वर्णभेदावर मात करून बुकर पुरस्कार पटकवणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला ठरलीये

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘मॅन बुकर प्राईज’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मानाचा साहित्य पुरस्कार समजला जातो. राष्ट्रकुल परिषदेच्या यादीतील सदस्य देशांच्या लेखकांनी लिहिलेल्या उत्कृष्ट इंग्रजी साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

दर्दी आणि रसिक वाचकांना उत्कृष्ट साहित्याची मेजवानी मिळावी आणि असे दर्जेदार साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे या एकमेव हेतूने या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. १९६९ साली या पुरस्काराला सुरुवात झाली.

१९६९पासून आजतागायत ५२ बुकर पुरस्कार देण्यात आले आहेत.

२०१९ सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा दोन लेखिकांमध्ये विभागून देण्यात आला. कॅनेडियन लेखिका मार्गारेट ऍटवूड आणि ब्रिटीश लेखिका बर्नाडिन एव्हारिस्टो या दोघींना हा पुरस्कार जाहीर झाला.

बुकर पुरस्कार जिंकणारी एव्हरीस्टो ही पहिली कृष्णवर्णीय लेखिका आहे. तर मार्गारेट ऍटवूड यांना हा पुरस्कार दुसऱ्यांदा घोषित झाला आहे. या पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या सहा पुस्तकांच्या अंतिम यादीत ब्रिटीश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्या ‘किशॉट’ या पुस्तकाचाही समावेश होता.

मार्गारेट ऍटवूड यांच्या ‘द टेस्टामेंट’ आणि एव्हरीस्टो हिच्या ‘गर्ल. वूमन. अदर.’ या दोन्ही पुस्तकांपैकी कोणत्या तरी एकाचीच निवड करणे अशक्य होते असे या पुरस्कार समितीने कबुल केले. त्यामुळेच हा पुरस्कार विभागून देण्यात आला.

याआधीही दोन वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता. १९७४ साली, १९९२ साली. मात्र १९९२ नंतर हा पुरस्कार विभागून देण्यात येणार नाही, असे ठरवले होते.

बुकरच्या इतिहासात चार लेखकांनी हा पुरस्कार दोनदा पटकावला आहे. दोनदा बुकर पुरस्कार पटकावणाऱ्यांमध्ये जे. एम. कोईत्झी, पीटर कॅरे, हिलरी मनटेल आणि मार्गारेट ऍटवूड यांचा समावेश होतो.

हा पुरस्कार इंग्रजी साहित्यासाठी आणि इतर भाषेतून इंग्रजीत अनुवादित झालेल्या साहित्यासाठीही दिला जातो. ऍटवूड यांच्या ‘द ब्लाइंड असासीन’ या पुस्तकासाठी पूर्वी त्यांना बुकर मिळाला होता. त्यानंतरही ‘द हँडमेड्स टेल’ या त्यांच्या आणखी एका पुस्तकाला बुकरचे नामांकन मिळाले होते. याच हँडमेड्स टेलचा उत्तरार्ध त्यांनी ‘द टेस्टामेंट’मध्ये मांडला आहे. या पुस्तकाने सर्वाधिक खपाचे सर्व विक्रम मोडीत काढले होते.

एव्हरीस्टो हिची ‘गर्ल, वूमन, अदर’ ही आठवी कादंबरी आहे. या आधीही तिच्या सात कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. हा पुरस्कार पटकावणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला आहे. याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.

ती म्हणते, “या पुरस्कारामुळे हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यास मदत होईल. यापुढे इतर कृष्णवर्णीय लेखिकांनीही या पुरस्कारावर आपला हक्क सांगावा आणि या पुरस्कारासाठी जरूर प्रयत्न करावेत.

एव्हरीस्टोच्या मते ती आपल्या लेखणीच्या माध्यमातून कृष्णवर्णीय लोकांच्या भावनांना वाट करून देतेय. हे काम मी नाही केले तर, कोण करणार असेही ती म्हणते.

या पुरस्कारामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचावे एवढीच तिची इच्छा आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, हे मलाच माहित आहे, यापुढे आणखीही कृष्णवर्णीय महिलांनी यावर आपली मोहोर उमटवावी असेही ती म्हणाली.

एव्हरीस्टोच्या बहुतेक कादंबऱ्यांचे कथानक हे तिच्या स्वानुभवावर किंवा तिच्या आजूबाजूच्या कृष्णवर्णीय लोकांच्या अनुभवावर आधारलेले असते. १९९४ पासून तिने आपला लेखनप्रवास सुरु केला. या काळात तिने विविध विषयांवर लेखन केले आहे.

गर्ल, वूमन, अदर या पुस्तकातील कथानक विशेष करून ब्रिटीश-कृष्णवर्णीय स्त्रियांच्या अनुभवाभोवती फिरते. यात बारा वेगवेगळी पात्रे आहेत. या सगळ्या स्त्री पात्रांनी आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, आणि प्रियकर यांच्याबद्दलचे आपले अनुभव सांगितले आहेत.

या कादंबरीतील काळही खूप मोठा आहे. तब्बल बारा वर्षांच्या काळात त्याच्या आयुष्यात जे काही चढ-उतार आले हे या कादंबरीच्या पटलावर मांडण्यात आले आहेत. बर्नार्डीनला तिच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

या सगळ्या पुस्तकातून तिने आफ्रिकन लोकांतील वैविध्य रेखाटले आहे. यातील काही भाग वास्तवावर तर काही कल्पनेवर आधारलेला आहे. लघुकथा, परीक्षण, निबंध, नाटक आणि पत्रकारिता असा तिच्या लेखणीचा चौफेर वावर असतो.

लंडनच्या ब्रूनेल विद्यापीठात ती क्रिएटिव्ह रायटिंग विषयाची प्राध्यापिका आहे. शिवाय रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर या संस्थेची ती उपाध्यक्ष आहे.

एक साहित्यिक चळवळीतील कार्यकर्ती म्हणून तिने अनेक साहित्य संस्थाच्या स्थापनेतही पुढाकार घेतला आहे. स्प्रीड द वर्ड रायटर डेव्हलपमेंट एजन्सी या संस्थेच्या स्थापनेतही तिचा पुढाकार आहे.

बीबीसीवरून तिच्या दोन कादंबऱ्यांचे अभिवाचनही सादर करण्यात आले आहे. २०१२मध्ये हॅलो मॅम या कादंबरीचे तर २०१३मध्ये द एम्पेरर बेब या कादंबरीचे अभिवाचन बीबीसीने सादर केले.

सुरुवातीला मॅन बुकर पुरस्कार हा फक्त राष्ट्रकुल परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या लेखकांनाच दिला जात असे. २०१६ पासून या पुरस्काराला इंटरनॅशनल बुकर पुरस्कार असे नाव दिले आणि यासाठी सर्वच देशातील लेखकांच्या पुस्तकांचा विचार केला जाऊ लागला.

या पुरस्काराच्या रुपात ५०,००० पौंडाचे बक्षीस दिले जाते. पुरस्कर मिळालेले पुस्तक जर भाषांतरित असेल तर यातील निम्मी रक्कम भाषांतरकाराला आणि निम्मी रक्कम लेखकाला दिली जाते.

या पुरस्काराच्या निवड समितीसाठी साहित्यातील सर्व विभागाशी संबधित तज्ञ व्यक्तींची निवड केली जाते. शिवाय, जे साहित्य, राजकारण, समीक्षा, क्रीडा, चित्रकला अशा सर्व प्रांतांचा अभ्यास असणारे दिग्गज विद्वान असतात.

जाणकार आणि रसिक वाचकांपर्यंत उत्तमोत्तम कलाकृती पोहोचावी याच हेतूने हा पुरस्कार दिला जातो. आजची या पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करताना निवड समितीतील सदस्याकडून हेच नियम लावले जातात. कादंबरीचे कथानक, त्यातील गुंफण, आशय, किती खोल आहे, आणि ते रसिकांपर्यंत पोहोचणे का आवश्यक आहे, ही कसोटी लावूनच अंतिम निवड केली जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!