आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शस्त्रक्रिया म्हटलं की भल्याभल्यांच्या काळजात धडकी भरते. खरं तर सध्याच्या काळात वैद्यकशास्त्राने खूप मोठी प्रगती केली आहे. वैद्यकीय अभियांत्रिकीसारखी नवी ज्ञानशाखा आणि संगणकाधारित तंत्रज्ञानाची त्याला जोड मिळाली आहे. त्यामुळे आता शस्त्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी झाल्या आहेत. लेझरसारख्या तंत्रज्ञानाने तर कोणतीही कापाकापी न करताही शस्त्रक्रिया करता येतात. तरीही शस्त्रक्रियेबद्दलची भीती सर्वसामान्यांच्या मनातून अजून काही गेलेली नाही.
या पार्श्वभूमीवर ज्या काळात भूल देण्याचं तंत्र विकसित झालं नव्हतं, त्या काळातल्या शस्त्रक्रियांची फक्त कल्पना तरी करून बघा! त्या ‘व्हिक्टोरीयन’ काळात शस्त्रक्रिया हे एक मोठं दिव्य असायचं. भूल देण्याची सोय नव्हती. मुख्य सर्जनच्या हाताखाली ५ सहाय्यक असायचे. त्यातले चौघे फक्त रुग्णाचे हात पाय धरून ठेवण्यासाठी आणि पाचवा उपकरणं देण्यासाठी. उपकरणं म्हणजे चाकू आणि करवती. नुसतं ते बघूनच रुग्णाचा थरकाप व्हावा.
त्या काळात ऑपरेशन थिएटरला प्रेक्षक गॅलरी असायची आणि प्रेक्षकांना शस्रक्रिया बघण्याची मुभा दिली जायची. म्हणूनच त्याला “थिएटर” म्हटले जात.
कल्पना करा, आपण त्या ऑपरेशन थिएटरमध्ये झोपलो आहोत. चौघांनी आपले हात पाय धरून ठेवले आहेत. दोन डॉक्टर्स चाकू, सुरे आणि करवती घेऊन आपल्या भोवताली वावरत आहेत आणि गॅलरीतून पाच-पन्नास डोळे आपल्याकडे रोखून पहात आहेत. शस्त्रक्रियेपूर्वीच रुग्णाची काय अवस्था होत असेल?
त्या काळात शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा शस्त्र चालवण्याचा वेग हे सर्वात महत्त्वाचं कौशल्य होतं. कारण शस्त्रक्रिया सुरू झाल्यावर वेदना असह्य झाल्याने रुग्ण बेफाम होत असत आणि सहाय्यकांशी झटपट सुरू व्हायची. मग शस्त्रक्रिया करणं खूपच अवघड व्हायचं. दुसरी भीती म्हणजे काही रुग्ण वेदना आणि उघड्या डोळ्यांनी आपले अवयव कापले जात असल्याचे पाहून भीतीने वाढणारे हृदयाचे ठोके. अनेकदा भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊनच रुग्णांचा मृत्यू व्हायचा. त्यामुळे त्या काळात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर तब्बल ३०० टक्के इतका होता.
त्या काळात सर्वांत वेगवान आणि अर्थातच सर्वांत यशस्वी सर्जन होते डॉ. रॉबर्ट लिस्टन! त्यांच्या वेगवान शस्त्रक्रियेच्या शैलीमुळे त्यांच्यावर अनेकदा बेफिकिरीचे आरोप झाले मात्र, रुग्णाला वेदना जाणवण्यापूर्वी शस्त्रक्रिया संपवण्याच्या दृष्टीने त्या काळात तेच गरजेचं होतं. त्यांच्या या शैलीमुळेच ते त्या काळातले सर्वाधिक यशस्वी सर्जन ठरले.
त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या १० रुग्णांपैकी १ जणाचा मृत्यू व्हायचा, तर इतर बहुतेक सर्जन्सनी शस्त्रक्रिया केलेल्या १० रुग्णांपैकी सरासरी ४ जण दगावायचे.
डॉ. लिस्टन यांनीच आपली शस्त्रक्रिया करावी असा त्या काळातल्या इंग्लंडमधल्या रुग्णांचा आग्रह असायचा, त्यामुळे कित्येक दिवस प्रतिक्षालयात थांबण्याचीही त्यांची तयारी असायची. डॉ. लिस्टन यांचीही आपल्या सेवाभावी पेशावर निष्ठा होती. रुग्णांबद्दल आस्था होती. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाकडे तर ते लक्ष द्यायचेच; पण इतर डॉक्टरांनी अशक्य म्हणून सोडून दिलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियाही ते आवर्जून करायचे. अर्थात त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या हितशत्रूंनी ‘दिखाऊपणा’चा ठपकाही ठेवला. मात्र, त्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता आपलं काम सुरूच ठेवलं.
डॉ. लिस्टन यांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या भन्नाट वेगामुळे ते स्वतः जिवंतपणीच एक दंतकथा बनून गेले. त्यातली एक सर्वांत गाजलेली दंतकथा म्हणजे, डॉ. लिस्टन यांनी एका रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांचा हात इतका वेगाने चालत होता की पाय कापला तरी हाताने कापण्याची क्रिया सुरूच राहिली. त्यामुळे रुग्णाचे पाय धरून ठेवलेल्या सहाय्यकाची बोटंही कापली गेली. दुसरीकडे डॉक्टरांनी घाईने उपकरणं बदलताना शस्त्रक्रिया बघणाऱ्या प्रेक्षकांचा कोटही कापला. इकडे रुग्णाच्या जखमांचा संसर्ग बोटं कापली गेलेल्या सहाय्यकाला झाला आणि संसर्गामुळे रुग्ण आणि सहाय्यक दोघेही दगावले.
डॉ. लिस्टन केवळ वेगवान, तरीही स्थिर हाताचे सर्जन म्हणूनच प्रसिद्ध नव्हते. ते सर्जरीमधले नामवंत प्रशिक्षकही होते. त्यांनी आपल्या हाताखाली अनेक शिष्य घडवले. त्याचप्रमाणे ते वैद्यकशास्त्रातले संशोधक आणि लेखकही होते. त्यांनी लिहिलेली ‘लिस्टन स्प्लिंट,’ ‘बुलडॉग’ आणि ‘लॉकिंग फोर्सेप्स’ यासारखी पुस्तकं आजही वाचली जातात. तसंच ‘द एलिमेंट्स ऑफ सर्जरी’ आणि ‘प्रॅक्टिकल सर्जरी’ हे दोन वैद्यकीय ग्रंथही त्यांनी प्रकाशित केले. त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीच्या काळात त्यांनी वैद्यकीय इतिहास नोंदवण्याचं कामही केलं.
कारकिर्दीच्या उत्तरार्धात डॉ. लिस्टन यांनी अशी एक शस्त्रक्रिया केली की ज्या वेगवान शस्त्रक्रिया शैलीने त्यांना वैद्यकशास्त्राच्या इतिहासात मानाचं पान मिळवून दिलं, ती शैलीच कालबाह्य ठरली. सन १८४६ मध्ये त्यांच्याकडे फ्रेडरिक चर्चिल नावाचा एक रुग्ण आला. त्याच्या उजव्या गुडघ्याच्या वेदनेने त्याला अनेक वर्षांपासून त्रास दिला होता. त्याने आधी घेतलेल्या कोणत्याही उपचारांचा उपयोग झाला नाही. आता एकच पर्याय उरला. तो म्हणजे शस्त्रक्रिया.
शस्त्रक्रियेच्या दिवशी डॉ. लिस्टन ऑपरेशन थिएटरमध्ये आले. चाकू हातात घेण्याऐवजी त्यांनी खिशातून एक कुपी बाहेर काढली. ईथरची कुपी. अमेरिकन दंतचिकित्सक आणि शल्य विशारदांनी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूल म्हणून ईथर वापरण्याचं प्रात्यक्षिक नुकतंच सादर केलं होतं.
डॉ. लिस्टन यांनी तो प्रयोग करून बघायचं ठरवलं. ते शस्त्रक्रिया बघायला आलेल्या प्रेक्षकांना म्हणाले, आम्ही आज ‘यँकी डॉज’ (पळवाट) वापरून पाहणार आहोत, माणसांच्या संवेदना गोठवण्याची!
डॉ. लिस्टन यांचे सहकारी डॉ. विल्यम स्क्वायर यांनी चर्चिलच्या चेहेऱ्याला एक रबरी नळी लावली. तिचं दुसरं टोक ईथरच्या कुपीला लावलेलं होतं. चर्चिलने श्वास घेताच ईथर त्याच्या शरीरात गेलं आणि तो बेशुद्ध झाला. डॉ. लिस्टन यांनी अवघ्या अर्ध्या मिनिटात शस्त्रक्रिया उरकली. चर्चिल काही मिनिटांनंतर उठला आणि त्याने विचारलं, शस्त्रक्रिया कधी सुरू होणार? प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
एखाद्या क्षेत्रात एखादे तंत्र अवगत केल्यानंतर बहुतेक जण त्यातच अडकून पडतात. नव्याचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी नसते. मात्र, प्रगतीची चाकं न थांबता पुढे जातंच असतात त्यामुळे तिथेच थांबणारे कालबाह्य होतात. डॉ. लिस्टन यांचं वेगळेपण आणि मोठेपण हेच आहे की रुग्णाच्या वेदनेमुळे त्यांच्या गतिशील शस्त्रक्रियेला मोल होतं.
भुल देण्याचं तंत्र विकसित झाल्यानंतर त्यांच्या वेगाला कुणी विचारणारं नव्हतं. तरीही काळाबरोबर राहण्यासाठी आणि मुख्य म्हणजे रुग्णांची वेदनारहित शस्त्रक्रिया व्हावी, यासाठी त्यांनी स्वतःच भुलीचा प्रयोग करून बघितला. दुर्दैवानं चर्चिलच्या शस्त्रक्रियेनंतर वर्षभरात डॉ. लिस्टन यांच्या नौकेला झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. लंडनचा वेगवान चाकू शांत झाला. कायमचा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.