भारत-चीन युद्धामुळे रतन टाटांचे लग्न होता होता राहिले

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


टाटा कंपनीची इंडिका कार बाजारात येऊन एक वर्ष झाले होते पण, या कारला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. कंपनीला कारपासुन काही खास फायदा होत नसल्याने रतन टाटा या कारपासून आपली सुटका करून घेण्याचा विचार करत होते.

टाटा कंपनीचे कार व्हेंचर विकण्याची बातमी अमेरिकेपर्यंत पोहोचली. अमेरिकेच्या फोर्ड कंपनीने टाटांचे हे कार व्हेंचर खरेदी करण्यात रस दाखवला. टाटा आणि फोर्ड्सचे अधिकारी यांच्यात बैठका सुरु झाल्या. पहिली मिटिंग मुंबईमध्येच झाली आणि दुसऱ्या मिटिंगसाठी टाटा अमेरिकेत डेट्रॉयट येथे असणाऱ्या फोर्डच्या मुख्यालयात गेले.

डेट्रॉयटमध्ये गेल्यावर त्यांना जाणवले की, फोर्डच्या अधिकाऱ्यांची वर्तणूक अतिशय उद्दामपणाची आहे. त्यांना आपल्या वर्तनातून असे दाखवून द्यायचे होते की, टाटांचे हे कार व्हेंचर खरेदी करून फोर्ड त्यांच्यावर उपकार करत आहे.

फोर्डचा एक अधिकारी टाटांना म्हणाला देखील, “तुम्ही या व्यवसायात शिरलातच कशासाठी? तुमचा हा तोट्यातील व्यवसाय विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकारच करतोय लक्षात घ्या.” टाटांना ही टिप्पणी चांगलीच झोंबली. ते डेट्रॉयटमधून काहीसे नाराज होऊनच परत आले आणि परत येताच त्यांनी तो व्यवहार रद्द केला.

यानंतर टाटांनी आपली कार कंपनीच्या भरभराटीवर जास्त लक्ष दिले. नऊ वर्षांनी टाटांना फोर्डला उत्तर देण्याची संधी मिळाली. २००८ मध्ये फोर्ड कंपनीचे दिवाळे निघाले. अमेरिकेच्या कार सेक्टरमध्ये फोर्डची अवस्था अगदी नामशेष होण्याच्या स्थितीस पोहोचली होती. तेंव्हा टाटा ग्रुपने फोर्डचे जग्वार आणि लँडरोवर हे दोन ब्रँड्स विकत घेतले. हा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बिल फोर्ड स्वतः टाटांना म्हणाले, “जेएलआर विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले आहेत.”

आपल्या कामातून आपली उंची दाखवून देणारे रतन टाटा हे भारतातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. टाटा उद्योग समूहाच्या देशविदेशात भरपूर कंपन्या आहेत. भारतात मिठापासून गाडीपर्यंतची उत्पादने बनवणाऱ्या टाटा कंपनीचे मालक असूनही रतन टाटा यांचे नाव कधीच जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झळकताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे रतन टाटा आपल्या उत्पन्नातील ६५% भाग दान देऊन टाकतात. त्यांच्या कंपनीला जो काही फायदा होतो त्यातील काही भाग ते समाज कल्याणाच्या कामासाठी वापरतात. हा पैसा त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा होत नाही.

रतन टाटा यांची खाजगी संपत्ती फक्त १००कोटी रुपये इतकी आहे.

८२ वर्षांच्या रतन टाटांनी नव्या पिढीशी जोडून घेण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. गेल्याच वर्षी म्हणजे २०१९च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपले इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले.

#ThrowbackThursday या हॅशटॅग वापरत त्यांनी आपल्या तरुण वयातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

#ThrowbackThursday हा सध्या इंटरनेटवरील एक लोकप्रिय ट्रेंड आहे. ज्यात अनेकजण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्या फोटोखालील कॅप्शनमध्ये त्यांनी हा फोटो म्हणजे लॉस एंजिलीसमधील आठवणी आहेत असे लिहिले आहे.

भारतात टाटा कंपनीची सूत्रे सांभाळण्यापूर्वी काही काळ अगोदर ते लॉस एंजिलीसमध्ये नोकरी करत होते. इन्स्टावरील त्यांच्या फॅन्सनी या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली आहे. त्यांच्या या फोटोखाली बऱ्याच जणांनी त्यांनी कायम स्वरूपी भारतात येण्याचा निर्णय घेतला याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या फोटोला लाखो लोकांनी लाइक केले आहे. रतन टाटा १९६२ मध्ये भारतात परत आले.

त्यांच्या या फोटोवर एका इन्स्टायुजरने, ‘तुम्ही तर ग्रीक गॉडसारखे दिसत होता,’ अशीही कमेंट केली आहे. तरुणपणीच्या रतन टाटांचा हा फोटो पाहिल्यानंतर ग्रीक गॉडची आठवण होणे अपरिहार्यच आहे.

 

रतन टाटा आजन्म अविवाहित राहिले. परंतु एकदा एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते स्वतः म्हणाले होते की, “एकदा तर माझे लग्न अगदी जुळूनच आले होते. पण, होता होता राहिले. तेंव्हा मी अमेरिकेत होतो. त्यावेळी माझ्या आजीने मला अचानक फोन करून भारतात येण्यास सांगितले. नेमके त्याच वेळी भारत चीन युद्ध सुरु होते. त्यामुळे मी भारतात परत येऊ शकलो नाही. माझ्यासाठी जी मुलगी माझ्या आजीने पहिली होती, तिचे लग्न दुसरीकडे झाले. अशाप्रकारे माझे लग्न होता होता राहिले.”

परंतु त्यावेळी जे स्थळ टाटांना आले होते, त्या मुलीशी नंतर काही कामानिमित्त त्यांची ओळख झाली. आजही त्यांच्यातील मैत्री टिकून असल्याचे ते सांगतात.

रतन टाटांचे कुत्र्यांवर प्रचंड प्रेम आहे. त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद आहे. सध्या त्यांनी कुत्र्यांसाठी एक हॉस्पिटल बनवण्याचे मनावर घेतले आहे. त्यांच्या घरी दोन जर्मन शेफर्ड आहेत. दिल्लीत त्यांना कुत्र्यांसाठी हॉस्पिटल बनवायचे आहे.

२६/११च्या वेळी दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलला आपले लक्ष्य बनवले होते. मुंबईतील या फाइव्ह स्टार हॉटेलमधील परदेशी पर्यटक मारले गेले. एनएसजी कमांडो आणि पोलिसांच्या धाडसाने ताज हॉटेल मधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आहे. यावेळी उद्योगपती टाटा यांच्यातील एक श्रीमंत माणूस पाहायला मिळाला होता.

त्यांच्या हॉटेलमध्ये जितके लोक जखमी झाले होते त्या सर्वांवर त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्येच उपचार करवून घेतले. या उपचारा दरम्यान ते या लोकांची चौकशी करण्यासाठी स्वतःहून हॉस्पिटलला भेट देत असत.

शिवाय, या हॉटेलच्या आसपास जे पावभाजी आणि मासे विक्री करणारे छोटे गाडेवाले होते. त्यांच्यावरही या हल्ल्याचा विपरीत परिणाम झाला होता. रतन टाटांनी त्या लोकांनाही पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली. एका गाडीवाल्याच्या छोट्या मुलीला दहा गोळ्या लागल्या होत्या. तिच्या उपचाराचा सर्व खर्च टाटांनी स्वतः उचलला. या हल्ल्यानंतर जितके दिवस हॉटेल बंद होते तितक्या दिवसांचा पूर्ण पगार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला होता.

टाटा कंपनीतील नोकरी म्हणजे सरकारी नोकरीच असे समजले जाते. सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना ज्या काही सेवा मिळतात त्या टाटामधील कर्मचाऱ्यांनाही दिल्या जातात. ताज हॉटेलमधले कर्मचारी हल्ला झाल्यानंतर हॉटेल सोडून पळून गेले नव्हते. तर हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांनी पूर्ण मदत केली होती. यावरूनच त्यांची कशी काळजी घेतली जाते आणि त्यांना आपल्या कंपनीवर किती विश्वास आहे, याची प्रचीती येते. टाटांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली होती. जिथे महाराष्ट्र सरकारच्या नुकसान भरपाईसाठी लोकांना शासनाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले होते.

टाटा कंपनीमधून ज्यावेळी रतन टाटांनी आपल्या करिअरची सुरुवात केली त्यावेळी ते कुठल्याही वरिष्ठ पदावरून सहज सुरुवात करू शकले असते. पण, कंपनीतील कामगारांची अवस्था काय असते हे त्यांच्यासोबत काम केल्याशिवाय समजणार नाही. म्हणून त्यांनी कामगारांसोबत काम केले.

कामगारांचे जीवन काय असते आणि त्यांना आपली कंपनी उभी करण्यासाठी कोणकोणती कामे करावी लागतात हे पाहण्यासाठी त्यांनी कामगारांपासून सुरुवात केली. म्हणूनच तर उद्योगपती टाटांना २१ वर्षाच्या करिअरमध्ये टाटा कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणे शक्य झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!