अमूलच्या बटर इतक्याच अमूलच्या जाहिरातीही लोकप्रिय झाल्या आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात प्रत्येक घराघरात पोहोचलेली कंपनी म्हणजे अमूल. आनंद मिल्क युनायटेड लिमिटेडचा शॉर्ट फॉर्म- अमूल. अमुलला भारतातील दुग्ध क्रांतीचा जनक मानले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली ही  पहिली सहकारी संस्था आहे. फक्त भारतात नाही तर आशियामधले हे सहकाराचे सर्वात यशस्वी मॉडेल म्हणून गणले जाते.

गुजरातमधील शेतकऱ्यांना त्यांच्या दुध उत्पादनाचा फायदा मिळावा म्हणून आनंद मिल्क युनायटेड लिमिटेड या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

अमूलच्या अगोदर भारतात पिशवीतील दूध ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.

ज्याच्या घरी गाई असतील तो शेतकरी घरोघरी कीटलीत नेऊन दूध विकायचा. ज्यांना हे शक्य नव्हते ते लोक दलालांना दूध विकायचे. दलाल दुप्पट किंमतीने ते दूध बाजारामध्ये विकायचे. त्यामुळे हा धंदा पूर्णपणे दलालाच्या या साखळीवर अवलंबून असायचा. शेतकऱ्यांना याचा काहीही फायदा होत नव्हता.

आनंद हे गुजरातमधील एक गाव. या गावातील आणि आजूबाजूच्या अनेक गावातील शेतकऱ्यांची स्थिती त्यावेळी अत्यंत दयनीय होती. त्यांना शेतीतून कसे उत्पन्न मिळवावे हे कळत नव्हते. अमूलच्या अगोदर भारतामध्ये पॉल्सन डेअरी म्हणून एक डेअरी होती. तिचा मुख्य धंदा होता भारतीय शेतकऱ्यांना लुटणे आणि त्यांच्या दुधापासून स्वतःचा फायदा लाटणे.

या पॉल्सनला अमूलने स्वदेशी ब्रँड म्हणून मोठी टक्कर दिलेली होती. 247 लिटर दूध संकलनासह 14 डिसेंम्बर 1946 साली अमूलची सुरुवात झाली. डॉ. वर्गीस कुरियन, त्रिभुवनदास पटेल सारखे निस्पृह नेतृत्व अमूलला लाभले होते.

1960 पर्यंत अमूल गुजरातमधली सगळ्यात मोठी दूध संकलक डेअरी बनली. 1965 साली लाल बहादूर शास्त्री यांनी ही अमूलची योजना संपूर्ण देशभरात राबवण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डची स्थापना केली. या अंतर्गत अमूलला जागतिक बँकेकडून कर्ज देखील मंजूर करण्यात आले.

परिणामी एक करोडपेक्षा जास्त ऑपरेटर आणि पाच लाखापेक्षाही जास्त दुग्ध उत्पादक शेतकरी अमूल परिवाराला जोडले गेले. भारतामध्ये दुग्ध क्रांतीची सुरुवात झाली.

भारतातील पहिली दूध पावडर बनवण्याचा मान देखील अमूलकडे जातो. दूध, दुधाचे पदार्थ, तूप, चीज, लोणी, आईस्क्रीम, दूध पावडर, टेट्रापॅक अशी अमूलने आपल्या उत्पादनांची रेंज नंतर भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवली. नंतर अनेक डेअरी भारतामध्ये सुरू झाल्या. बाजारामध्ये अमूलला तगडी कॉम्पिटिशन उभी राहिली. परंतु या सर्वांवर मात करून अमूल स्पर्धेमध्ये कायम अव्वल स्थानावर टिकून राहिला.

अमूलच्या जेवढ्या जाहिराती टीव्हीवर आल्या त्या सगळ्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. “The taste of India” हे अमूलचे कायमस्वरूपी स्लोगन. स्वदेशीचा अभिमान त्यातून झळकलेला दिसतो. सगळ्यात पहिल्यांदा अमूलने आपल्या जाहिराती मोठ्या शहरातील होर्डिंगवर झळकवायला व्हायला सुरुवात केलेली होती.

चटपटीत चालू घडामोडीवर भाष्य करणारी एक लाईन आणि अमूल बटरचे स्लाईस घेउन उभी असलेली गोंडस अमूल गर्ल असे याचे स्वरूप असायचे. या होर्डिंगवर अमूलच्या बाकीच्या उत्पादनाची देखील माहिती दिली जात असे.

त्यानंतर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन टीव्हीवरची अमूलच्या जाहिराती गाजल्या त्यातील एक ह्रदयस्पर्शी जाहिरात म्हणजे मंथन.

ही जाहिरात करण्यामागे अमूलचा खास उद्देश होता. अमूलने आपल्या जाहिरातींमध्ये कधीही खूप मोठे मोठे कलाकार वापरले नाहीत देशी ब्रँड असल्यामुळे त्यांनी कायमच सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून जाहिराती केल्या.

पुढे अमूलला मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झालेली होती. परदेशामधील चकचकीत ब्रँड अमूलला टक्कर देण्यासाठी बाजारामध्ये उतरले. त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी, पॅकेजिंग, जाहिराती यांच्या तुलनेत अमूल कमी पडू लागलं.

अमूलचे पॅकेजिंग खूप जास्त आकर्षक असायचे अशातला भाग नाही. त्यांच्या पदार्थांचा दर्जा आणि गुणवत्ता चांगलीच असायची परंतु बाह्य रूपावर अमूलने जास्त लक्ष दिले नव्हते. आता लोकांना इतर उत्पादनांच्या तुलनेत अमूलचे उत्पादन का वेगळे आहे हे समजावून सांगण्याची जबाबदारी अमूलच्या मार्केटिंग टीमवर येऊन पडली होती.

त्यासाठी एक वेगळ्या प्रकारची जाहिरात करण्याचे अमूलने ठरवले. 1976 साली आलेल्या मंथन चित्रपटातील काही फुटेज अमूलने आपल्या जाहिरातीसाठी वापरले. आता चित्रपटाचे फुटेज जाहिरातीमध्ये का वापरले याचेही खास कारण होते.

मंथन हा स्मिता पाटील-गिरीश कर्नाड यांची प्रमुख भूमिका असलेला आणि दिग्दर्शक शाम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट अमूलच्या निर्मितीवर आणि त्याच्या प्रवासावर आधारित होता.

कुठल्याही सहकारी संस्थेवर चित्रपट निर्माण व्हावा हे भाग्य फक्त अमुलच्या वाट्याला आले. या चित्रपटात डॉ. वर्गीस कुरीयन यांच्या भूमिकेवर आधारित गिरीश कर्नाड यांचे पात्र रंगवले गेले होते. अमूलचा प्रत्यक्ष प्रवास या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला होता. मंथनने 1977 सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

या चित्रपटातील दृश्य वापरून अमूलने आपली मंथनची जाहिरात बनवली होती. या जाहिरातीमध्ये चित्रपटातील चित्रीत करण्यात आलेले “मेरा गाव काठाबाडी” हे गाणे जसेच्या तसे घेण्यात आले होते. साधारणत: जाहिरातीमध्ये चित्रपटातील दृश्य अशाप्रकारे घेतली होती ज्यातून अमूलच्या निर्मितीपासून आत्तापर्यंतचा प्रवास उलगडला जावा.

ही जाहिरात अमूलसाठी एक मैलाचा दगड ठरली. लोकांनी या जाहिरातीला खूप पसंत केले.

जाहिरातींच्या शेवटी अमुलचे कर्तुत्व काही ओळींमधून दाखविण्यात आलेले होते ज्याच्यामध्ये असे लिहिलेले होते की-

तेरा हजारांपेक्षा जास्त गावातील 27 लाख महिला रोज 20 करोड रुपये इतक्या किमतीचे दूध घेऊन अमूलला देतात. आज त्या महिला आर्थिकरित्या संपूर्ण स्वावलंबी आहेत याचे सगळे श्रेय अमूलला जाते.

जाहिरातीची ही शेवटची स्लाईड मोठे काम करून गेली. भारतामध्ये इतर दूध उत्पादक कंपन्या असतीलही परंतु अमूलचे योगदान काय आहे ते लोकांना या जाहिरातीमुळे समजले.

अमुल चे हे कर्तुत्व पाहताना अमूल बद्दल अभिमान नाही वाटला तर नवलच. आजही ही अमूल मंथन ची जाहिरात करोडो भारतीयांच्या हृदयातील अविस्मरणीय जाहिरात बनून राहिली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!