आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस. विशेषतः लहान मुलांच्या फुलपंखी दुनियेत तर या दिवसाचे महत्त्व खासच. एकत्र जमायचे, केक कापायचा, फुंकर मारून मेणबत्त्या विझवायच्या, गाणी म्हणायची आणि मग हसत-खिदळत केक खाणे, गिफ्टची देवाण-घेवाण आणि नंतरची पार्टी या गोष्टींचा आनंद लुटायचा.
त्याअनुषंगाने आठवते ती ‘हॅपी बर्थडे टू यू’ ही गाण्याची लोकप्रिय धून. इंग्रजीतील हे सर्वात लोकप्रिय गाणे. मात्र हेच गाणे काही वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्याचाच हा किस्सा खास पोस्टमनच्या वाचकांसाठी.
नेमके वर्ष सांगायचे तर २०१६. या गाण्याचे प्रकाशक असलेल्या वॉर्नर/चॅपेल यांच्यावर गाण्याला आव्हान देणारी केस मिटवण्यासाठी १.४ करोड डॉलर्स एवढी भरभक्कम रक्कम मोजण्याची वेळ आली.
त्यानंतर या गाण्यावरचा वॉर्नर/ चॅपेल यांचा हक्क संपुष्टात आला आणि हे गाणे ‘पब्लिक डोमेन’मध्ये आले. म्हणजेच हे गाणे त्यानंतर सार्वजनिक मालकीचे झाले. त्यावर कुण्या एकाची मालकी उरली नाही. अमेरिकेच्या इतिहासात या निर्णयाकडे ऐतिहासिक निर्णय म्हणून बघितले जाते. युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट जज जॉर्ज किंग यांनी वॉर्नर/ चॅपेल यांचा हॅपी बर्थडे या गाण्यावरील हक्क अवैध असल्याचा निर्णय दिला.
याआधी या गाण्याची मालकी प्राप्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. त्यातूनच त्याची मालकी अनेकदा एकाकडून दुसऱ्याकडे गेली होती. १९८८ साली या गाण्याची मालकी वॉर्नर चॅपेल यांच्याकडे आली आणि त्यानंतर या प्रकाशकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. या गाण्याचा टीव्ही शो किंवा चित्रपटांमध्ये वापर करू देण्यासाठी आता ते चांगली भरभक्कम रॉयल्टी आकारायला लागले. या सगळ्याला या निर्णयामुळे चाप बसला.
न्यायमूर्ती किंग यांच्या म्हणण्यानुसार या गाण्याचा १९३५ मधील मूळ कॉपीराइट केवळ विशिष्ट पियानो सुरावटीसाठीच लागू आहे. शिवाय या गाण्याची चाल १८९३ च्या ‘गुड मॉर्निंग टू ऑल’ या चालीवरून घेतलेली आहे. विशेष म्हणजे गुड मॉर्निंग टू ऑल बऱ्याच कालावधीपासून सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहे.
सुरुवातीला किंग यांनी हॅपी बर्थडे हे गाणे सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करायचे नाकारले होते. तेव्हा वॉर्नर/ चॅपेल हे सरकारला आव्हान देण्याचा विचार करत होते. त्याच दरम्यान पॅटी स्मिथ हिल आणि मिल्ड्रेड हिल या दोघी बहिणींनी हे गाणे कोणाचे, त्यावर हक्क कोणाचा याचा शोध घेतला होता. या प्रकरणाची ट्रायल डिसेंबरमध्ये सुरू होणार होती. याच काळात दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला.
वॉर्नर्सना २०३० पर्यंत हॅपी बर्थडे गाण्याचे कॉपीराइट्स त्यांच्याकडे राहतील अशी अपेक्षा होती. अंदाजानुसार २०३० पर्यंत या गाण्याच्या माध्यमातून १.४ करोड डॉलर्स ते १.६५ करोड डॉलर्स इतकी कमाई होऊ शकली असती.
मात्र या करारामुळे वॉर्नर/चॅपेल यांचा एक फायदा झाला. अंदाजानुसार त्यांनी परवाना शुल्काच्या माध्यमातून पंचवीस वर्षांच्या कालावधीत ५ करोड डॉलर्सपेक्षा जास्त महसूल गोळा केला होता. अशाप्रकारे महसूल गोळा केल्याबद्दल त्यांना दंड केला जावा की नाही याबद्दलची सुनावणी होणार होती. ती या समझोत्यामुळे टळली.
त्याआधी जेनिफर नेल्सन नावाच्या निर्मातीने वॉर्नर/ चॅपेल यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. ही निर्माती हॅपी बर्थडे गाण्याबद्दलच्या एका माहितीपटाची निर्मिती करत होती, तेव्हा तिच्याकडून हे गाणे वापरण्यासाठी परवाना शुल्क म्हणून दीड हजार डॉलर्स आकारले गेले होते. भविष्यात इतर निर्मात्यांना किंवा इतर कुणालाही वॉर्नर/ चॅपेल यांना अशाप्रकारे पैसे द्यायला लागू नये म्हणून तिने हा दावा ठोकला. फिर्यादीच्या दाव्यानुसार विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे गाणे मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिसायचे. त्यामुळे ते आतादेखील सार्वजनिक असणेच योग्य होते.
फिर्यादींचे प्रतिनिधित्व मार्क रिफकिन यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी केले. कराराच्या अटींप्रमाणे त्यांनी समझोत्याच्या रकमेच्या एक तृतीयांश म्हणजे ४६.१९ लाख डॉलर्स एवढी फी आकारली. उरलेली रक्कम ज्यांनी ‘हॅपी बर्थडे’च्या परवान्यासाठी पैसे दिले होते आणि इतर सर्व अटी पूर्ण केलेल्या होत्या, त्यांना वाटून दिली गेली.
दुसरीकडे कंपनीचे तिमाहीचे नफ्यातोट्याचे आकडे जाहीर करताना वॉर्नर म्युझिक ग्रुपने हॅपी बर्थडे गाण्याच्या तडजोडीसाठी खर्च कराव्या लागलेल्या ऑपरेटिंग लॉसेसवर ठपका ठेवला!
पण काही का असेना, केवळ अमुक एक धून किंवा संगीतरचना आपल्या मालकीची म्हणून तिच्या वापरासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेणाऱ्या एका बलाढ्य आणि मातब्बर कंपनीला न्यायालयाने हिसका दाखवला आणि ती गोष्ट सार्वजनिक वापरासाठी खुली करून दिली, ही बाब अनोखीच म्हणावी लागेल. निदान अमेरिकेत तरी.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.