हवाई दलात पायलट म्हणून नाकारले गेल्याने कलाम भारताचे मिसाईल मॅन बनू शकले

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याविषयी देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आणि आदर आहे. मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलामांनी अखेरपर्यंत विद्यादानाचे व्रत सोडले नाही. त्यांनी अखेरचा श्वास घेतला तो ही कर्मरत असतानाच.

शिलॉंगच्या आयआयटी शिक्षण संस्थेत व्याख्यान देत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना आयसीयुत दाखल केले. पण, काही क्षणातच डॉक्टरांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. देशाप्रती आणि देशाच्या भविष्याप्रती त्यांचे हे समर्पण पाहून भारावल्या वाचून राहत नाही.

भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कलामांनी शिक्षणासाठी केलेला संघर्षही तितकाच प्रेरणादायी आहे. हा सगळा संघर्षाचा काळ केवळ त्यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या, प्रतिभेच्या आणि आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीच्या आधारानेच पार केला.

देशाचा पहिला उपग्रह प्रक्षेपित करण्यापासून ते इस्रोला आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळवू देईपर्यंतच्या या वाटचालीत अब्दुल कलाम यांचा सिंहाचा वाटा आहे.

तामिळनाडूतील रामेश्वरम् सारख्या एक छोट्याशा गावातील कलामांनी इस्रोला आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी संस्थांच्या यादीत स्थान मिळवून दिले. त्यांनी अग्नी आणि पृथ्वीसारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे निर्माण करून भारताची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली.

एसएलव्ही-३ सारख्या उपग्रह प्रक्षेपण यानाच्या निर्मितीतून अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचे नाव उंचावले. इस्रोमध्ये प्रकल्प संचालक असताना त्यांनी अवकाश संशोधन आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या प्रकल्पांना एक नवी उंची मिळवून दिली.

शालेय जीवनापासूनच कलाम कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांचा जन्म एका गरीब आणि मच्छिमारी करणाऱ्या कुटुंबात झाला होता. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शाळा भरण्यापूर्वी अब्दुल कलाम घरोघरी जाऊन पेपर टाकत असत.

गणित आणि भौतिकशास्त्रात त्यांना लहानपणापासूनच रस होता. भारतीय हवाई सेनेत जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणीच पहिले होते. म्हणूनच त्यांनी एअरोस्पेस इंजिनियरिंगमधून उच्चशिक्षण पूर्ण केले. कलाम सरांनी भारतीय हवाई दलाच्या परीक्षेचा फॉर्म देखील भरला होता.

या परीक्षेसाठी फक्त २५ उमेदवारांनी अर्ज केला होता आणि यातील फक्त ८ उमेदवारांची निवड करायची होती. परंतु परीक्षेचा निकाल लागला तेंव्हा अब्दुल कलाम नवव्या स्थानावर होते.

एका स्थानाने त्यांचे स्वप्न हुकले होते. परंतु नियतीच्या मनात त्यांच्यासाठी काही तरी अद्भुत योजना होती, म्हणूनच तर हवाई दलात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. देशासाठी त्यांच्या हातून यापेक्षाही मोठे काम होणार होते.

यानंतर कलाम साहेबांच्या जीवनाला एक नवे वळण मिळाले. त्यांच्या आयुष्यातील याच वळणाने त्यांचेच नाही तर देशाचेही भवितव्य बदलवून टाकले.

भारतीय हवाई दलात जाण्यास अपयशी ठरल्यानंतर त्यांनी इस्रोमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मद्रासच्या इंजीनियरिंग कॉलेजमधून एअरोनॉटिकल सायन्सचे शिक्षण घेतले होते.

इस्रोमध्ये रुजू झाल्यावर त्यांनी इस्रोच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठीच सर्वस्व वाहिले. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान बनवले. याच यानाच्या साहाय्याने त्यांनी रोहिणी हा देशाचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला.

कलाम सरांच्या नेतृत्वाखालीच मिसाईल तंत्रज्ञानावर काम सुरु झाले. त्याकाळी संपूर्ण जगात संरक्षण आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात वेगाने बदल घडत होते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनव्या शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जात होती.

मिसाईल तंत्रज्ञान असणारा देश हाच सर्वात जास्त शक्तिशाली देश असे समीकरण रूढ झाले होते. भारतात मात्र त्यावेळी मिसाईल तंत्रज्ञान नव्हते.

इतर कुठल्याही देशाला भारताशी मिसाईल तंत्रज्ञानाशी संबधित करार करायचा नव्हता. अशावेळी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करण्यावाचून भारतापुढे कोणताच पर्याय नव्हता. मग कलामांनीच या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि याचे नेतृत्वही. त्यांच्या अथक परिश्रमाने, झपाटून केलेल्या प्रयत्नाने आणि त्यांच्या अगाध प्रतिभेने या कार्यक्रमात भारताला अभूतपूर्व यश मिळाले देखील.

भारताने मिळवलेल्या या यशाने देशाची सुरक्षा व्यवस्था तर मजबूत झालीच पण, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे ‘पृथ्वी’, जमिनीतून हवेत मारा करणारे ‘त्रिशूल’ आणि टँकवर मारा करणारे ‘नाग’ अशी तीन क्षेपणास्त्रे निर्माण करण्यात आली. केवढी ही जिद्द, केवढे हे परिश्रम आणि केवढी ती चिकाटी!

या प्रकल्पाने जगाला दाखवून दिले भारत कुठल्याही बाबतीत मागे नाही. देशाला एकामागून एक क्षेपणास्त्रांची भेट देणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांना मिसाईल मॅन ही पदवी देण्यात आली.

१९९२ पासून १९९९पर्यंत एपीजे अब्दुल कलाम हे देशाच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. याच दरम्यान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, पोखरण येथे भारताने अणू चाचणी केली. भारत या अणूचाचणीतही उत्तीर्ण झाला.

कलाम यांच्याच प्रयत्नाने आणि संकल्पामुळे भारत अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत जाऊन बसला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात या सर्वच प्रकल्पांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. आज देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो मानमरातब आहे, त्याला कलामांची ही संशोधने कारणीभूत आहेत. ज्यांनी देशाला संरक्षणाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवले.

२००२ मध्ये जेंव्हा राष्ट्रपती पदासाठी एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाची शिफारस करण्यात आली तेंव्हा सर्व राजकीय पक्षांनी यावर बिनविरोध संमती दर्शवली. एकाही पक्षाने या नावाला हरकत घेतली नाही.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे इतके बहुमत नव्हते की ते आपल्या इच्छ्ने राष्ट्रपतीची निवड करू शकतील. यावेळी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी राष्ट्रपती पदासाठी अब्दुल कलाम यांचे नाव सुचवले. वाजपेयी सरकारनेही याच नावावर शिक्कामोर्तब केले.

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोनिया गांधींनी देखील यावर आपली सहमती दर्शवली. डाव्या पक्षांचाही एपीजे अब्दुल कलामांनाच पाठींबा होता. आणि अब्दुल कलाम देशाचे ११वे राष्ट्रपती निवडले गेले. देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली.

नियतीने त्यांच्यासाठी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले होते. राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यावर त्यांनी देशातील तरुणांशी जोडून घेण्याचा विडा उचलला.

अनेक तरुणांच्या पंखात कल्पनेच्या भरारी घेण्याचे बळ भरले. आज एपीजे अब्दुल कलाम आपल्यात नसले तरी, अग्निपंख या त्यांच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून ते आजही देशाच्या तरुणाईला आपल्या पंखात बळ भरण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!