आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
असली मसाले सच सच, एमडीएच! एमडीएच! ही जाहिरात तुम्ही टीव्हीवर अनेकदा बघितली असेल. भारतीय मसाल्यांना असलेला विशिष्ट स्वाद आणि चवीमुळे जगभरातील खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. हे भारतीय मसाले जगभर पोहोचवण्यात एमडीएच मसाल्यांचा मोठा वाटा आहे. स्वित्झर्लंड, जपान, अमेरिका आणि कॅनडासारख्या अनेक देशांत आज हे मसाले पोचले आहेत.
मसाला निर्मिती करणारा ही एक मोठी कंपनी असून कमान ५० प्रकारचे वेगवेगळे मसाले हे तयार करतात. देशाच्या मसाला उद्योगातील हा एक मोठा ब्रँड आहे.
एमडीएच मसाल्यांची जाहिरात म्हणता क्षणीच आपल्या डोळ्यासमोर पंढरीशुभ्र मिशी असणारे, गौरवर्णी, सुरकुतलेल्या चेहऱ्यावरही प्रसन्न स्मित आणून हसणारे आणि वातावरणात या प्रसन्न हास्याने उत्साहाचा रंग ओतणाऱ्या मिशीवाल्या आजोबांची छबी निश्चितच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.
मसाल्यांचे बादशहा असणाऱ्या या आजोबांना आपण कधीच विसरू शकणार नाही! या तरुण आजोबांचे नाव आहे धरमपाल गुलाटी. एमडीएच मसाल्याचे संस्थापक.
३ डिसेंबर २०२० रोजी त्यांना वयाच्या ९७व्या वर्षी देवाज्ञा झाली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे आजोबा नियमितपणे कंपनीचे व्यवहार पाहत होते. व्यवसायासंदर्भातील सगळे महत्त्वाचे निर्णय ते स्वतःच घायायचे.
एमडीएच मसाल्यांचा वार्षिक टर्नओव्हर जवळपास १५०० करोड रुपयांचा आहे. १५०० रुपयांच्या कर्जाऊ रकमेच्या जोरावर व्यवसाय सुरु करून त्याची उलाढाल १५०० कोटींच्या घरात पोहोचवणे म्हणजे काही खायची गोष्ट निश्चितच नाही. एमडीएचचे यश सातासमुद्रापार पोहोचलेली ख्याती आणि त्यांची एवढी मोठी आर्थिक उलाढाल पाहून निश्चितच अवाक् व्हायला होते.
पण या प्रचंड मोठ्या यशामागे तितकाच मोठा कष्टाचा आणि चिकाटीचा डोंगरही आहेच. प्रत्येक यशस्वी कथेमागे संघर्षाचा इतिहास असतोच. तसाच एमडीएचच्या यशामागेही तो आहेच.
एमडीएचची स्थापना १९५९ साली झाली असली तरी, त्याची बीजे त्याच्याही आधी रोवली गेली होती. धरमपाल यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील सियालकोट येथे झाला. धरमपाल यांचे वडील चुनीलाल, महाशियान दि हात नावाचे एक छोटेखानी मसाल्याचे दुकान चालवत. वडीलांना दुकानात मदत करता यावी म्हणून धरमपाल यांनी पाचवीतूनच शाळा सोडून दिली. छोट्या वयातच त्यांच्यावर कष्ट करण्याची तयारी, जबाबदारी पेलण्याची धिटाई आणि चतुराईने व्यवहार करण्याचे संस्कार झाले होते. लहान वयातच त्यांनी या व्यवसायातले सगळे धडे बारकाईने गिरवले होते.
देशाच्या फाळणीनंतर हे कुटुंब विस्थापित होऊन पाकिस्तानातून भारतात आले. भारतात आल्यानंतर काही काळ अमृतसरमधील निर्वासितांच्या छावणीत त्यांना दिवस काढावे लागले. आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात आलेल्या या अनुभवांनी त्यांना बरेच काही शिकवले.
छावणीत राहत असतानाच ते कामाच्या शोधात इतरत्र भटकत होते. असेच कामाच्या शोधात असताना ते दिल्लीतील आपल्या पुतणीकडे आले. इथे त्यांना काही व्यवसाय करता येईल अशी आशा वाटली. दिल्लीमध्येच त्यांनी घोडागाडी चालवण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या वडिलांनी त्यांना काही रक्कम दिली होती. त्यातील ६५० रुपये त्यांनी घोडागाडीमध्ये गुंतवले आणि त्यातून ते प्रवाशांची वाहतूक करू लागले. कनौत महाल ते करोल बाग या रस्त्यावर त्यांची घोडागाडी धावू लागली.
त्यांच्या या व्यवसायातून मिळणारी रक्कम ही तुटपुंजी होती. घराच्या वाढत्या कबिल्याचा भार सांभाळायचा तर अजून काही तरी मिळकतीचा मार्ग शोधायला हवा या विचारातून त्यांनी घोडागाडी विकली आणि अजमल खान रोडवर एक छोटेसे दुकान विकत घेतले. याच दुकानातून त्यांनी आपल्या घराण्याचा जुना व्यवसाय पुन्हा सुरु करण्याचे ठरवले आणि त्यांनी मसाल्याचा व्यापार सुरु केला. धरमपाल म्हणायचे, करोल बाग ही माझ्यासाठी लाभदायक ठरलेली जागा आहे.
करोल बाग परिसराला भेट देताना ते कायम अनावणी पायानेच जायचे. याच ठिकाणी त्यांच्या व्यवसायाची वृद्धी झाली असा त्यांचा समज आहे.
व्यवसाय वाढत गेल्यावर धरमपाल यांनी १९५३ साली चांदणी चौकात आणखी एक दुकान भाडेतत्वावर घेतले. व्यवसायाची घडी नीट बसल्यावर त्यांनी मसाला बनवण्यासाठी स्वतःचीच फॅक्टरी सुरु करण्याचे ठरवले. १९५९ मध्ये त्यांनी दिल्लीतील कीर्तिनगर परिसरात जागा विकत घेतली आणि तिथेच स्वतःची फॅक्टरी सुरु केली. एमडीएच म्हणजेच महाशियान दि हाती लिमिटेडची सुरुवात झाली ती अशी!
व्यवसायात यश मिळवायचे असेल तर, प्रामाणिकपणे कष्ट करणे, कामात आणि उत्पादनाचा दर्जा राखणे आणि किफायतशीर किमतीत आपले उत्पादन उपलब्ध करून देणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावाच लागतो असे धरमपाल सांगतात. ही पथ्ये पाळण्यानेच आज त्यांचा व्यवसाय या उंचीवर पोहोचला असल्याचे ते मानायचे. उतारवयातही धरमपाल दररोज स्वतः या फॅक्टरीला भेट देत. बाजारपेठेचा हालहवाला कसा आहे, याचा अंदाज घेत.
इतक्या वर्षांच्या त्यांच्या दिनचर्येत त्यांनी या कामाला नेहमीच प्राधान्य दिले. म्हणूनच व्यवसायाचे छोटेमोठे निर्णय त्यांच्या संमतीनेच घेतले जायचे.
दरमहा १५०० रुपये कमावणारा एक टांगेवाला आज १५०० कोटींची उलाढाल करतो, हे पाहून डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत. पण, यामागे कष्ट, चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिकपणा या चतुःसूत्रीचा मोठा वाटा आहे.
स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि फाळणीचे चटके सोसलेल्या या व्यक्तीला खऱ्या अर्थाने सामाजिक प्रश्न आणि सामुहिक समस्यांचीही जाणीव होती. म्हणून इतके मोठे यश मिळाल्या नंतरही त्यांनी समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायीत्व सोडलेले नव्हते.
धरमपालजी महाशय चुनी लाल चॅरिटेबल ट्रस्ट चालू केले. या ट्रस्टच्या वतीने त्यांनी २५० बेडनी युक्त सुसज्ज हॉस्पिटल उभारले आहे.
झोपडपट्टीतील लोकांपर्यंत आरोग्यसुविधा पोहोचाव्यात म्हणून त्यांनी एक फिरते हॉस्पिटल सुरु केले. हे हॉस्पिटल झोपडपट्टीपर्यंत जाऊन लोकांना आरोग्यसेवा पुरवते. या ट्रस्टच्या वतीने चार शाळा देखील चालवल्या जातात. समाजातील गरजू लोकांपर्यंत या सुविधा पोहोचाव्यात यासाठी त्यांची धडपड सुरु असते.
या ट्रस्टच्या माध्यमातून काही गरजू आणि होतकरू लोकांना अर्थसहाय्य देखील दिले जाते. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावरच त्यांनी इतक्या मोठ्या साम्राज्याची धुरा सांभाळली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.