आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या जगभरामध्ये कोरोनाचे प्रचंड थैमान चाललेले आहे. आपल्या भारत देशात हा आकडा जवळपास १२००० च्या वर पोहोचलेला आहे. या रोगावर अजूनही कुठली लस सापडलेली नाही. ती लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ तहान भूक हरपून प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश येवो म्हणून अनेक देशातील लोक प्रार्थना करीत आहेत.
अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधे कोरोना वर काम करू शकतात असे आडाखे बांधले जात आहेत. साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याने एक ट्विट केले होते त्यात त्यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध या कोरोनाच्या युद्धात कोरोनाला हरवण्यासाठी गेम चेंजर ठरू शकते असे म्हटले होते.
HYDROXYCHLOROQUINE & AZITHROMYCIN, taken together, have a real chance to be one of the biggest game changers in the history of medicine. The FDA has moved mountains – Thank You! Hopefully they will BOTH (H works better with A, International Journal of Antimicrobial Agents)…..
— Donald J. Trump (@realDonaldTrump) March 21, 2020
तेंव्हापासून जगाचे डोळे या औषधाकडे वळले होते. जे कोणी डॉक्टर नाही अथवा सायन्स बॅकग्राउंडचे सुद्धा नाहीत अशा लोकांच्या तोंडी सुद्धा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे नाव होते. हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल काय आहे हे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन?
एव्हढेच नव्हे तर गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप यांचे २ ट्विट चांगलेच गाजले. अमेरिकेने भारताकडे या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची मागणी केली होती याचं प्रमुख कारण म्हणजे भारत या औषधाचा प्रमुख निर्माता आणि निर्यातदार आहे.
या औषधाची मागणी जर भारताने फेटाळली तर आम्हाला आमचे पावले उचलावी लागतील अशा प्रकारचे संभाव्य ट्विट ट्रंप यांनी केले होते मात्र त्यानंतर भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन चा पुरवठा झाल्यानंतर कोरोनाच्या युद्धात भारताने आम्हाला मदत केली आहे. आम्ही हे भारताचे उपकार विसरणार नाही. या रोगावर जेंव्हा आमचे शास्त्रज्ञ लस तयार करतील तेंव्हा अमेरिके बरोबर त्याचा पहिला उपभोक्ता भारत असेल अशा प्रकारचे मैत्रीपूर्ण ट्विट डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून करण्यात आले.
Extraordinary times require even closer cooperation between friends. Thank you India and the Indian people for the decision on HCQ. Will not be forgotten! Thank you Prime Minister @NarendraModi for your strong leadership in helping not just India, but humanity, in this fight!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 8, 2020
भारत जेनेरीक औषधांचा मोठा निर्यातदार देश आहे. भारताला जगाची फार्मसी असे म्हटले जाते. अनेक देशातील गरीब लोक आपल्या भारतातून आयात केलेली औषधे कमी किमतीत घेवू शकतात.
आता या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचे उदाहरण घेउ. अमेरिकेसारखी महासत्ता भारताकडे या औषधासाठी इतकी दीन का झाली? अगदी औषध दिले नाही तर आम्ही आम्हाला योग्य वाटतील ती पावले उचलू हे म्हणण्यापर्यंत पॅनिक का झाली? भारताकडे हे औषध कसे आले? आज भारत हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा निर्माता पुरवठादार देश कसा बनला यासंदर्भातील अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.
यामागे एक मोठा इतिहास आहे. तो समजावून घेण्यासाठी थोडे पाठीमागे जाऊ. साधारणपणे १७९९ साली टिपू सुलतानच्या साम्राज्याचा अंत झाला. १७९९ ला टिपू इंग्रजांबरोबर लढाई हरला. म्हैसूर संस्थान इंग्रजांच्या अधिपत्त्याखाली आले.
त्यावेळी म्हैसूर संस्थानाची राजधानी होती श्रीरंगपट्टण. या शहरात लढाई नंतर बरेच इंग्रजी सैनिक वास्तव्यास राहिले. त्यांचे पहिले काही दिवस तेथे चांगले गेले. मात्र नंतर म्हैसूर हा दाट जंगलाचा भाग असल्यामुळे आणि डासांचा प्रचंड प्रादुर्भाव असल्यामुळे इंग्रजी सैनिकांमध्ये मलेरिया या रोगाचा प्रादुर्भाव झाला.
आता मलेरिया हा रोग आपल्या लोकासाठी नवीन नव्हता. पिढ्यानपिढ्या त्या रोगाचा सामना करून भारतीय लोकांमध्ये मलेरियाच्या विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली होती आणि त्यात भारतीय जेवणात असलेल्या मसाल्याचे पदार्थाचे प्रमाण जास्त असल्याने हे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत झाली होती. इंग्रजांसाठी ही गोष्ट नवीन होते त्यामुळे अनेक ब्रिटीश सैनिक या रोगाला बळी पडू लागले.
या रोगाचा वाढता धोका लक्षात घेवून इंग्रजांनी आपले ठाणे श्रीरंगपट्टण वरून बंगलोर शहरात स्थलांतरीत केले. बंगलोर ची हवी श्रीरंगपट्टण पेक्षा थंड होती मात्र डासांचा प्रादुर्भाव त्या भागातही कायम असल्यामुळे ब्रिटीश सैनिकांना मलेरियाची लागण होण्याचे प्रमाण काही कमी झाले नाही.
याच सुमारास युरोप मधील शास्त्रज्ञांनी मलेरिया रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी “ क्विनीन” नावाचे औषध तयार केलेले होते मात्र त्या औषधांची मानवी शरीरावर काय परिणाम होतात हे पाहण्यासाठी टेस्टिंग झाली नव्हती.
भारतात ब्रिटीश सैन्यामध्ये होणारा मलेरियाचा वाढता संसर्ग पाहून ब्रिटीश सरकारने हे क्विनीन औषध मोठ्या प्रमाणावर आयात करून भारतात आणले आणि ब्रिटीश सैन्यामध्ये वाटप करून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना या औषधांचे रेग्युलर डोसेज घ्यायला सांगितले.
तरीही ब्रिटीश सरकारच्या लक्षात एक गोष्ट आली. क्विनीन घेवून मलेरियाने आजारी पडलेले सैनिक तर बरे होत आहेत पण त्याच्यानंतर भारताच्या उष्ण वातावरणामुळे हजारो पट ब्रिटीश सैनिक पुन्हा पुन्हा मलेरियाला बळी पडत आहेत.
यामागच्या कारणाचा शोध घेतल्यानंतर कळाले अनेक ब्रिटीश सैनिकांना सांगून सुद्धा ते या क्विनीन औषधांचे डोस घेत नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे हे क्विनीन औषध अत्यंत कडवट होते. हा शोध लागल्यानंतर ब्रिटीश सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी आणि शास्त्रज्ञ या क्विनीनचा कडवटपणा कमी कसा करता येईल यावर विचार करू लागले.
ज्युनिपर या सिरीया मध्ये आढळणाऱ्या फुलापासून तयार केलेल्या दारूमध्ये जर हे क्विनीन मिसळले तर त्याचा कडवटपणा कमी होवून त्याची चव गोड होते असा शोध ब्रिटीश संशोधकांनी लावला. या ज्युनिपर पासून तयार केलेल्या लिकरचे नाव जिन असे होते. त्यामुळे नवीन औषधाचे नाव Gin&Tonic असे ठेवण्यात आले. हे नवीन औषध अगदी लगेच ब्रिटीश सैनिकांमध्ये लोकप्रिय ठरले.
अगोदर मलेरिया परवडला पण हे क्विनीनसारखे भयानक कडवट औषध नको म्हणणारे ब्रिटीश सैनिक हे Gin & Tonic अगदी आनंदाने घेवू लागले इतकेच काय पण ब्रिटीश सैनिकांना दर महा मिळणाऱ्या रेशन मध्ये सुद्धा क्विनिन आणि गिन ची लिक्विड बॉटल प्रिस्क्रिप्शन म्हणून मिळू लागली.
आता या Gin& Tonic ची गरज देशभरात पसरलेल्या ब्रिटीश सैन्याला भासू लागली त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यावेळी बंगलोर आणि त्याच्या आजूबाजूला ज्युनिपर बेस्ड लिकर बनवण्याचे कारखाने काढले. त्यामुळे अगदी ब्रिटीश काळापासून बंगलोर देशाची दारूची फॅक्टरी म्हणून ओळखले जाते.
स्वातंत्र्योत्तर काळात हे सगळे कारखाने विठ्ठल मल्ल्याने ब्रिटीश सरकार कडून विकत घेतले. हे विठ्ठल मल्ल्या म्हणजे कुप्रसिद्ध लिकर किंग विजय मल्ल्याचे वडील.
आपल्या विषयाकडे परत येऊ. हे Gin& Tonic हे अत्यंत जगप्रसिद्ध कॉम्बिनेशन बनले. आजही या औषधाला असलेली मागणी कायम आहे. क्विनीन हे औषध आजही डॉक्टर मलेरियाच्या अथवा तत्सम तापाच्या लक्षणामध्ये देतात. आज टॉनिक हा शब्द औषधासाठी पाश्चात्य औषध या शब्दासाठी समानार्थी म्हणून वापरला जातो.
या क्विनीन औषधावर पुढे बरेच संशोधन झाले. त्याचे पुढे बरेच प्रकार देखील निघाले. आपल्या भारतीय शास्त्रज्ञानी ते शोधून काढले त्यातील एक वर्ग म्हणजे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन.
ब्रिटीश त्यांच्या देशात परत गेल्यावर त्यांना या औषधांची गरज कदाचित भासली नाही त्यामुळे हे औषध त्यावेळी युरोप अमेरिकेमध्ये फारसे बनवले गेले नाही. भारतात मात्र त्याची निर्मिती आणि संशोधन चालू राहिले. आज भारत या औषधाचा मोठा निर्माता आहे आणि निर्यातदार सुद्धा. या औषधाच्या मागणीसाठी आज पाश्चिमात्य देशांना आज भारता पुढे गुडघे टेकावे लागले. इथे नियतीच एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणावं लागेल.
- अंजली झरकर
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.