भारतात विकसित केलेलं ‘भाभा कवच’ एके ४७पासूनसुद्धा आपल्या सैनिकांचं रक्षण करणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा झाली आणि अनेक भारतीय कंपन्या नवनवीन उत्पादनं निर्माण करण्यात गुंग झाल्या. त्यातच भर पडली भारतीय सैनिकांच्या सुरक्षा साधनांची. सैनिक दलास लागणारी वाहने, अंगरक्षक कवच, हेल्मेट इत्यादी गोष्टी आता भारतात निर्माण करुन सेनेलासुद्धा पुर्णपणे ‘आत्मनिर्भर’ करण्याचा निर्धार भारतीय कंपन्यांनी केलेला दिसतोय. यातूनच निर्मिती झाली आहे भाभा कवचाची. सैनिकांची रक्षा करणारे हे कवच “मिश्र धातू निगम लिमिटेड” (मिधानि) या कंपनीने निर्माण केले आहे.

आज आपण याच सुरक्षा कवच आणि मिधानिच्या इतर सुरक्षा उत्पादनांचा आढावा घेणार आहोत.

एलएसीवर सतत सुरु असलेल्या भारत-चीन सैन्यातील चकमकींच्या पार्श्वभूमीवर सैनिकांच्या संरक्षणासाठी मिधानी या कंपनीने पूर्णपणे भारतीय निर्मित असलेले भाभा कवच तयार केले आहे. त्याचबरोबर बुलेटप्रुफ वाहनेसुद्धा मिधानी कंपनी तयार करत असुन लवकरच सेनेच्या सेवेत ते हजर होतील.

भाभा आण्विक संशोधन केंद्राने शोधलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले गेले असल्याने या कवचाला ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. हे कवच एके-४७ सारख्या बंदुकीतुन निघालेल्या गोळ्यांपासून सुद्धा सैनिकांचा बचाव करु शकेल.

२०१९ च्या दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पोलिस एक्सपोच्या वेळी या कवचांचे अनावरण करण्यात आले होते. काही कवच आधीच सैन्याकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.

“मोठ्या प्रमाणात हे कवच निर्माण करण्यासाठी लागणारी यंत्रणा आम्ही तयार केली आहे. जगात होणाऱ्या आधुनिक संशोधनांवर आम्ही सतत नजर ठेवणार असुन त्यानुसार या कवचांमध्ये बदल केला जाईल” असे हैदराबाद स्थित असलेल्या मिधानीचे कार्याध्यक्ष संजय कुमार यांनी सांगितले आहे.

भाभा कवचाचे वजनही अतिशय कमी आहे. फक्त ६.८ किलो वजन असलेले हे कवच सामान्यपणे सैन्यात वापरल्या जाणाऱ्या बॅलेस्टीकप्रुफ कवचापेक्षासुद्धा कमी वजनाचे आहे. गुजरातच्या फॉरेंसिक सायन्स महाविद्यालयात घेण्यात आलेल्या चाचणीत हे कवच आपले काम उत्तमपणे पार पाडते हे सिद्ध झाले आहे. भारतातील विविध सुरक्षा व्यवस्थांना हे कवच पडताळणीसाठी पाठवले गेले आहे.

अतिशय लवचिक असलेले हे कवच पॉलीथीलिन पदार्थाचे ४ जाड थर एकत्र बसवून बनवले गेले आहे. बोरॉन कार्बाईड आणि कार्बन नैनोट्यूब पद्धतीचा वापर या कवचाच्या बनावटीत केला गेला आहे.

बुलेटप्रुफ कवच भारतीय मानक संस्थेच्या श्रेणी-६ आणि गृह मंत्रालयाच्या सगळ्या नियमांचे पालन करून बनवले गेले आहे. कवचाला ५ वर्षांची हमी सुद्धा आहे.

फक्त कवचच नाही तर भारतीय सुरक्षा यंत्रणांना अधिक सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी मिधानी अजुन काही साधनांची निर्मिती करत आहे. यात काही सुरक्षा वाहनेसुद्धा आहेत. मिधानीने बनवलेली सुरक्षा वाहने चाकांना गोळी लागल्यानंतरही १०० किमीचे अंतर पार करु शकतील अशा तंत्रज्ञानाने बनवलेली असतील. “रनफ्लॅट टायर” असे नाव असलेल्या या प्रणालीचा वापर करून बनवलेली ही वाहने सैन्याला आणीबाणीच्या परिस्थितीत खुप मदतीची ठरु शकतात. शस्त्र वाहुन नेत असताना त्यात ७ व्यक्ती बसू शकण्याची क्षमता आहे. वाहनाचा उपयोग शीघ्र मदत वाहन, सुटकेच्या वाहनासाठी केला जाऊ शकतो.

भारतातील सर्वात हलके आणि सुरक्षित म्हणुन जाहिरात केले गेलेले हे कवच भारताच्या कंपन्यांनी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत घोषणेला दिलेल्या हाकेचा परीणाम आहे. सरकारकडून योग्य समर्थन मिळाले तर भारताची सुरक्षा पूर्णपणे भारतीय कंपन्याच करु शकतील याची खात्री करून देणारे हे संशोधन आहे. आत्मनिर्भरतेच्या बाबतीत अजुन भरपूर मोठा पल्ला गाठायचा असला तरी ही सुरुवात पुढील भविष्यासाठी आशादायक आहे एवढं नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!