आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोना कालखंडात जगभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी N95 दर्जाच्या मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जात होता. हे मास्क हवेत असलेल्या ९५ टक्के अनावश्यक घटकांना आपल्या नाकातोंडात प्रवेश करण्यापासून रोखतात.
यात कोरोनासारख्या विषाणूला देखील रोखण्याची क्षमता आहे. इतर मास्कची क्षमता ही N95 मास्कच्या तुलनेत फार कमी आहे. हे एक जीवनदायी उपकरण आहे आणि यामुळेच ते जगभरातील कोरोना व्हायरसच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्याचे प्रतीक बनले.
एक साधं प्लास्टिकचं मास्क एकविसाव्या शतकातील सर्वांत उपयोगी उपकरण कसं बनलं याचा इतिहास खूप रंजक आहे.

१९१० साली या कथेची सुरुवात होते, ज्यावेळी एक डॉक्टर जगाला भयंकर महामारीपासून वाचवण्यासाठी परिश्रम घेत होता.
जगात सुरुवातीला जेव्हा मास्कचा शोध लागला त्यावेळी त्याचा एकमात्र उद्देश होता, तो म्हणजे दुर्गंधी टाळणे. ज्यावेळी आपल्याला जिवाणू आणि विषाणू काय असतात आणि ते हवेतून कसे पसरतात याची समज देखील नव्हती, त्यावेळीपासून लोक या मास्कचा वापर करत होते.
सोळाव्या व सतराव्या शतकातील युरोपमध्ये लोक आजारपणापासून बचावासाठी तोंडावर रुमाल ठेवत. १७२० साली फ्रान्समधील मर्सिलेस या शहराचं एक चित्र उपलब्ध आहे, ज्यात लोक आपल्या तोंडावर कपडा बांधून मृत शरीरांची विल्हेवाट लावताना दिसतात. हे चित्र त्यावेळी काढण्यात आलं होतं ज्यावेळी युरोपात प्लेगची साथ पसरली होती.
त्याकाळी लोकांना प्लेगच्या प्रसाराची माहिती नव्हती पण त्यांना असं वाटायचं की पृथ्वी खालून एक विषारी वायू निघतो, जो हवेला प्रदूषित करून नाकावाटे त्यांच्या तोंडात जातो. मृत्यूच्या भीतीने हे लोक मग तोंडाभोवती रुमाल बांधायचे.

१६०० च्या आसपास जेव्हा प्लेगने जगभरात हाहा:कार माजवायला सुरुवात केली होती, त्यावेळी पक्षाच्या चोचीच्या आकाराच्या मास्कची निर्मिती युरोपच्या काही भागांत करण्यात आली होती. हे मास्क प्लेगच्या विषारी वायूच्या वासापासून रक्षा करते व आपला जीव वाचवते अशी लोकांची धारणा होती.
या मास्कचा वापर २०० वर्ष तसाच सुरू होता. लोकांना त्या चोचीचा आकाराच्या मास्कने संरक्षण प्राप्त होत होते.
१८७० पर्यंत शास्त्रज्ञांना जीवाणूंचा शोध लागला होता. लोकांना आता सूक्ष्मजीवशास्त्र अवगत झालं होतं. त्यामुळे आधीच्या प्राचीन पद्धतीच्या चोचीच्या मास्कचा वापर कमी होत गेला व हद्दपार झाला.
१८९७ साली डॉक्टरांनी पहिल्या सर्जिकल मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मास्क म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती बांधलेला रुमाल होता. यातून हवेतील कणांपासून शंभर टक्के संरक्षण होत नव्हतं. डॉक्टर आणि शल्य चिकित्सक यांना खोकण्यापासून, शिंकण्यापासून व तोंडावाटे द्रव्य पेंशटच्या जखमेवर पडण्यापासून रोखण्यासाठी त्या मास्कचा आविष्कार करण्यात आला होता.
त्यावेळी मास्क हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. ते व्यवस्थितपणे तोंडाला संरक्षण प्रदान करण्यास असमर्थ होते. यातूनच पुढे जगातील पहिल्या मॉडर्न रेस्पायरेटरचा शोध लागला, ज्याचा इतिहास गडद अशा वर्णद्वेषाच्या पार्श्वभूमीने ग्रासलेला आहे.

१९१० साली चीनमध्ये मंचुरीया प्रांतात प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता. लोक नवीन प्रकारच्या प्लेगने व्हीवळत होते. हा आजार फक्त २४ तासात लोकांचा जीव घेत होता. त्यावेळी चीनच्या न्यायालयाने ली तेह वु नावाच्या डॉक्टरला आपल्या प्लेगविरोधी कार्यक्रमाचा प्रमुख म्हणून नेमले.
डॉ. वु ने पेशंटची ऑटोपसी केली आणि नमुन्यांचे संकलन करून संशोधन सुरू केले. डॉ. वु ला कळले की आजाराचा प्रसार हा माशी व किटकांमुळे नाहीतर हवेतून होतो आहे. यामुळे डॉ. वु ने लोकांच्या रक्षणासाठी पाश्चात्त्य देशातील मास्कचा सल्ला दिला पण त्याने उपयोग होत नाही, असे त्याचा लक्षात आले.
मग त्याने नवीन कापसाने विणलेले, जाळीदार मास्क तयार केले ज्यात वेगवेगळ्या लेयर्स होत्या, ज्यातून धूलिकण आणि सूक्ष्म जिवाणू यांचा तोंडावाटे शरीरात होणारा प्रवेश रोखणे सहज शक्य होते. त्याचं संशोधन हे उत्तम असलं तरी त्याच्या संशोधनाला जागतिक पातळीवर लोक स्वीकारत नव्हते याला प्रमुख कारण होता त्याचा चिनी वंश.
तत्कालीन लोकांची धारणा होती की जगातील सर्वोत्तम गोष्टी या फक्त पाश्चात्त्य देशातच तयार होऊ शकतात. डॉ. वु ने अनेक प्रयोग करून त्या पाश्चात्त्य तज्ज्ञांना पटवून दिले की त्याचे मास्क उत्तम आहे. पण त्याला प्रतिकार म्हणून पाश्चात्त्य लोकांनी दुसरे मास्क तयार केले, पण त्याचा वापर करणे जनतेला अवघड झाले कारण त्यांचे वजन जास्त होते व परिणामकारकता फार कमी होती.
मग अखेरीस डॉ. वु च्या मास्कला स्वीकृती मिळाली आणि त्याचा वापर अगदी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला. १९११ साली डॉ. वु चे मास्क जगभरात प्रसिद्ध झाले. त्याचा वापर पहिल्या महायु*द्धात करण्यात आला. महायु*द्ध संपत आले तेव्हा १९१८ साली स्पॅनिश फ्लूची महामारी आली त्यावेळी अनेक खाजगी कंपन्यांनी N95 दर्जाच्या मास्कची निर्मिती केली हे मास्क डॉ. वु ने तयार केलेल्या मास्कची सुधारीत आवृत्ती होती.
या मास्कमुळे अनेक लोकांचे जीव त्या भयंकर आजारपणात वाचू शकले. पुढे दुसरं महायु*द्ध झालं त्यात देखील या N95 दर्जाच्या मास्कचा वापर करण्यात आला.
१९५२ साली एयरोबस्टचा आविष्कार करण्यात आला पण ते देखील जड असल्यामुळे वापरण्यात आले नाही. मग १९७० साली N95 दर्जाच्या मास्कची अजून सुधारित आवृत्ती निर्माण करण्यात आली, जी अधिक परिणामकारक होती.
१९९० साली ड्रग रेसिस्टंट टीबी आला, त्यावेळी देखील या मास्कमध्ये असंख्य सुधारणा करण्यात आल्या. पुढे २००३ साली SARS आला, २०१२ MERS आला, हे दोन्ही आजार विषाणूमुळे होतात हे लक्षात आल्यावर अजून सुधारणा करून या मास्कला ९५% पर्यंत परिणामकारक बनवण्यात आले. आज याच मास्कचा वापर कोरोनाशी सामना करण्यासाठी होतो आहे.
कोणाला माहिती देखील नसेल, की ज्या चीनमधून जगभरात कोरोना आला, त्याच चीनमधून फार वर्षांपूर्वी एका डॉक्टरने त्याच्याशी लढण्याचं साधन देखील जगाला दिलं होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









