढाईसाठी प्रशासकिय पातळीवर वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. त्यात असाच एक प्रयोग म्हणजे भिलवाडा मॉडेल जो आज देशभरात कोरोना व्हायरस विरोधातील लढाईसाठी एक मोठा आदर्श बनला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील ह्या मॉडेलचे कौतुक करत देशभरात ह्या मॉडेलचा अंगिकार करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पुण्याच्या बारामती शहरात एका भाजीवाल्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाने शहरात ह्या मॉडेलचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भिलवाडा मॉडेल मुळे आज राजस्थानच्या भिलवाडा शहरात कोरोना बाधितांचा आकडा जो सर्वाधिक होता तो आता आटोक्यात आला आहे. २७ कोरोना बाधित आज भिलवाड्यात असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात भिलवाडा प्रशासनाला यश आलं आहे.
भिलवाड्याचे कलेक्टर आणि त्यांच्या सहाय्यकांच्या प्रयत्नांनी हे मॉडेल अस्तित्वात आलं आणि यशस्वी झालं आहे.
जेव्हा राजस्थानच्या भिलवाडामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले तेव्हा सर्वप्रथम कर्फ्यु लावण्यात आला आणि सीमा बंद करण्यात आल्या. भिलवाडा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल, हॉटेल आणि हॉल्सचा ताबा भिलवाडा जिल्हा प्रशासनाने घेतला. लॉकडाउनचे सक्तीने पालन व्हावे यासाठी घरोघरी जाऊन स्क्रिनिंग टेस्ट घेण्यात आल्या.
लोकप्रतिनिधी, मीडिया आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना देखील प्रवेश नाकारण्यात आला. शहरात जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या निवडक अधिकाऱ्यांना फिरण्यास परवानगी प्रदान करण्यात आली.
भिलवाडामध्ये लोकांकडून सोशल डिस्टनसिंगचे कठोर पालन करवून घेण्यात आले. यामुळे भिलवाडामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला नाही आणि त्याचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश आलं. भिलवाडामधील अनेक कोरोना बाधित आता पूर्णपणे बरे झाले असून त्यांना अजूनही १४ दिवस क्वारांटाईन करण्यात आलं आहे.
गेल्या १७ दिवसांपासून भिलवाडामध्ये कर्फ्यु लागू करण्यात आला असून व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.
भिलवाडामध्ये आता पर्यंत १० दिवसांत शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरांवर तब्बल १८ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. इतकंच नाही ज्या लोकांना सर्दी, ताप, खोकला आहे अशा सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. भिलवाडा येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पंचतारांकित आणि त्रितारांकित हॉटेल, रिसॉर्ट, मंगल कार्यालये ताब्यात घेऊन याठिकाणी क्वारंटाईन सुविधा सुरू केली आहे. इतकंच नाही ज्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसले त्यांना याठिकाणी हलवण्यात आले आहे.
आज भिलवाडामध्ये २७ कोरोनाग्रस्त असून यापैकी २० लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ७ लोक अजूनही ट्रीटमेंट घेत आहेत.
राजस्थानचे हे भिलवाडा मॉडेल आज देशातील कोरोना व्यवस्थापनासाठी प्रशासकीय यंत्रणासाठी दीपस्तंभ बनले आहे. भिलवाडामध्ये ज्यावेळी सर्वप्रथम मोठ्या संख्येने कोरोना व्हायरस ग्रस्त रुग्ण समोर आले होते त्यावेळी भिलवाडा हे शहर भारतातील दुसरं इटली होतं की काय असा धोका निर्माण झाला होता. परंतु राजस्थान सरकार आणि भिलवाडा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यात मोठे यश आले आहे.
भिलवाडामध्ये एका कोरोना ग्रस्त डॉक्टरमुळे २७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. यावरून सर्वत्र खळबळ उडाली होती.
केंद्र सरकारने तातडीने राजस्थान सरकारकडे ह्या प्रकरणा विषयक अधिक माहिती घेतली आणि ताबडतोब उपाय योजना करण्यासंबंधित निर्देश राजस्थान सरकारला दिले, राजस्थान सरकारने भिलवाडा प्रशासनावर याची जबाबदारी सोपवली. भिलवाडाचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट आणि उपजिल्हाधिकारी राकेश कुमार पुरी ह्यांनी अहोरात्र जागून सलग पाच दिवस प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करत हे भिलवाडा मॉडेल यशस्वी करून दाखवलं आहे.
आरोग्य विभाग, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस विभाग यांचा योग्य समन्वय साधून कोरोनाचा भिलवाड्यात फैलाव रोखणे प्रशासनाने यशस्वी करून दाखवले आहे.
देशात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयश येत असताना भिलवाडा मॉडेलच्या यशाने प्रभावित झालेल्या केंद्रिय कॅबिनेट सचिव असलेल्या राजीव गाबा यांनी भिलवाडा मॉडेल संदर्भातील अधिक माहिती राजस्थान सरकारचे मुख्य सचिव डी बी गुप्ता यांच्याकडून मागवली. केंद्र सरकारने भिलवाडा मॉडेल आणि भिलवाडा प्रशासनाचे कौतूक केले असून त्यांनी भिलवाडा प्रशासनाकडे कोरोनाग्रस्त रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करण्यात आले आणि संक्रमण कसे रोखण्यात आले याची संपूर्ण माहिती मागवून घेतली आहे.
केंद्र सरकार देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिलवाडा मॉडेल लागू करण्याच्या विचारात असून ज्या भागात मोठया प्रमाणावर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय अशा भागात हे मॉडेल लागू करण्याचे आदेश केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी राज्यातील मुख्य सचिवांना दिल्याचे सांगितले जात आहे.
आज देशभरात कोरोना व्हायरसचा मोठा फैलाव झाला असून तब्बक ६ हजाराहून अधिक रुग्ण देशात आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून भिलवाडा मॉडेल सारख्या यशस्वी उपाय योजना देशभरात राबवल्या तर कोरोना रोखण्यात यश मिळणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.