चीनला एकसंध करणाऱ्या या सम्राटाने अमरत्वाचा ध्यास घेतला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज आपल्यासमोर जे चीनचे अजस्त्र साम्राज्य उभे आहे, त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आज आपल्याला जो अवाढव्य चीन नजरेस पडतो, मुळात तो तसा कधीच नव्हता, तिबेट- पूर्व ताजिकिस्तान- दक्षिण मंगोलिया आणि मंचुरीया हा चीनचा साम्राज्याचा भाग कधीच नव्हता.

मूळ चीन हा आकाराने फार लहान होता, त्यातही त्याची अनेक शकलं पडलेली होती. विविध प्रदेशात आणि राजे राजवाड्यात चीन विभागला गेला होता.

या चीनला एका छत्राखाली आणून त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचे काम केले, यिंग झेंग या चिनी सम्राटाने!

यिंग झेंगचा जन्म इसवी सन पूर्व २५९ मध्ये चीनमध्ये झाला आणि त्याने स्वतःला किन शिहुगा ही पदवी बहाल केली. त्याने चीनच्या पहिल्या साम्राज्यावर राज्य करणाऱ्या किन राजघराण्याची स्थापना केली. या राजघराण्याने दीर्घ काळ चीनवर शासन केले.

चीनच्या या पहिल्या सम्राटाला अमरत्वाच्या कल्पनेने इतके वेडावले होते की त्याने त्यासाठी असंख्य प्रयोग आणि अनुष्ठान केले होते, अशी नवीन माहिती पुरातत्व संशोधनातुन समोर आली आहे.

२००० वर्षांपूर्वी लिहलेल्या काही कागदपत्रांच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की यिंग झेंगला संपूर्ण पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित करायचे होते, त्यासाठीच त्याला अमर व्हायचे होते. त्यासाठी त्याने अनेक अघोरी प्रयोग केले होते.

२००२ साली चीनच्या पश्चिम हुनान प्रांतात काही जुने लाकडी कागदपत्रे आढळून आली, ज्यांचावर प्राचीन लिपीत लिखाण करण्यात आले होते. ही कागदपत्रे इसवी सन पूर्व २५९ ते २१० या काळातील होती.

इसवी सन पूर्व २२१ मध्ये यिंग झेंगने आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि इसवी सन पूर्व २१० पर्यंत त्याने चीनवर राज्य केले. त्यामुळे ही कागद पत्रे त्याच्याच काळातील होती.

हुनानच्या पुरातत्व संशोधन विभागाचे प्रमुख झेंग चुलॉंग यांनी या कागदपत्रांवरील ४८ लिप्यांचा सखोल आभ्यास केले असून यात त्यांना किन शिजूआने त्याच्या सैनिकांना ‘अमृता’चा शोध घेण्यासाठी वेळोवेळी आदेश दिल्याचा नोंदी आढळून आल्या आहेत.

तो अशा वनस्पती व औषधींचा शोधात होता ज्या त्याला कायमचे अमरत्व प्रदान करतील.

त्याला त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या छोट्या जहागिरीच्या सरदारांनी अशी कुठलीच अमरत्वाची जडिबुटी नसल्याचे अनेक वेळा कळवले होते तर एकाने एका पहाडावर ती वनस्पती अहे असं बोलून त्याची दिशाभूल केली होती. पण त्याने काही अमर होण्याचे प्रयत्न थांबवले नाही.

यिंग झेंग उर्फ किन शिझुआचा जन्म चीनच्या इतिहासातील अशा कालखंडात झाला होता, ज्यावेळी चीन सात वेगवेगळ्या युद्धप्रवण राज्यांमध्ये विभागला गेला होता. तो त्या राज्यांपैकी एका किन राज्याचा राजा असलेल्या झेंग ऑफ किनचा मुलगा होता.

वयाच्या अवघ्या १३व्या वर्षीच त्याच्यावर साम्राज्याची जबाबदारी येऊन पडली. त्याने ती लीलया पेलली, इतकेच नाहीतर त्याने चीनमधील इतर सहा राजवटींचा पराभव करून सर्व भाग आपल्या अंमलाखाली आणून प्रसिद्ध अशा किन राजगादीची स्थापना केली. हे चीनवर राज्य करणारे पहिले घराणे होते.

किन शिझुआच्या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडले, त्याने स्वतःचे चलन जारी केले. वजन आणि मोजमापाच्या पद्धतीत सुसूत्रता आणली.

त्याच्या काळात चीनमध्ये मोठमोठ्या कुपनलिकांची निर्मिती करण्यात आली. अनेक किल्ले बांधण्यात आले, यांनाच पुढे जोडून चीनच्या प्रसिद्ध भिंतीची निर्मिती करण्यात आली. 

किन राज्याने चीनच्या एकीकरणाबरोबरच चीनमध्ये सुबत्ता आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

त्याच्या अमरत्वाच्या स्वप्नपूर्ततेसाठी त्याने त्याच्या अनेक सरदारांना पौर्वात्य समुद्रात अमृताचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते, पण त्याला अमृताची प्राप्ती झाली नाही. त्याचा अमरत्वाचा ध्यास इतका होता की काही काळाने तो कन्फ्युशियसच्या मूळ तत्वज्ञानापासून दुरावत गेला.

अमरत्वाचा अट्टहास धरून देखील अखेरपर्यंत त्याला अमरत्व मिळवता आलं नाही. पुढे इसवी सन पूर्व २१० मध्ये तो मृत्युमुखी पडला. त्यावेळी देखील त्याचा मृत्यूवर विश्वास नव्हता, त्यासाठीच त्याने हजारो सैनिकांच्या टेराकोटा मूर्त्यांची निर्मिती केली होती.

त्याचे असे मत होते की मानवी देह त्यागल्या नंतर हे टेराकोटाचे शूर योद्धे त्याच्या प्राणाची रक्षा करतील.

आजही चीनमध्ये या टेराकोटा योध्यांचे दर्शन घडते. अनेक इतिहासकार असे देखील मानतात की शत्रुच्या आक्रमणावेळी त्याच्या फौजेला चकमा देण्यासाठी या टेराकोटाच्या सैनिकी मुर्त्या तयार करण्यात आल्या होत्या.

आता या मागे खरं काय ते किन शिझुआला माहिती! पण एक गोष्ट मात्र आजचा आधुनिक चीन देखील याच किन शिझुआच्या पराक्रम गाथेच्या बळावर उभा आहे. चीनच्या अनेक धोरणांवर या सम्राटाच्या राजकारभाराचा मोठा प्रभाव राहिला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!