सर सी व्ही रमन यांना नोबेल जिंकण्याची इतकी खात्री होती की त्यांनी चार महिने आधीच स्वीडनचं तिकीट काढलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी जागतिक पातळीवर भारतचं नाव उंचावलं आहे. त्यात डॉ. होमी भाभा, डॉ. चंद्रशेखर सुब्रमण्यम, डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबतच सगळ्यात वर नाव येतं ते चंद्रशेखर व्यंकटरमन (सर सी. व्ही रमन) या भौतिकशास्त्रज्ञाचं. त्यांचा शोध रमन इफेक्ट म्हणून ओळखला जातो, यासाठी त्यांना १९३० साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विज्ञानात नोबेल पुरस्कार पटकावणारे ते पहिले भारतीय होते.

त्यांचा रमन इफेक्ट आजही वैज्ञानिक क्षेत्रात वापरला जातो. भारताने चंद्रावर पाण्याच्या शोधासाठी अंतराळ मोहिम काढली होती, ती रमन स्पेक्ट्रोस्कोपीवरच आधारित होती. फॉरेन्सिक सायन्समध्येही रमन इफेक्टचा खूप उपयोग होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

आज या लेखाच्या माध्यमातून सर सी. व्ही रमन यांच्या जीवनाबद्दल अजून माहिती जाणून घेऊया..

सर चंद्रशेखर वेंकट रमन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९८८ रोजी तिरुचिराप्पल्ली, तामिळनाडू इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर रामनाथन अय्यर आणि आईचे नाव पार्वती अम्मल होते. रमन यांचे वडील एस. पी. जी. महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. घरात विज्ञानाचे वातावरण असल्याने रामन यांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती.

रमन हे बालपणापासूनच इतके हुशार होते की वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षीच त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि त्यानंतर मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्यांना आधीपासूनच भौतिकशास्त्रात रस होता. सुट्टीच्या दिवशी जेव्हा ते घरी यायचे तेव्हा आपल्या लहान भावांना विज्ञानाचे प्रयोग करून दाखवत असे जेणेकरून त्यांच्या भावंडाना सुद्धा विज्ञानाची गोडी लागेल.

वयाच्या १८ व्या वर्षी रमन यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला. १९०७ मध्ये, म्हणजेच वयाच्या अवघ्या १९व्या वर्षीच त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांना आपले करियर विज्ञानातच करायचे होते पण घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना कलकत्ताच्या भारतीय वित्त विभागात जनरल अकाउंटंट म्हणून नोकरी लागली. सरकारी नोकरीत एवढा मोठा हुद्द मिळवणारे ते पहिले भारतीय होते. नोकरी करत असताना सुद्धा मोकळ्या वेळात त्यांचे भौतिकशास्त्रात संशोधन सुरूच होते

हळूहळू, रमनच्या संशोधन कार्याची चर्चा होऊ लागली. १९१७ मध्ये कोलकाता विद्यापीठाने त्यांना त्यांच्या विद्यापीठात काम करण्याची संधी दिली. इथे त्यांना पगार कमी होता पण संशोधनाला वेळ देता येईल म्हणून त्यांनी प्राध्यापकाची ही नोकरी कायम ठेवली. विद्यापीठात अध्यापन करता करता ते आपले संशोधनही करत होतेच. त्यांच्या फिजिक्स शिकवण्याच्या पद्धतीवर त्यांचे विद्यार्थीही फार खुश असायचे.

प्रवासादरम्यान त्यांना प्रकाश संशोधनाची प्रेरणा मिळाली या संशोधनामुळे केवळ तेच नाही तर संपूर्ण भारताची जगाला नव्याने ओळख झाली.

ते एकदा जहाजात ब्रिटनला जात होते तेव्हा जहाजाच्या डेकवरुन त्यांना पाण्याचा सुंदर निळा रंग दिसला. तेव्हापासून त्यांना समुद्राच्या पाण्याच्या निळ्या रंगावरील अन्य वैज्ञानिकांच्या स्पष्टीकरणांवर शंका येऊ लागली. जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांनी त्यावर आपले संशोधन सुरू केले.

त्यांनी आकाश आणि समुद्राचा अभ्यास केला. या अभ्यासातून ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की समुद्रामुळे देखील सूर्यप्रकाशाचे विभाजन होते आणि त्यामुळे समुद्राचे पाणी निळे होते. जेव्हा ते आपल्या प्रयोगशाळेत परत आले, तेव्हा रमन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशाच्या अनेक रंगांमध्ये विभाजित होण्यावर संशोधन केले. घन, द्रव आणि वायूमध्ये प्रकाशाचे विभाजन करण्याबद्दल त्यांनी संशोधन चालू ठेवले आणि या संशोधनाला पुढे यश आले.

त्यांचे हे संशोधन आज ‘रमन इफेक्ट’ म्हणून ओळखले जाते.

रमन इफेक्ट असे नमूद करतो की जेव्हा प्रकाश पारदर्शक गोष्टींमधून जातो तेव्हा त्या प्रकाशाची दिशा बदलते. म्हणजेच जेव्हा प्रकाशाची लहर द्रवातून बाहेर येते तेव्हा या प्रकाश लहरींचा काही भाग त्या दिशेने प्रसारित होतो जो येणार्‍या प्रकाश लहरीच्या दिशेपेक्षा वेगळा असतो.

प्रकाश क्षेत्रात संशोधनात्मक काम केल्याबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा मान मिळवणारे रमन हे पहिले भारतीय होते. रमन यांना आपल्याला नोबेल पारितोषिक मिळेल याची फारच खात्री होती. त्यामुळे त्यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच चार महिने आधी स्वीडनला जाण्याचे तिकीट बुक केले होते.

त्यांनी हा शोध २८ फेब्रुवारी १९२८ साली लावला. त्यामुळे दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

आज रमन स्पेक्ट्रोस्कोपी जगभरातील रासायनिक लॅबमध्ये वापरली जाते. वैद्यकीय क्षेत्रात, याचा उपयोग पेशी आणि ऊतींच्या संशोधनासाठी आणि कर्करोगाच्या शोधासाठी केला जातो. ‘चंद्रयान’ या मिशन दरम्यान रमन स्पेक्ट्रोस्कोपीने चंद्रावरील पाणी शोधण्यासही हातभार लावला.

भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिट जारी केले होते. देशाच्या विकासात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने देखील १९५४ मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. २१ नोव्हेंबर १९७० रोजी रमन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि भारताने आपला आपला पहिला नोबेल पुरस्कार विजेता गमावला.

संपूर्ण जग त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल आजही ऋणी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!