या जादुगाराने केवळ एका फुग्याच्या साहाय्याने २५००० फुट उंच उडण्याचा विक्रम केला आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जादुगरीचे कौशल्य दाखवणाऱ्या माणसांबद्दल नेहमी कुतूहल असते. ही माणसे अक्षरश: जिवावर बेतणारे स्टंट करतात. त्यांचे स्टंट बघून माणूस हबकतोच. परंतु त्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत आणि त्यांनी घेतलेला धोका हा प्रचंड असतो.

आज अशाच एका अवलिया जादूगाराची आपण माहिती जाणून घेणार आहोत.

या जादूगाराचे नाव आहे डेव्हिड ब्लेन.

न्यूयॉर्क शहराच्या ब्रूकलीन भागात राहणारा हा मुलगा आज एक जगप्रसिद्ध जादूगार म्हणून ओळखला जातो.

याचे बालपण तसे हलाखीत गेले. वडील नसलेल्या त्याला त्याच्या आईने काबाडकष्ट करून वाढवले. वयाच्या चौथ्या वर्षापासून ब्लेनला जादुच्या करामतींमध्ये विलक्षण रस होता. शाळेत असल्यापासूनच ब्लेन स्वतः जादूचे छोटे छोटे प्रयोग आपल्या सवंगड्यांना करून दाखवत असे. त्याच्या आईला त्याचे हे वेड पसंत नव्हते परंतु डेव्हीडचा नाईलाज होता. त्याला जादुगारीसोडली तर बाकी कुठल्याच विषयांमध्ये जास्त प्राविण्य मिळवता आले नाही.

स्वतःचे शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर डेव्हिडने स्वतःच्या आवडत्या विषयाला वाहून घेतले. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्याचा पहिला शो “डेव्हिड ब्लेन – स्ट्रीट मॅजिक” अमेरिकन टेलीव्हिजनवरून प्रसारित झाला. या शोमुळे त्याला खुप प्रसिद्धी मिळाली.

डेव्हिडने अनेक धोकादायक स्टंट केलेले आहेत.

त्याचा पहिला जगप्रसिद्ध स्टंट होता 44 फूट उंच पाण्यावर लटकवलेल्या एका काचेच्या बॉक्समध्ये सतत 44 दिवस काहीही न खाता-पिता झोपून राहणे.

हा स्टंट पाहण्यासाठी झाडून अमेरिकेतले सगळे पत्रकार उपस्थित होते. हा स्टंट कसा करणार? त्याला कोणी चोरून जेवण पाणी देतंय का? या गोष्टीवर पत्रकारांची चौकस नजर होती. अनेक लोक रोज डेव्हिडला प्रोत्साहित करण्यासाठी नदीकाठी जमत असत.

डेव्हिड 44 दिवस काहीही न खाता-पिता आणि न हलता त्या काचेच्या बॉक्समध्ये झोपून राहिलेला होता. त्याच्या हाताशी त्याने फक्त एक बझर ठेवला होता. समजा परिस्थिती बिघडली तर तो बझर दाबल्यानंतर त्याला त्या काचेच्या बॉक्समधून सुरक्षित बाहेर पडता येणार होते.

परंतु डेव्हिडने तो बझर दाबला नाही. त्याने आपला 44 दिवसांचा स्टंट यशस्वीरीत्या पूर्ण केला.

या स्टंटनंतर तो युरोपियन आणि अमेरिकन लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. यानंतर त्याचे स्टंट टीव्हीवर दाखवण्यासाठी त्याला लाखो डॉलर्स ऑफर केले जाऊ लागले. डेविडनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. अत्यंत धोकादायक आणि जोखमीचे स्टंट तो करत राहिला.

याच्या पुढचा अत्यंत धोकादायक असा एक स्टंट डेविडने केला. यावेळी देखील डेव्हिडने स्वतःला एका प्लास्टिकच्या टॅंकमध्ये बंद करून घेतले. टॅंकमध्ये तीन टन पाणी भरले होते. हा पाण्याने भरलेला टॅंक जमिनीखाली गाडला गेला. या टँकमध्ये डेव्हिड संपूर्ण सात दिवस ऑक्सीजन सिलेंडर पाठीवर घेऊन राहिला.

सात दिवस जमिनीखाली प्लास्टिकच्या एका पाण्याचा टँक मध्ये काहीही न खाता-पिता राहणे म्हणजे कमाल होती. याहीवेळी डेव्हिडबरोबर एक बझर देण्यात आला होता.

समजा काही धोका उद्भवला तर त्याला बझर दाबल्यानंतर ताबडतोब बाहेर काढण्याची सोय उपलब्ध होती. परंतु सात दिवस डेव्हिड जमिनीखाली राहिला आणि आठव्या दिवशी तो बाहेर आला.

डेव्हिडचा पुढचा कारनामा होता न्यूयॉर्क सिटीमधील जगप्रसिद्ध अशा टाइम स्क्वेअर चौकामध्ये संपूर्ण बर्फाच्या लादीमध्ये 72 तास उभे राहणे. परंतु इथे डेव्हिड 72 तास पूर्ण करू शकला नाही. टाइम स्क्वेअर चौकामध्ये थंडीच्या दिवसात चारी बाजूंनी बंदिस्त केलेले बर्फाची चौकट तयार करण्यात आली. ज्यामध्ये डेव्हिड तीन दिवस राहणार होता.

मात्र 62 तास झाल्यानंतर डेव्हिडचा संयम संपला आणि त्याला बाहेर यावे लागले. बाहेर आल्यानंतर त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या स्टंटचे परिणाम डेव्हिडच्या शरीरावर दीर्घकाळ राहिले.

डेव्हिडचा अजून एक जगप्रसिद्ध स्टंट म्हणजे संपूर्ण विजेने भारीत असलेल्या जागी तीन दिवस आणि तीन रात्र उभे राहणे, तो अशा ठिकाणी उभा होता जिथे चारही बाजूंनी वीज खेळत होती. जर तो एक क्षण देखील हलला असता तर त्याच्या प्राणावर बेतू शकले असते. अशा स्थितीमध्ये त्याने तीन दिवस तीन रात्र स्थिर राहण्याचा विक्रम केलेला आहे.

डेव्हिडचे असे अनेक स्टंट जगप्रसिद्ध आहेत. याच्यामध्ये न्यूयॉर्क सिटी मधल्या सर्वात उंच खांबा वरती पस्तीस तास उभे राहणे, स्वतःला साठ तास उलटे लटकवत ठेवणे अशा प्रकारांचा समावेश होतो.

खरंतर 2020 हे कोविड वर्ष म्हणून ओळखले जाते. मात्र या वर्षात देखील डेव्हिडने विश्वविक्रम बनवलेला आहे. 2 सप्टेंबर 2020 रोजी डेव्हिडने 52 हिलियमच्या फुग्यासकट आकाशामध्ये उड्डाण केले. तो जसजसा वर जात राहिला तसा तो एक एक फुगा फोडत राहिला.

24,900 फूट उंच गेल्यानंतर त्याने शेवटचा फुगा फोडला आणि त्यानंतर तो  कुठल्याही आधाराशिवाय आकाशात राहिला.

यूट्यूब वर हा प्रकार लाईव्ह बघणारे प्रेक्षक किंचाळत होते. जवळपास 30 सेकंद डेव्हिड हवेतून वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होता. त्याने पॅराशुट देखील लवकर उघडले नाही. जवळपास तीस सेकंद झाल्यानंतर त्याने स्वतः जवळचे पॅराशुट उघडले. हा डेव्हिडच्या नावावर एक नवीन विक्रम नोंदला गेलेला आहे.

जवळपास पंचवीस हजार फूट उंच कुठल्याही मदतीशिवाय जाणारा मनुष्य म्हणून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 

हे असे अक्षरशः जीवावर बेतणाऱ्या प्रयोग करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी तेवढी कमीच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!