आझादांनी ब्रिटीशांच्या डोळ्यात धूळ फेकून अश्फाकउल्ला खानच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील ९ ऑगस्ट १९२५ ही तारीख कायम स्मरणात राहणारी आहे. याच दिवशी काही भारतीय क्रांतिकारकांनी लखनऊपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या काकोरी स्टेशनवर ब्रिटीश सरकारचा खजिना घेऊन जाणाऱ्या मालगाडीला लुटले होते.

हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या १० क्रांतिकारकांच्या टोळीने ही मालगाडी अडवून आणि त्यातून सरकारचा खजिना लुटून पळ काढला. या लुटीने सरकार दरबारी एकच गोंधळ माजला होता. हे एक क्रांतीकारकांनी सरकारला दिलेले आव्हान होते.

काकोरी कटात लुटण्यात आलेल्या संपत्तीची जेव्हा मोजदाद ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केली तेव्हा तो आकडा ४६०१ रुपये इतका निघाला. आज भले ही आकडा इतका मोठा वाटत नसला तरी १९२५ च्या काळात ही रक्कम आजच्या कोटी इतकी होती.

११ ऑगस्ट १९२५ ला लखनऊ पोलिसांच्या कॅप्टनने काकोरी कटावर आपले रिपोर्ट प्रसिद्ध केले. त्या रिपोर्टमध्ये लुटारूंच्या पोषाखाचे वर्णन करण्यात आले होते. ते सर्व खाकी पेंट आणि कुर्ता घालून आले होते. ते तब्बल २५ लोक होते.

त्यांच्या बंदुकीवरून आणि काडतुसावरून ही मंडळी बंगालची असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला होता. बंगालचे क्रांतीकारक अशाच बंदुकीचा वापर करायचे अशी नोंद ब्रिटीश दरबारी होती.

या काकोरी कटामुळे ब्रिटीश सत्तेची मोठी हानी झाली होती. सगळीकडे नाचक्की झाल्याने त्यांच्यावर या कटात सामील असलेल्या आरोपींना पकडण्याचा दबाव होता. तपासादरम्यान ब्रिटीश पोलिसांनी अनेकांना अटक केली. खरंतर या लुटीमध्ये फक्त दहा क्रांतिकारक सहभागी होते पण ब्रिटीश पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले होते. ब्रिटीश सरकार या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून गुन्हेगारांना कठोर दंड देण्यासाठी प्रयत्नशील होते.

काकोरी कटाचा खटला तब्बल १० महिने चालला, या दरम्यान देशभरात क्रांतिकारकांवर चर्चा सुरु झाली होती. १९२२ च्या चौरीचौरा कांडानंतर हा क्रांतिकारकांचा ब्रिटीश राजसत्तेविरोधातील सर्वात मोठा कट होता. सामान्य लोकांच्या मनात क्रांतीकारकांबद्दल कमालीची श्रद्धा होती.

जेव्हा क्रांतिकारकांना तुरुंगात डांबण्यात आले त्यावेळी कॉंग्रेसचे अनेक पुढारी  त्यांना भेटायला गेले होते. नेहरूंनी देखील क्रांतीकारकांची भेट घेतली होती. नेहरूंची इच्छा होती की या क्रांतिकारकांचा खटला गोविंद वल्लभ पंत जे पुढे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, यांनी लढवावा, परंतु पंत यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आणि फीज मुळे हा विषय बारगळला, पुढे बी के चौधरी यांनी या खटल्याला लढवण्याची तयारी दर्शवली व ते हा खटला लढले.

काकोरी कटात क्रांतिकारकांनी फक्त ४६०१ रुपये इतकी रक्कम चोरली होती. त्या ४६०१ रुपयांसाठी ब्रिटीश सरकारने या खटल्यावर १० लाख रुपये खर्च केला. 

न्यायाधीश हेमिल्टन यांनी १६ एप्रिल १९२७ ला या खटल्याचा निकाल दिला, यावेळी आरोपींवर कलम १२१ अ, १२० ब, आणि ३९६ तहत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

न्यायाधीशाने रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंह, अश्फाकउल्ला खान आणि राजेंद्रनाथ लहाडी यांनी फाशीची शिक्षा सुनावली. सचिंद्रनाथ सान्याल यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. मन्मनाथ गुप्ता यांना १४ वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली. तर इतर तिघांना १०, ५ आणि ३ वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला.

कोर्टाच्या या निकालाने देशभरात असंतोष पसरला. ब्रिटीश सरकारच्या विरोधात जनतेने प्रदर्शन सुरु केले. पण ब्रिटीशांनी जनतेला जुमानले नाही.

७ डिसेंबर १९२७ ला सर्वप्रथम राजेंद्रनाथ लोह्डी यांना फाशी देण्यात आली, त्यानंतर १९ डिसेंबरला गोरखपूर जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. ज्यावेळी ते फाशी जात होते त्यावेळी त्यांनी वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. ब्रिटीश साम्राज्याचा अंताची पहाट लवकरच होईल या घोषणेने ते फासावर गेले.

या क्रांतिकारकांचे पार्थिव शहरभर फिरवण्यात आले, अनेकांनी त्यांना साश्रू नयनांनी मानवंदना दिली. यानंतर या कटातील तिसरे आरोपी रोशन सिंह यांना अलहाबाद जेलमध्ये फाशी देण्यात आली. यानंतर फैजाबाद जेलमध्ये अश्फाक उल्ला खान यांना फाशी देण्यात आली.

१९ डिसेंबर रोजी अश्फाकउल्ला खान यांचे पार्थिव रेल्वेने शहाजहापूरला आणले जात होते, त्यावेळी ट्रेन बलमाऊ स्टेशनवर थांबली होती. 

त्यावेळी अचानक एक सूटबूट परिधान केलेली ब्रिटीश सदृश्य व्यक्ती त्या ठिकाणी आली आणि त्यांनी अश्फाक उल्ला खान यांच्या पार्थिवाच्या दर्शनाची परवानगी मागितली, त्या व्यक्तीने पार्थिवाचे दर्शन घेतले आणि क्षणार्धात ती व्यक्ती अदृश्य झाली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद होते. 

ते कधीच ब्रिटीशांच्या हाती लागले नव्हते, अनेक प्रयत्न करून त्यांनी त्यांना २७ फेब्रुवारी १९३१ ला पकडण्याचा प्रयत्न केला होता पण त्या आधीच आझादांनी स्वतःवर गोळी चालवून प्राण त्यागले होते.

काकोरीची ही लूट ही भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. या आणि अशा क्रांतिकारकांनी आयुष्य वेचले म्हणून आज आपण सर्व स्वातंत्र्य उपभोगत आहोत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!