आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अमेरिकेतल्या यादवी यु*द्धाचे ढग दाटलेले दिवस. व्हर्जिनिया अमेरिकन राज्यसंघातून वर्षभरापूर्वी बाहेर पडलेला. तिथल्याच मार्टीन्सबर्गमधलं एक सुखवस्तू घर. तो दिवस व्हर्जिनियाच्या ‘स्वातंत्र्या’च्या वर्धापन दिनाचा होता.
घरासमोरून जाणाऱ्या अमेरिकन पोलिसांनी जाता जाता घरात संशयानं डोकावून बघितलं. घरातली एक खोली बंडखोरांच्या झेंड्यांनी सजवलेली दिसली. पोलिसांपैकी एकानं दरडावणीच्या सुरात घरातल्या लोकांना हाका मारायला सुरुवात केली. एक प्रौढ बाई घराबाहेर आली. पोलिसांची समजूत घालू लागली. मात्र, हाका मारणारा पोलीस काहीही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हता. मद्यधुंद असावा.
तो त्या महिलेला अद्वातद्वा बोलायला लागला. घरातले बंडखोरांचे झेंडे काढून फेक, असं तो ओरडून सांगत राहिला. तो स्वतःच जबरदस्तीने त्या घरावर अमेरीकेचा झेंडा लावायला लागला. इतरही नको तसं बडबडत राहिला. एवढ्यात घरातून एक तरुणी पायऱ्यांजवळ आली. तिच्या हातात पिस्तूल होतं. तिनं पिस्तूल त्या पोलिसाच्या छातीवर रोखलं आणि सरळ गोळ्या झाडल्या.
ही तरुणी होती मारिया इसाबेला ‘बेल’ बॉयड. अमेरिकन यादवी यु*द्धातली बंडखोरांची गाजलेली गुप्तहेर! जीवावर उदार होऊन तिने केलेल्या अचाट कामगिऱ्यांनी अमेरिकन सुरक्षा दलांच्या नाकी नऊ आणले होते.
अमेरिकन पोलिसाच्या वागण्यानं तिच्या मनातला अमेरिकन महासंघाबद्दलचा राग आणि त्याला गोळ्या घातल्यानंतर आपण आपल्या देशासाठी काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास दुणावला असणार. इथेच तिच्या गुप्तहेर म्हणून कारकिर्दीची बीजं पेरली गेली हे नक्की!
बेलाचे वडील समाजातले प्रतिष्ठीत व्यापारी होते. आईदेखील प्रतिष्ठीत घराण्यातून आलेली. बॉयड कुटुंब सुखवस्तू होतं. मात्र, यादवीच्या काळात देशासाठी काही तरी करण्याच्या उद्देशानं तिच्या वडिलांनी व्हर्जिनियन सैन्याच्या ‘स्टोनवॉल ब्रिगेड’ या लढाऊ पलटणीत नोकरी केली. बेलही तिथे नर्स म्हणून काम करायची. पुढे पोलिसाला मारल्याच्या आरोपातून बेलेची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आपण स्वसंरक्षणार्थ हे पाऊल उचलल्याचा तिचा युक्तिवाद करण्यात आला.
आपल्या वडिलांना भेटायला म्हणून बेल एके दिवशी ‘स्टोनवॉल ब्रिगेड’च्या तळावर गेली आणि मलाही तुमच्याबरोबर काम करायचं आहे, असं तिने बंडखोर सैन्याच्या अधिकाऱ्यांना भेटून सांगितलं. तिच्याकडे आवश्यक वस्तू, निरोप आणि कागदपत्र देण्याचं काम सोपवण्यात आलं.
एकदा गस्तीवर असलेल्या दोघा अमेरिकन पोलिसांना तिचा संशय आला म्हणून त्यांनी तिला हटकलं. मात्र, तिनं आपल्या मधाळ बोलण्यानं आणि अवखळ वागण्यानं त्यांनाच भुरळ घातली. ते ही तिच्या मागे मागे लाळ घोटत बंडखोर सैन्याच्या तळापर्यंत आले. तिथं त्यांना त्वरित गजाआड करण्यात आलं. बेल खूप सुंदर नव्हती पण खूप मादक होती. तिचं मादक दिसणं आणि अवखळ वागणं हे तिच्या हेरगिरीच्या कामासाठी ‘भांडवल’ ठरलं आणि त्याचा तिनं पुरेपूर वापरही केला.
सन १८६२ च्या सुरुवातीपर्यंत बंडखोर गुप्तहेर म्हणून तिचे उद्योग केंद्रीय सैन्य आणि प्रसारमाध्यमांना माहिती झाले होते. स्थानिक माध्यमांनी तिला ‘ला बेल रिबेल, द सायरन ऑफ द शेनँडोह, द रिबेल जोन ऑफ आर्क, आणि अमेझॉन ऑफ सेसेसिया’ अशी विशेषणं बहाल केली होती.
एकदा तिला संशयावरून अटक करून वॉशिंग्टनच्या कारागृहात ठेवण्यात आलं. तिथल्या तुरुंग अधीक्षकानेच तो तिच्या प्रेमात असल्याचं सांगितलं. कैदी आदान प्रदान उपक्रमात लवकरच तिची तिथून सुटका झाली.
बॉयड बिनधास्त अमेरिकन सैन्याच्या तळावर जायची. हवी ती माहिती गोळा करायची आणि ती बंडखोर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायची. मेजर जनरल नॅथॅनियल बँक्सच्या सैन्याला फ्रंट रॉयलकडे कूच करण्याचा आदेश देण्यात आला आहे, ही माहिती मिळताच बंडखोर मेजर जनरल थॉमस जे. स्टोनवॉल जॅक्सनला कळवण्यासाठी तिने पंधरा मैल पळत त्याच्यापर्यंत गेली. सैन्याची जमवाजमव, नियोजन, संख्या, क्षमता याची खडानखडा माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवून रात्रीच्या अंधारात ती घरी परतली.
एकदा ती अशीच माहिती घेऊन अमेरिकन तळाकडून धावत निघाली होती. सैनिकांना तिचा संशय आला. या वेळी तर अमेरिकन आणि बंडखोर सैन्यामध्ये गोळी*बार सुरु होता. इकडून तिकडे धावत निघालेल्या बेलला पाहून अमेरिकन सैनिकांनी तिच्या दिशेने गोळ्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. तिच्यासाठी स्वतःला वाचवून माहिती तिच्या गोटात पोहोचवणं ही सर्वात महत्वाची बाब होती.
ती धावतच होती. तिच्या पायाजवळ धुळीचे लोट उठत होते. आजूबाजूला रायफ*लच्या गोळ्यांचा पाऊस पडत होता. त्यापैकी काही गोळ्या तिच्या कपड्यांना चाटून जात होत्या. तरीही तम न बाळगता तिने माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचवली जनरल जॅक्सनला ती माहिती खूप कामाला आली. त्याच्या सैन्याने शहर काबीज केलं. त्याने बेलच्या योगदानाची आणि शौर्याची नोंद वैयक्तिक टिपण्णीमध्ये करून ठेवली.
बॉयडला तब्बल सहा ते सात वेळा अटक करण्यात आली होती. मात्र, प्रत्येक वेळी ती पोलीस, लष्कर किंवा तुरुंगाधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार व्हायची. मात्र, सन १८६३ नंतर तिला तशी संधी मिळाली नाही. तिला शेवटी वॉशिंग्टन, डीसीमधील ‘ओल्ड कॅपिटल’ तुरुंगात डांबण्यात आलं.
बॉयड ही काही सामान्य कैदी नव्हती. तिने तिच्या बराकीच्या खिडकीतून बंडखोरांचे झेंडे फडकावले, तिने तुरुंगातच बंडखोरांचं विजयगीत गायलं. बाहेरच्या बंडखोर समर्थकांशी संवाद साधण्याची एक अनोखी पद्धत तयार केली. बाहेरचे बंडखोर समर्थक धनुष्य- बाणाने तिच्या बराकीत रबरी चेंडू टाकत असत. बॉयड बॉल कापून आत संदेश असलेला कागद ठेऊन तो पुन्हा शिवायची आणि बाहेर टाकायची.
डिसेंबर १८६३ मध्ये तिला सोडण्यात आलं आणि दक्षिणेला हद्दपार करण्यात आलं. ती ८ मे १८६४ रोजी इंग्लंडला रवाना झाली आणि तिला पुन्हा तिथेही हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. शेवटी ती अमेरिकन नौदल अधिकारी लेफ्टनंट सॅम हार्डिंगच्या मदतीने कॅनडाला पळून गेली आणि पुन्हा तिने इंग्लंडला जाण्याचा मार्ग पत्करला. तिथे तिचा आणि हार्डिंगचा विवाह २५ ऑगस्ट १८६४ रोजी झाला.
बॉयडने दोन वर्षे इंग्लंडमध्ये राहून तिच्या हेरगिरीच्या आठवणी लिहून काढल्या. ‘बेल बॉयड इन कॅम्प अँड प्रिझन’ हे पुस्तक तिने लिहिलं. रंगभूमीवर पदार्पण करून अभिनयातही यश मिळवले. ती युरोपमधली नामांकित अभिनेत्री बनली. सन १८६६ नंतर विधवा झाल्यावर ती अमेरिकेत परतली. तिथे तिने तिची रंगभूमीवरची कारकीर्द चालू ठेवली. तिच्या यु*द्धकाळातल्या अनुभवांवर व्याख्यानं दिली. तिने तिच्या कार्यक्रमाला ‘द पेरिल्स ऑफ अ स्पाय’ असं नाव दिलं आणि स्वतःला “क्लिओपात्रा ऑफ द सेसेशन” म्हणवून घेऊ लागली.
सन १८६९ मध्ये तिने जॉन स्वेनस्टन हॅमंड या इंग्रज सैन्याधिकाऱ्याशी विवाह केला. सन १८८४ मध्ये या लग्नाला सोळा वर्षे झाल्यावर आणि चार मुलांच्या जन्मानंतर तिने हॅमंडला घटस्फोट दिला आणि केवळ दोनच महिन्यांनंतर तिने नॅथॅनियल हाय (ज्युनियर) या अभिनेत्याशी लग्न केलं. तो तिच्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान होता. किलबॉर्न (सध्या विस्कॉन्सिन डेल्स), येथे दौऱ्यावर असताना ११ जून १९०० रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.
ज्या काळात जगभरातल्या स्त्रियांनी स्वतःभोवती किंवा समाजाने त्यांच्या भोवती सोज्वळ वर्तणुकीची, चाली-रूढींची बंधन घालून त्यांना कुंपणात ठेवलं होतं; त्या काळात ही बंधनं आणि कुंपणं धाडसाने झुगारून देऊन हेरागिरीसारखं जोखमीचं काम बेल बॉयडने पत्करलं. कधी स्त्रियांची सोज्वळ, सोशिक, निष्पाप प्रतिमा वापरून घेत आणि कधी मादक वागण्या-बोलण्याने सैनिक, अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवत तिने त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेतली.
कधी बंदुकीच्या गोळ्या झेलण्याची तयारी दाखवून प्रत्यक्ष रणांगणावर उतरली. तिने आपल्या आयुष्यातून स्त्री म्हणून अपेक्षित असलेल्या शारिरीक, मानसिक उणीवा, मर्यादा आणि बंधनं फोल असल्याचं दाखवून दिलं. मुख्य म्हणजे प्रसंगी कठोरपणा, खरंतर क्रौर्याचंही दर्शन घडवलं आणि स्त्री एका मर्यादेपलीकडे धोकादायक होऊ शकत नाही, या समजाला सुरुंग लावला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.