आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तंत्रज्ञानाच्या प्रगतीने बऱ्याच गोष्टी सुलभ झाल्या आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. अगदी संपूर्ण पृथ्वीचे रुपांतर ग्लोबल व्हिलेजमध्ये होण्यास तंत्रज्ञानाच्या या वेगवान प्रगतीचा वाटा मोठा आहे. अर्थात, नेमक्या कोणत्या सुविधेमुळे आजच्या जीवनशैलीत इतका प्रचंड बदल झाला आहे, यावरून वाद घालायचा म्हटले तर, सगळा गोंधळच उडेल.
पण, कार्यालयीन कामे अतिजलद करण्यात मदत करणाऱ्या कम्प्युटरने आयुष्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात घडवून आणलेली क्रांती कुणीही नाकारणार नाही. जागतीकीकरणाच्या युगात खाजगी व्यावसायिक आणि अर्थातच शासकीय कार्यालयांच्या, देखील सगळ्यात फायद्याची ठरलेली बाब म्हणजे कम्प्युटर.
कम्प्युटरचा शोध ही १९व्या शतकातील एक अद्भुत क्रांती होती. अर्थात सर्वात पहिला कम्प्युटरचा शोध आयबीएमने लावला असाही काहींचा दावा आहे तर, काही असे मानतात की पर्सनल कम्प्युटरचा शोध त्याच्या आधीचा आहे. अर्थात, आयबीएमने पहिल्यांदा अमेरिकन कार्पोरेट क्षेत्रात या तंत्रज्ञानाच्या वापरासाठीचे कायदेशीर मार्ग खुले केले ही बाब वेगळी.
पण, कम्पुटरचाही शोध लागण्यापूर्वी १९६० च्या आसपास झेरॉक्सने देखील काही काळ कार्यालयीन कामकाज सुरळीत करण्यास मदत केली होती. उलट, अमेरिकेत तर त्याकाळी याला व्यावसायिक भांडवलाचा अत्यंत चांगला परतावा देणारे, मशीन म्हणून ओळखले जायचे.
अर्थात, झेरॉक्सचा शोध लागण्यापूर्वी कागदपत्रांच्या प्रती बनवण्यासाठी कार्बन पेपरचा वापर करावा लागे, ज्यात भरपूर वेळ तर खर्च होत असेच, पण पाहिजे तसा रिझल्ट देखील मिळत नसे. शिवाय, तासनतास हाताची शाई घालवण्यातच जायचा, म्हणून झेरॉक्सचा शोध, हे त्याकाळी एक वरदानच होते. कित्येक कंपन्यांसाठी झेरॉक्स म्हणजे एकप्रकारे पैसा छापण्याचेच यंत्र होते.
झेरॉक्सच्याच टीमने झेरॉक्सपेक्षा पेपरलेस काम करण्यावर भर दिला. आणि यादृष्टीने त्यांनी संशोधन सुरु ठेवले. यातून आजच्या पर्सनल कम्प्युटरची निर्मिती झाली. कारण, कार्यालयीन कामे जितकी सोपी होतील आणि पेपरलेस होतील तितका कामाच्या दर्जा सुधारेल याची झेरॉक्सला खात्री होती.
आणि पुढच्या स्पर्धेत टिकून राहायचे तर असे काही केलेच पाहिजे अशी त्यांची धारणा होती. पार्कमध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञांना खुलेपणे आपल्या कल्पना मांडण्याची आणि त्यावर विचार मंथन करून निष्कर्ष काढण्याची मुभा होती.
अर्थात, याचवेळी जपानीज कंपन्या देखील झेरॉक्सचे अद्यावत तंत्रज्ञान आपल्याला भारी पडेल अशी त्यांची धारणा होती. अर्थात, नव्या कल्पना मांडण आणि सर्वजण मिळून त्यावर काम कारण, यामुळे या कंपनीच्या कर्मचार्याना यात फारशी अडचण आली नाही. याच वातावरणात कंपनीने पालो आल्टो रिसर्च सेंटरची स्थापना झाली.
साठ आणि सत्तरच्या दशकात झेरॉक्सच्या पालो अल्टो रिसर्च कंपनीने (पार्क) कल्पनाही करवली नसेल अशा मशीनची निर्मिती केली. ज्याला खऱ्या अर्थाने पहिला पीसी देखील म्हणता येईल.
या मशीनला इथरनेट नेटवर्किंग, ग्राफिकल युजर इंटरफेस, आयकॉन्स, बीट मॅपिंग, स्केलेबल टाइप, एक माउस, लेजर प्रिंटर, अशा अनेक सुविधा होत्या. झेरॉक्सच्या व्यवस्थापकांनी याबाबत काय केल असेल? तर त्यांनी त्या वस्तूचे हक्क हरवले.
त्यांनी याचा वापर फक्त पैसे मिळवण्यासाठी केला. ते ही वस्तू थेट न विकता भाड्याने वापरायला देत. आणि या मशीनच्या सहाय्याने तुम्ही जितक्या कॉपीज बनवल्या तेवढ्याचे पैसे द्यावे लागत असत. अर्थात अशा प्रकारे फक्त पैसे कमावणे यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आणि याचे पेटंट इतरांना उपलब्ध होईपर्यंत तरी हे मशीन म्हणजे सोन्याची खाण होती.
अगदी जे स्क्रीनवर दिसते, ते जसेच्या तसे प्रिंट करण्याची क्षमता यामध्ये होती. कम्प्युटर आणि मानव यांच्यातील संप्रेषण सुलभ बनवत, प्रत्येकाला सहज हाताळता येईल अशा पद्धतीने याची रचना करण्यात आली.
अगदी लहान मुलांना देखील याचा सुलभपणे वापर करता येईल इतके हे तंत्रज्ञान सोपे होते. १९७२ साली झेरॉक्सने आपले पहिले डेस्कटॉप कम्पुटर बाजारात आणले. झेरॉक्सच्या पालो अल्टो या होम सिटीवरूनच या मशीनला अल्टो असे नाव देण्यात आले. या मशीनने विंडो आणि माउस आधारित कार्यपद्धतीची जगाला ओळख करून दिली. जी आज मोठ्या प्रमाणात आणि सर्रास वापरली जाते. सुरुवातीला हे मशीन मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होऊ शकले नाही.
पार्कच्या या सर्वात किमती मशीनचा फायदा झाला तो स्टीव्ह जॉब्जला. झेरोक्सने ऍपलच्या या राजाला पार्कमध्ये एकदा भेट देण्यास मंजुरी दिली. आणि या भेटीत त्यांनी आपल्या नव्या संशोधनाबाबतची बरीच माहिती स्टीव्ह जॉब्जला दिली. स्टीव्हने या माहितीच्या नोंदी स्वतःजवळ ठेवल्या. काही महिन्यातच जॉब्जने पार्क मधील काही बुद्धिमान प्रोग्रामरना आपल्या कंपनीत काम दिले आणि लिसा सारखा एक प्रोग्राम बनवून घेतला.
लिसा हे मॅकच्या आधीचे व्हर्जन होते. अर्थात, असे म्हटले जाते की, यासाठीच्या सगळ्या कल्पना स्टीव्हने झेरॉक्सच्या त्या पहिल्या अल्टो काम्पुटर कडूनच उचलल्या. म्हणजे मॅक असो किंवा त्याआधी आलेले लिसा या दोन्हींच्या प्रोग्रामिंगची कल्पना स्टीव्ह जॉब्ज किंवा ऍपलच्या प्रोग्रामर्सची नव्हती. ऍपलच्या काही इंजिनियर्सन पार्कच्या (PARC) या नव्या संशोधनाची चांगलीच माहिती होती.
या मशीनचे कार्य आणि माउससारखे तंत्रज्ञान याचीही माहिती त्यांनी घेतली होती. अर्थात, स्टीव्ह जेव्हा पार्क च्या कार्यालयाला भेट देण्यासाठी गेला होता तेव्हा त्याच्यासोबत त्याची टीम देखील होतीच. त्यामुळे अल्टो सारखी मशीन बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत याची नोंद या टीमने स्वत:कडे घेतलीच होती. स्टीव्हसाठी काम करणारे काही इंजिनियर्स तर आधी पार्कमध्ये काम करणारे होते. ज्यामुळे त्यांना याचा चांगला अनुभव होता.
परंतु, ऍपलमध्ये जेंव्हा यावर काम सुरु होते, तेंव्हा झेरॉक्स मधील काम पाहण्यासाठी आपण गेलो होतो, अशी माहिती स्वतः स्टीव्ह जॉब्जने देखील १९९५ साली रोबर्ट एक्स याला एका मुलाखती दरम्यान दिली होती.
ग्राफिकल युजर इंटरफेसच्या सहाय्याने होणारे काम पाहूनच मी इतका अचंबित झालो की त्यानंतर मी नेमके काय पहिले हे देखील माझ्या लक्षात आले नाही. माझ्या डोळ्यासमोर फक्त ग्राफिकल युजर इंटरफेस एव्हढंच होतं. या कल्पनेने अक्षरश: माझ्यावर जादू केली होती. एक न एक दिवस सर्व काम्पुटर्स याच पद्धतीने काम करतील एवढाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता.
खरे तर, झेरॉक्सने आपल्या संशोधनाचे वेळीच योग्य ते मूल्य न जाणल्याने त्यांच्या हातून ही कल्पना निसटून गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.