आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
नुकताच फत्तेशिकस्त चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा लाल महालातील ऐतिहासिक पराक्रमाची गाथा या चित्रपटात करण्यात आली असून या माध्यमातून शिवरायांचा काळ पुन्हा रुपेरी पडद्याच्या माध्यमातून समोर आणला जाणार आहे.
फत्तेशिकस्तचे चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या अगोदर त्यांनी फर्जंद चित्रपटाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास समोर आणला होता. आता फत्तेशिकस्तच्या माध्यमातून शिवप्रताप जगासमोर आणत आहेत.
या फत्तेशिकस्त चित्रपटाचं मुख्य आकर्षण असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे चिन्मय मांडेलकर यांनी तर राजमाता जिजाबाईंची भूमिका साकारली आहे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी..
मृणाल कुलकर्णी जिजाबाईंची अनेकवेळा भूमिका वठवली आहे, या आधी त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत राजमाता जिजाऊंची भूमिका वठवली होती, तर फर्जंद चित्रपटात देखील त्यांनी जिजाऊंची भूमिका वठवली होती.
मृणाल कुलकर्णी यांना मराठेशाहीचा इतिहासात प्रचंड रस असून त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करियरला सुरुवात देखील ‘स्वामी’ नावाच्या मालिकेतून केली होती, या मालिकेत पेशवा माधवराव यांचा इतिहास चितरण्यात आला होता, यात त्यांनी रमाबाईंची भूमिका केली होती.
त्यावेळी त्या १७ वर्षांच्या होत्या. त्यांनी त्यानंतर अनेक ऐतिहासिक मालिकांत काम केलं. दूरदर्शनवर लागणाऱ्या द ग्रेट मराठा या मराठेशाहीचा इतिहास सांगणाऱ्या मालिकेत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिका वठवली होती. त्यांनी द्रौपदीची भूमिका देखील साकारली आहे.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी २०१४ साली रमा माधव या चित्रपटाचे दिगदर्शन केले. त्यांनी त्या चित्रपटात पार्वतीबाईंची भूमिका देखील साकारली होती. अश्याप्रकारे मृणाल कुलकर्णी यांना ऐतिहासिक मालिकांप्रति प्रेम आहे.
विशेषतः मराठा साम्राज्याशी निगडित इतिहासावर त्यांची विशेष माया आहे. हे असे का आहे याचे कारण मृणाल कुलकर्णी यांच्या जडणघडणीत दडले आहे.
मृणाल कुलकर्णी यांच्या आजोबांचे त्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक गो.नि. दांडेकर हे मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा असून, त्यांचा शिवप्रेमाबद्दल व दुर्गप्रेमाबद्दल महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही.
गो.नि. दांडेकरांनी गडकिल्ल्यांवर आणि त्यांच्या प्रवासावर विपुल लेखन केले आहे. त्यांची पुस्तकं आजदेखील हौशी दुर्गभ्रमण करणाऱ्या लोकांना एका मार्गदर्शक पुस्तिकेसारखी वाटतात. गडकोटांच्या इतिहासाला समजून घेण्यासाठी गो.नि. दांडेकरांशिवाय पर्याय नाही.
गडकिल्ल्यांवर असलेल्या अगदी बारीक सारीक गोष्टींचे निरीक्षण करून त्या बद्दल अगदी विपुल लेखन गो.नि. दांडेकरांनी केलं आहे. त्यांच्या प्रवासावर आधारित असंख्य ललिताकृतींना जन्म दिला आहे.
गो.नि. दांडेकरांच्या अश्याच एका साहित्याकृतीत मृणाल कुलकर्णी यांच्या शिवप्रेमाचे धागे उलगडत जातात. गो.नि.दांडेकरांनी लिहलेल्या ‘दुर्गभ्रमणगाथा’ या पुस्तकात त्यांच्या मुलीच्या गर्भधारणेच्या काळात रायगड दुर्गाच्या केलेल्या भ्रमंतीची कहाणी लिहली आहे.
त्यांची पुत्री सहा महिन्यांची गर्भवती असतांना तिला गो.नि. दांडेकर रायगडावर घेऊन गेले होते. पुढे त्यांच्या मुलीने मुलीला जन्म दिला. ती मुलगी म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी होय.
या प्रसंगावरून तुम्हाला लक्षात येईल कि अभिनेत्री मृणाल कुलकर्णींवर गर्भात असतांनाच शिवप्रेमाचे व मराठयांच्या इतिहासाचे संस्कार झाले आहेत, शिवाय मृणाल कुलकर्णी यांना बालपणापासूनच दुर्गभ्रमंतीचं वेड त्यांचे आजोबा गो.नि. दांडेकरांनी लावलं.
‘दुर्गभ्रमण’ गाथा या पुस्तकात व त्यांच्या इतरही काही पुस्तकात गो.नि.दांडेकरांनी मृणाल कुलकर्णींच्या बालपणी त्यांना बरोबर घेऊन केलेल्या गडकिल्ल्यांच्या सफरीचे वर्णन करून ठेवले आहे.
गो.नि.दांडेकरांच्या छत्रछायेत वाढलेल्या मृणाल कुलकर्णींनी शिवप्रेमाचे मिळालेले बाळकडू नुसतेच जपले नाही, तर त्यांनी त्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले.
अगदी बालपणापासून अभिनयात रस असल्यामुळे त्यांनि विविध छोटेखानी भूमिका साकारल्या आहेत. अशीच भूमिका करतांना ‘स्वामी’ची ऑफार त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी आली आणि त्यांनी आपल्या भूमिकेने माधवरावांच्या प्राणप्रिय पत्नी असलेल्या रमाबाईंची भूमिका अगदी जिवंत केली.
तेव्हापासून आजवर त्यांनी अनेक ऐतिहासिक मालिकेत निरनिराळ्या भूमिका वठवल्या, त्यांनी सोनपरी या काल्पनिक मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत साकारलेल्या राजमाता जिजाबाईंच्या भूमिकेमुळे त्यांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केलं.
राजमाता जिजाऊंचा उल्लेख आल्यावर मृणाल कुलकर्णींचा चेहरा लोकांच्या डोळ्यासमोर येतो, हेच मृणाल कुलकर्णीचे यश मानायला हवे.
आपाल्या घरातूनच लाभलेल्या शिवचरित्राच्या संस्कारामुळे आज या भूमिका वठवताना विशेष काळजी घेत असल्याचं मत त्यांनी या अगोदर व्यक्त केले होते.
मृणाल कुलकर्णी यांनी बऱ्याचदा आपल्या वेगवेगळ्या मुलाखतीत आपल्या शिवप्रेमाच्या स्रोताचा उल्लेख करताना आपले आजोबा गो.नि. दांडेकर आणि आई वीणा देव यांना श्रेय दिले आहे.
मृणाल कुलकर्णीं त्यांच्या येऊ घातलेल्या फत्तेशिकस्त या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेची माहिती देताना देखील प्रत्येकाने शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंगातुन प्रेरणा घ्यायाला हवी आणि जिजाबाईंच्या भूमिकेतून स्वतःला वैयक्तिक प्रचंड स्फूर्ती मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तर अशी हि गुणी अभिनेत्री फत्तेशिकस्त चित्रपटाच्या माध्यमातुन जिजाबाईच्या भूमिकेत आपल्या भेटीला येत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.